गाबित शिग्माखेळ : होळी सणानिमित्त कोकणच्या गाबीत समाजात सादर होणारे विधीनाट्य म्हणजे शिग्माखेळ होय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात गाबीत समाजातील लोक होळी सणाला शिग्माखेळ हे विधीनाट्य करतात. होळी सणाला होळीची पूजा करून पेटविली जाते. त्यानंतर होळदेव, देवचार, बारापाच तामसी देवतांना प्रसन्न करण्यासाठी गाबीत समाज शिग्माखेळ विधीनाट्य सादर करतात. गाबीत समाजाच्या होळीच्या मांडावर तरूण युवकाला स्त्रीवेश परीधान करून उभे करतात. घुमटाच्या तालावर फाग गायन होते आणि घुमटाच्या तोड्यावर स्त्रीवेशधारी नाच्या/ राधा/ कोळीण हे कलाकार नृत्य करतात. गणपती, शिवपार्वती आणि सरस्वती यांची सोंगे येतात. खेळगडी या देवतांची स्तुती करणारे फाग गातात. हा पूर्वरंग झाला की उत्तररंग सादर केला जातो. उत्तररंगात विविध सामाजिक, पौराणिक किंवा कृष्णलीलावर्णनपर सोंगे आणून नाट्यखेळ करतात. त्यानंतर देवतांची आरती आणि गा-हाणे बोलणे करून उत्तररंग सपतो.
शिग्माखेळात गवळण, फागगीते, डफगाणी, झुलवा आणि पाळणागीते सादर होत असतात; मात्र याचा मुख्य भाग हा फाग गायनाचा असतो. फाग गायनासाठी खेळगड्यांची रंगमंचावर अर्धगोलाकार मानवी रांग तयार करतात. रांगेच्या दोन्ही बाजूला घुमटवादक वादन करीत असतात आणि या मानवी रांगेपुढे स्त्रीवेशधारी राधा / कोळीण नृत्य करीत असते.
गणपती रंगणी घागुर चरणी पाहिले लोचनी अहो पाहिले लोचनी देवतो पाहिला लोचनी आणी रे कळस भुवनी देवादारी पाहूनी सभा ये मंडळी आणि रे नारद मुनी सारजा अंगणी नेम केला रंगणी अहो होम केला रंगणी राया होम केला रंगणी आणी हो सभा मंडपी भीमक राजा
अशाप्रकारचे अनेक फाग या शिग्मानाट्यात सादर केले जातात,त्यानंतर पाळणा गायन होते आणि शेवटी देवतांची आरती होऊन हा खेळ संपतो.
संदर्भ : क्षेत्रसंशोधन