(धूलिवंदन). एक भारतीय लोकोत्सव. फाल्गुनातील पौर्णिमेच्या दिवशी सुरू होणाऱ्या होळी पौर्णिमा किंवा होलिकोत्सवाचा एक भाग म्हणून फाल्गुन वद्य प्रतिपदेस धुळवड साजरी करतात. या उत्सवाचा संबंध कामदहनाशी जोडला जातो. पुराणांत याविषयी निरनिराळ्या कथा प्रचलित आहेत.या दिवसापासून नवे वर्ष सुरू होते असे उत्तर भारतात (पूर्णिमान्त मास) मानतात. समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा हा दिवस आहे. उत्तर भारतात या दिवशी सर्व थरांतील लोक एकमेकांवर रंग उडवतात. महाराष्ट्रात या दिवशी चिखल फेकण्याची चाल होती. होळीचे पवित्र भस्म अंगाला लावणे, यातून ही चाल आली असावी; परंतु कालांतराने अश्लील शब्द उच्चारून शंखध्वनी करणे यासारख्या विकृत गोष्टीही या उत्सवात शिरल्या. शिमगा वा होळी पोर्णिमा या सणातच धुळवडीचा अंतर्भाव होतो. होळी पोर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत होळीचा सण मानला जातो. होळीचे भस्म लावणे व आंब्याचा मोहोर खाणे, हे या उत्सवातील धार्मिक विधी आहेत.
- Post published:29/07/2019
- Post author:वि. वि. भिडे
- Post category:लोकसाहित्य - लोकसंस्कृती
- Post comments:0 Comments
Tags: लोकविधी