मार्गशीर्ष शुद्ध षष्ठिस चंपाषष्ठी म्हणतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंडभैरवाच्या म्हणजे खंडोबाच्या उत्सवास प्रारंभ होतो. जेजुरी येथे हा उत्सव मोठ्या प्रमाणावर होतो. उत्सवकालास खंडोबाचे नवरात्रही म्हणतात. चंपाषष्ठीच्या दिवशी मार्तंडभैरवाचे उत्थापन होते. कुलाचाराप्रमाणे पूजेमध्ये कुंभ अथवा टाक ठेवतात. पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन याप्रमाणे वाढवीत सहाव्या दिवशी सहा फुलांच्या माळा त्याला घालतात. षष्ठीला तळई व आरती करतात व हे नवरात्र उठवितात. महानैवेद्यात वांग्याचे भरीत, रोडगा आणि कांद्याची पात यांचा अंतर्भाव आवश्यक असतो. खंडोबावरून नारळ ओवाळून फोडतात व त्याचा प्रसाद आणि भंडारा सर्वांना देतात. तळी भरताना व आरतीच्या वेळी ‘खंडोबाचा येळकोट’ असे म्हणतात. चातुर्मास्यात निषिद्ध मानलेले कांदे, वांगी इ. पदार्थ या दिवसापासून खाणे विहित मानले जाते.
भाद्रपद शुद्ध षष्ठीस मंगळवार, विशाखा नक्षत्र व वैधृतियोग येत असेल, तर तिलाही चंपाषष्ठी म्हणतात. सु. तीस वर्षांनी एकदा अशी चंपाषष्ठी येते. या दिवशी उपवास, सुर्यपूजा व शिवलिंगदर्शन करावे असे सांगितले आहे.
संदर्भ :
- बेलसरे, गो.पां. श्री क्षेत्रजेजुरीवर्णन, पुणे, १९२६.