बहुरूपी ह्या कलेचा आविष्कार घडविणारा महाराष्ट्राच्या झाडीपट्टीतील (चंद्रपूर,भंडारा,गडचिरोली) लोककलावंत. निरनिराळ्या पात्रांच्या वेशभूषा वठवून भिक्षा, बिदागी व बक्षीस मिळवून हे कलावंत जीवनयापन करतात भोरपी, रायरंद अशाही नावानी ते महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ओळखले जातात.त्यांच्या कलेला भिंगीसोंग म्हणतात. विविध जमातीतील लोक हे कार्य करत असल्याने कोणत्याही एका जमातीपुरते हे लोक मर्यादित नाहीत. बहुरुप्याचा वेश हा साधारणतः पोलीस व पोष्टमनचा असतो.
झाडीपट्टीतील कलाकार मात्र महादेव, राम, हनुमान इत्यादी पौराणिक पात्रांचे सोंग अतिशय पारंगतपणे वठवतात. दंडार या लोकनृत्यातही या कलाकारांचा समावेश असतो. भिंग म्हणजे चमकदार आरसा. भिंग लावणं हा झाडीबोलीतील वाक्प्रचार नटणे या अर्थी प्रचली त आहे. भिंगी जसा नटून सवरून पुढे येतो तशी कृती या वाक्प्रचारामध्ये अभिप्रेत आहे. संस्कृतमध्ये भृंग हा शब्द असून त्याचाही अर्थ अभ्रक हाच आहे.एकनाथ पंचायतनातील प्रख्यात संतकवी जनिजनार्दन यांच्या जानकीस्वयंवर नामक काव्यात भाट, चारण, नागारी यांच्यासोबत भृंगी उल्लेखिलेला आहे. झाडीबोलीतील ह्या भिंगीसोंगास उपरोक्त सांस्कृतिक संदर्भ मिळतात. भिंगी हा नकलाकार असून गोष्टी/कथा सांगणे, वेगवेगळे पोशाख करून त्या भूमिकांच्या आवाजात बोलणे, पशु पक्षांचे आवाज काढणे या सर्व गोष्टी ते करतात. त्यासाठी आवश्यक वेशभूषा, पोशाख आणि प्रतीके त्यांच्याजवळ असतात. दूधवाला, पोस्टमन, पोलीस, फेरीवाला, देवदेवता अशी विविधरूपे घेऊन ते कलेचे सादरीकरण करतात.
पहा: बहुरूपी
संदर्भ :
- बोरकर, हरिश्चन्द्र, लुप्तप्राय लोकाविष्कार, तारा प्रकाशन, साकोली २००९.