मातंग समाजातील आरती. मातंग समाजात पोतराज होण्यासाठी देवीला सोडलेल्या मुलाचे बालपण आईवडिलांच्या घरीच व्यतीत होते. तो मुलगा मोठा झाला की, एखाद्या वृद्ध व जाणत्या पोतराजाचा त्याला गुरूमंत्र दिला जातो किंवा त्याच्या मांडीवर बसवून पोतराजाची दीक्षा दिली जाते. ही दीक्षा देण्याचा खास समारंभ असतो त्याला ‘बढण’ असे म्हणतात. बढणाच्या विधीनंतर जळपूजन करून नंतर होम केला जातो. होमानंतर आरती होते. या आरतीला ‘धुपात्री’ म्हणतात. होमाच्या वह्या पोतराज पुटपुटत म्हणतात. त्यामुळे उपलब्ध होऊ शकल्या नाही. कदाचित धुपात्रीच्या कवनांसारखीच ही कवी असावीत. पोतराज धुपात्रीच्या वह्या अत्यंत श्रद्धेने, आवेशपूर्ण रीतीने आणि ‘आतिशायी’ अवस्थेत म्हणतो. धुपात्रीच्या वह्या गेय नसतात. त्यात एक आकर्षक प्रवाही आणि ऐकणाऱ्यांवर प्रभाव टाकणारी लय असते. यमकानुप्रासयुक्त, गद्यपद्यात्मक, चूर्णिकेच्या स्वरूपाची ही कवते पोतराज अशा अविर्भावात म्हणतो की समोरा प्रेक्षक भारावून जातो.
धुपात्रीतील यमक-अनुप्रास व त्यामुळे निर्माण झालेला ठसका, वर्णनाचा नेटकेपणा लक्षात राहातो. सात आसरा व आठवा म्हैशासुर यांचे उल्लेख धुपार्तीत वारंवार येतात. लक्ष्मी आईच्या विराट रूपाचे वर्णन केले जाते. दुसऱ्या एका धुपात्रीत लक्ष्मीआईचा अवतार हा निरंजन-निराकारातून कशा निर्माण झाला याचे वर्णन आहे. लक्ष्मीच्या अवताराबरोबर चंद्र-सूर्य-तारे वारा-पाणी यांचाही उद्भव झाला असे सांगून लक्ष्मी बाईच्या प्रकट होण्यामुळे चराचरात प्रत्यय झाल्याचे म्हटले आहे . आदिमायेच्या गूढ वर्णनाबरोबरच काही धुपात्र्यांतून मरीआईच्या ध्यानाचेही वर्णन येते. काही धुपात्रीच्या कवनांत गणेशाचे प्रारंभी स्तवन असते. श्रीगणेश, मातापिता, चंद्रसूर्य, महादेव आणि गावपंढरीचा हनुमान या सर्वांनाच धुपात्रीपासून नमन केल्याचे आढळते. काही धुपात्रात गुरूच्या चरणी मस्तक ठेवल्याचा उल्लेख येतो. हरिनामाची महतीही गाईलेली आहे.पोतराज जी कवने म्हणतात त्यावर सुफी संतांचा पर्यायाने इस्लामाचा प्रभाव आढळतो. धुपात्रीच्या वेळी जी नमने केली जातात त्यात आसरा, म्हसोबा तसेच नांदेड जिल्ह्यातील कंधारचा हाजीशावली दावाही नमन करण्यात येते. सकलादीबाबा, गरीबशाबाबा, वंदेनवाज या सूफी संतांचा उल्लेख पोतराजांच्या कवनांमधून काही ठिकाणी येतो.
सूफी संतांचा प्रभाव असला व कवनात त्यांचे उल्लेख येत असले तरीही उरूसात ते आपल्या पारंपरिक वेशभूषेत (आभरणात) वावरतांना दिसत नाहीत हे विशेष.पोतराजांची इस्लामसंबंधी भूमिका कळत नव्हती. धुपात्रीमध्ये पोतराज काही वेळा आपल्या गुरूपरंपरेचाही उल्लेख करतात. वरखेड नगरी पाताकुलांचा सागर, धुपात्रीचा करतो आकार अशी कितीतरी उदाहरणे देता येतील, ज्यात पोतराजांनी आपल्या गुरूपरंपरेचा अत्यंत श्रद्धेने उल्लेख केला आहे. जी काही धुपात्रीची कवने उपलब्ध झाली त्यावरून त्यात सृष्टीच्या उत्पत्तीची कथा आढळते. गणेश, महादेव भाषाबरोबरच चंद्र-सूर्य-वारा-पाणी यांना आभिवादन असते. लक्ष्मीआई (मरीआई) हिच्या अक्राळ विक्राळ रूपाच्या वर्णनाबरोबरच ती निर्गुण-निराकाराबरोबर कशी उत्पन्न झाली याचे वर्णन आहे. लक्ष्मीआईचा फेरा आल्यानंतर गावाची कशी दाणादाण होते याचे चित्र रेखाटले आहे. आध्यात्मिक आशयही काही कवनांमधून दडलेला आहे असे जाणवते. परंपरेने चालत आलेले विधी आता पूर्वीच्या श्रद्धेने केले जात नाहीत. नवीन युवकांना पोतराजाची दीक्षा देणे आता कालबाह्य होत आहे. त्यामुळेच पूर्वीसारख्या धुपात्र्या आता ऐकायला मिळत नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा