भगवान शिवाशी एकत्वाचे तत्त्व मानणारा हा पाशुपत, कापालिक व इतर माहेश्वर पंथांप्रमाणेच एक शैव पंथ आहे. श्रीकंठाचार्य हे या पंथाचे प्रणेते आहेत. त्यांचा जन्म दक्षिण भारतात झाला असावा. संस्कृत ग्रंथकार व महापंडित अप्पय्य दीक्षित यांनी शिवार्कमणिदीपिका या ग्रंथात श्रीकंठाचार्यांचे वर्णन ‘महान योगी’ असे केले आहे. शिवाचे परब्रह्माशी एकरूपत्व दाखवल्यामुळे त्यांच्या सिद्धांताला ‘शिव-विशिष्टाद्वैत’ असे नाव मिळाले. त्यांच्या जीवनाविषयी व जीवन कालावधीविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. रामानुजाचार्यांचे तत्त्वज्ञान श्रीकंठाचार्यांच्या तत्त्वांवर आधारित आहे, असे मानले जाते. त्यामुळे श्रीकंठाचार्यांचा काळ श्रीरामानुजाचार्यांच्या पूर्वीचा ठरतो. तसेच प्रसिद्ध तत्त्वज्ञ हरदत्तमिश्र हे श्रीकंठाचार्यांच्या पूर्वी होऊन गेले असे, मानले जाते. अशाप्रकारे कालगणनेनुसार हरदत्त (दहावे शतक) ‒ श्रीकंठ (अकरावे शतक) ‒ रामानुजाचार्य (अकराव्या शतकाचा उत्तरार्ध-बारावे शतक) हा क्रम योग्य ठरेल.
श्रीव्यासांच्या ब्रह्मसूत्रांवर श्रीकंठाचार्यांनी ब्रह्ममीमांसाभाष्य ही लिहिले. त्यात त्यांनी ‘शिवाद्वैत’ मताचा पुरस्कार केला आहे. त्यांच्या मते हा संसार पुढील तीन तत्त्वांवर आधारित आहे : १. पशुपती (परमेश्वर), २. पशू (सजीव) आणि ३. पाश (संसारातील पाश).
पशुपती म्हणजेच शिव किंवा ईश्वर. शिव ही सर्वोच्च देवता होय. तो (आत्माच्या) मानवी कृत्यांनुसार उपभोग्य वस्तूंची वा दु:खाची निर्मिती करतो. तो हा सर्वज्ञानी आहे; पण मानवी शरीरासारखा शरीरधारी नाही. त्याचे शरीर कर्मरूपी पाशांनी बद्ध नाही, तर त्याचे शरीर शक्तिरूप अशा पाच मंत्रांनी बनलेले आहे, ते पाच मंत्र असे : १) ईशान (ईश्वराचे मस्तक), २) तत्पुरुष (ईश्वराचे मुख), ३) अघोर (ईश्वराचे हृदय), ४) वामदेव (ईश्वराचे गुह्यस्थान), ५) सद्योजात (ईश्वराचे पाय). ज्यांनी तो निर्मिती, रक्षण, विनाश, आश्रय आणि कल्याण या पाच क्रिया करतो. पशू हा सजीव म्हणजेच क्षेत्रज्ञ आत्मा आहे. तो कर्माच्या पाशांनी बद्ध असून पाशातून मुक्त झाल्यावर तो शिवाशी एकरूप होतो. तो नित्य, सर्वव्यापी, कर्ता व भोक्ता ह्या स्वरूपाचा आहे. दृक् व क्रिया ह्या दोन प्रकारच्या चैतन्याने युक्त होणारा तसेच विज्ञानाकल, प्रलयाकल व सकल अशा तीन प्रकारचा तो आहे. मल, कर्म, माया व रोधशक्ती हे चार प्रकारचे पाश आहेत. रोधशक्ती ही शिवाची शक्ती असून इतर पाशप्रकारांना ती नियंत्रित करते व आत्म्याचे खरे स्वरूप उघड होऊ देत नाही. बिंदू असा पाचवा पाशही काहीजण स्वीकारतात; परंतु विद्येश्वरपदाची प्राप्ती किंवा अपार मुक्ती पाश असतानाही त्याच्याकडून संभवते. त्यामुळे पाश म्हणून तो गणला जात नाही. यालाच शिवतत्त्व असेही म्हणतात.
पाशुपत पंथापेक्षा या शैव पंथाची तत्त्वे सौम्य, तर्कसंगत व विवेकपूर्ण आहेत. मंत्राधारित असणारी ही तत्त्वे शिवाने सांगितलेली असून यास ‘सिद्धांतशास्त्र’ म्हणजेच ‘सत्यशास्त्र’ म्हटले आहे. शिवपुराणातील ‘वायवीय संहिते’मध्ये उपमन्यू श्रीकृष्णाला शिवभक्ती कशी करावी, याचे विस्तृत विवेचन करतात. या संहितेमध्ये शैव पंथाला ‘सिद्धांत पंथ’ वा ‘मार्ग’ म्हटले आहे.
पाशुपत व शैव हे दोन्ही द्वैत पंथ आहेत; मात्र श्रीकंठाचार्य यांच्या शैव पंथाची तत्त्वे असे सांगतात की, शिव स्वत:मध्ये एक शक्ती बाळगून आहे, ज्यात पूर्ण विश्व मूलस्वरूपात आहे व ज्यापासूनच विश्वाची निर्मिती होते. म्हणून या पंथाची तत्त्वे (श्रीरामानुजांच्या विशिष्टाद्वैतमताप्रमाणे) अद्वैत मानतात.
श्रीकंठाचार्य वेदांना ‘अपौरुषेय’ मानतात. तसेच वेद हेच शिव-वाक्य आहे, असेही मानतात. शिव हेच परम-ब्रह्म असून त्याची उपासना केल्यानेच मुक्ती मिळते, असे त्यांचे मत आहे. श्रीकंठाचार्यांच्या सिद्धांतानुसार सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय ही कार्ये, तसेच जीवाच्या बाबतीत तिरोभाव व अनुग्रह ही कार्ये शिवच करतो. जीवाच्या ठिकाणी असणारे मालिन्य कर्मानेच धुऊन टाकणे शक्य असते. त्यामुळे त्याला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून जावे लागते. सततच्या कर्माने त्याचे मालिन्य नाश पावते, तो शुद्ध होतो व शिवाचा अनुग्रह मिळवून मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो. मुक्ती मिळाल्यावर खरे आत्मस्वरूप समजते, स्वयंप्रकाशित्व प्राप्त होते व शिवस्वरूपाप्रमाणे मंगल गुणही प्राप्त होतात.
श्रीकंठाचार्यांच्या या शिव-अद्वैत सिद्धांताला पुष्टी देऊन त्याचा प्रसार करण्याचे काम अप्पय्य दीक्षित यांनी केले. अलंकार, व्याकरणशास्त्र व दर्शने यांत ते पारंगत होते. आपले अद्वैती वडील रंगराज व आजोबा यांच्याप्रमाणेच ते नंतर अद्वैतपरंपरेतील श्रेष्ठ आचार्य म्हणून प्रसिद्ध झाले. शैव-सिद्धांताच्या स्थापनेसाठी व प्रचार-प्रसारासाठी त्यांनी शिवार्कमणिदीपिका, शिवतत्त्वविवेक, शिवकर्णामृत इ. ग्रंथरचना केली. शिवार्कमणिदीपिका अथवा शिवादित्यमणिदीपिका हा ब्रह्मसूत्रावरील शैव विशिष्टाद्वैतमताच्या श्रीकंठभाष्यावरची टीका होय.
प्रमाण-ग्रंथ : शिवपुराणातील ‘वायवीय संहिता’ म्हणजे या पंथाचा आद्य प्रमाणग्रंथ होय. जेव्हा कशाचेही अस्तित्व नव्हते, तेव्हा शिव होता. जो सृष्टीनिर्मितीचे कारण आहे व ज्यापासून अनंत प्राणिमात्र निर्माण झाले आहेत, तो आदिदेव शिव सर्वश्रेष्ठ आहे.
तोच विश्वाची निर्मिती करतो आणि प्रलयाच्या वेळी विनाश घडवून आणतो. तो एकमेवाद्वितीय आहे. परिपूर्ण आहे. कोणीही शिवाचे परमतत्त्व जाणण्यास समर्थ नाही. तो अणूहून सूक्ष्म व महानांहून महान आहे. पशूच्या हृदयात त्याचा निवास आहे. तो आदि-अन्त, प्रकृती, काल यांच्या पलीकडे आहे व असे असूनही तो सर्वांमध्ये आहे. उदारता, वीरता, गंभीरता, मृदुता, मधुरता यांचा तो सागर आहे. परमभक्तीच्या मार्गाने याचे दर्शन होऊ शकेल.
तत्त्वज्ञान : क्षर म्हणजे पाश व अक्षर म्हणजे पशू. क्षराक्षराच्या पलीकडे असणारा तो पती म्हणजेच शिव होय. तो सर्वव्यापी आहे. ज्याप्रमाणे तिळात तेल, दह्यात तूप व अरणीत अग्नी, त्याप्रमाणे तो सर्वत्र आहे. विद्या-अविद्या दोन्हींचा अधीश शिवच आहे. तो भक्तीने जाणून घेता येतो. विश्वाचा कर्ता, धर्ता, हर्ता सर्वकाही शिवच आहे. काळावर सुद्धा त्याचीच सत्ता आहे.
मानवासाठी शिवाची उपासनाच श्रेष्ठ उपासना आहे. जो परम-शुद्धात्मा आहे तो ‘शिव’ आहे. मायेचा स्वामी तोच ‘महेश्वर’ आहे. दु:ख व दु:खाची कारणे नष्ट करणारा तो ‘रुद्र’ आहे. सर्व भूतमात्रांचा परात्पर स्वामी म्हणजे ‘पितामह’ तोच आहे. तो ज्ञानमय आहे म्हणून ‘सर्वज्ञ’ आहे. संसारव्याधींना नष्ट करणारा म्हणून ‘भिषक्’ (संसारवैद्य) व आत्म्यांचा आत्मा या नात्याने तो ‘परमात्मा’ आहे. सर्व जीव पशू आहेत. शिव त्यांचा स्वामी म्हणून पशुपती आहे. मल आदी पाशांनी तो जीवांना बांधतो. ईशान, पुरुष, अघोर, वामदेव व सद्योजात या शिवाच्या पाच रूपांनी अवघे विश्व व्यापले आहे.
श्वेत, सुतार, सहोत्र, मदन, कंक इ. शिवाचे अठ्ठावीस अवतार झाले. प्रत्येकाचे चार शिष्य याप्रमाणे हे एकशे बारा शिष्य शिवज्ञानी आणि रुद्राक्ष, भस्म धारण करणारे होते.
उपासना : समाजाच्या धारणेसाठी ब्राह्मणाने सत्य, अहिंसा, श्रद्धा, वेदपाठ, योग, ब्रह्मचर्य इ. धारण करावे. राजाने (क्षत्रियाने) सर्व वर्णांचे रक्षण करावे. शत्रुसंहार करावा. स्त्रियांनी पातिव्रत्य राखावे. गृहस्थाने स्व-पत्नीशीच प्रामाणिक असावे. ब्रह्मचारी, वानप्रस्थीय आणि संन्यासी जनांनी ब्रह्मचर्य पालन करावे, तसेच ‘ॐ नम: शिवाय’ या मंत्राचे पुरश्चरण करावे. प्राणायाम करावा. शिव, गुरू व विद्या यांचे नित्य पूजन करावे. विधवा स्त्रियांनीसुद्धा ब्रह्मचर्य, मौनव्रत, दानधर्म, सहनशील वृत्ती यांचे पालन करावे.
आपल्या सर्व वृत्ती शिवमय करणे हाच योग होय. स्व-नियंत्रण, शांत व समाधानी वृत्ती, सत्यनिष्ठा, अचौर्य, ब्रह्मचर्य, विरक्ती, शिवाचे पूर्ण ज्ञान, भस्मलेपन आणि व्यावहारिक गोष्टींविषयी अनासक्ती हे योग्यांसाठी आवश्यक असणारे गुणधर्म आहेत. योगाचे खालील पाच प्रकार आहेत :
- मंत्रयोग ‒ मंत्रांद्वारे अभ्यास करणे.
- स्पर्शयोग ‒ प्राणायामाने केलेला स्पर्श.
- भावयोग ‒ मंत्र-स्पर्शरहित असणारा भाव.
- अभावयोग ‒ अभ्यासाच्या एकाग्रतेत विश्व लय पावणे.
- महायोग ‒ शिवाचे ध्यान.
आळस, व्याधी, संशय, अस्थिरता, चंचलता, दु:ख ही योगमार्गातील विघ्ने आहेत. भक्तीमुळे पाशबद्ध शिवभक्त पाशांमधून मुक्ती मिळवू शकतो. पुरुष म्हणजे शिव व स्त्री म्हणजे माहेश्वरी होय. समस्त स्त्री-पुरुष त्यांचेच अंश आहेत. शिवाच्या निर्विकल्प रूपाला न जाणल्यामुळे भक्त त्याचे अनेक रूपांत वर्णन करतात; परंतु शिव सत्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, सर्वव्यापक व सर्वातीत आहे.
शिवभक्तीसाठी तप, कर्म, जप, ध्यान व ज्ञान हे पाच शिवधर्म पाळावे, ते खालीलप्रमाणे आहेत :
- तप ‒ ‘चांद्रायण’ इ. व्रते आचरावी.
- कर्म ‒ ‘लिंगपूजन’ आदी विधी करावे.
- जप ‒ वाचिक, उपांशु आणि मानस असा तीन प्रकारे शिवमंत्रांचा अभ्यास करावा.
- ध्यान ‒ अखंड शिवाचे चिंतन करावे.
- ज्ञान ‒ शिव-आगमांमधील ज्ञानाच्या वर्णनानुसार ‘ज्ञान’ प्राप्त करून घ्यावे.
ध्यान ही मानसपूजा, मंत्राचे पुरश्चरण ही शाब्दिक पूजा आणि विधी ही शारीर पूजा आहे. या तीन प्रकारे शिवधर्माचे पालन करावे.
अशा प्रकारे शिव-अद्वैतात योग व भक्ती यांचा समन्वय साधलेला दिसून येतो. प्रामुख्याने भारताच्या दक्षिणेकडील भागात या तत्त्वज्ञानाचा प्रसार झालेला दिसून येतो.
संदर्भ :
- Bhandarkar, R. G. Vaisnavism, Saivism and Minor Religious Systems, Strassburg, 1913.
- अभ्यंकर, शंकर, भक्तिकोश, तृतीय खंड : भारतीय संप्रदाय, पुणे, १९९६.
- बनारसीदास, मोतीलाल; शास्त्री, जे. एल. (अनु.), शिवपुराण : वायवीय संहिता, दिल्ली, २००२.
- शेणोलीकर, ह. श्री. मराठी संत : तत्त्वज्ञान संज्ञा कोश, पुणे, १९९४.
- https://archive.org/stream/SivaPuranaJ.L.ShastriPart4/Siva%20Purana%20-%20J.L.Shastri%20-%20Part%204#page/n433/mode/2up
- http://resolver.sub.uni-goettingen.de/purl/?gr_elib-37
समीक्षक : ललिता नामजोशी