मेयर, डॉल्फ एड्युअर्ड( ९ ऑगस्ट, १८४३ ते २५ डिसेंबर, १९४२ ) 

ॲडॉल्फ एड्युअर्ड मेयर यांचा जन्म जर्मनीतील ओल्डेनबर्ग (Oldenburg) येथे झाला. त्याचे आजोबा हे उत्तम रसायनतज्ञ होते. ॲडॉल्फ १७ वर्षांचे असताना गणित शिकण्यासाठी ते कार्ल्सरुह (Karlsruhe) येथे गेले. त्यानंतर दोन वर्षांनी ते हेडीलबर्ग विद्यापीठात गेले. वयाच्या तेवीसाव्या वर्षी ॲडॉल्फ यांना रसायनशास्त्रातील पीएच्.डी. मिळाली. पुढे त्यांनी भौतिकशास्त्र व गणितशास्त्रामध्ये देखील पीएच्.डी. प्राप्त केली. तरीही यामुळे अँडॉल्फ यांना प्रसिद्धी मिळाली नाही.

मेयर १८७९ साली नेदरलँड्समधील ॲग्रीकल्चरल एक्सपरिमेंट स्टेशनमध्ये काम करत होते. व्हेनिन्गेन (Wageningen) येथील डच शेतकऱ्यांना तंबाखूच्या पिकासंदर्भात एक समस्या भेडसावत होती. बरीच वर्षे मेयर यांनी त्यासंबंधी अभ्यास केला की इतर पिकांसारखी ही पिके बहरत का नाहीत. १८८६ साली त्यांना जाणीव झाली की आपण केलेले संशोधन हे प्रकाशित केल्याशिवाय लोकांसमोर येणार नाही. त्यामुळे त्यांनी ‘मोसॅक डिसीज ऑफ टोबॅको’ या शीर्षकाचा एक शोधनिबंध लिहिला.

तंबाखूच्या झाडांवर केलेल्या प्रयोगात त्यांना आढळून आले की, रोगट झाडांचे पेशीद्रव्य/वनस्पतिद्रव्य (Sap) जर निरोगी झाडावर शिंपडले तर त्या निरोगी झाडात, रोगट झाडासारखीच लक्षणे दिसून येतात. ॲडॉल्फ यांना वाटले की या रोगाचा प्रसार हा जिवाणू किंवा विषारी द्रव्यामुळे होत असेल. त्यांनी त्या वनस्पतिद्रव्याला सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे पाहिले असता कुठेही जिवाणूंचे अस्तित्व त्यांना सापडले नाही. कारण, त्याकाळी  बॅक्टेरीयापेक्षा सूक्ष्म असलेल्या जीवाचे अस्तित्व शास्त्रज्ञांना माहीतच नव्हते आणि असे जीव प्रचलित साध्या सूक्ष्मदर्शकातून पाहणे अशक्य होते.

जरी ॲडॉल्फ यांना वनस्पती द्रव्यामध्ये जीवाणू दिसले नाहीत तरी त्यांना खात्री होती की वनस्पती द्रव्यामध्ये असे काहीतरी आहे की ज्यामुळे रोग होतो. ॲडॉल्फ यांनी वनस्पती द्रव्य बऱ्याच प्रकारच्या फिल्टरमधून गाळून घेऊन स्वच्छ असे द्रव्य मिळवले परंतु तरीही रोगकारक घटक त्यांना वेगळा करता आला नाही.

इ. स. १८९२ साली दिमित्री इव्हानोव्हस्की (Dmitri Ivanosky) व १८९८ साली मार्टिनस बेजरिंकीने (Martinus Beijrink) चांगल्या प्रतीच्या फिल्टरचा वापर करून पुन्हा पुन्हा प्रयोग केला तेव्हा त्यांना कळले की टोबॅको मोसॅक रोगाला रोगकारक जंतू हा चेंबरलंड फिल्टरमधून सुद्धा गाळता येत नाही. यावरून बेजरिंकी यांना हे कळले की, ज्यासंदर्भात आपण संशोधन करत आहोत तो रोगजंतू नसून एक रासायनिक रोगकारक घटक आहे. त्यांनी त्या घटकाला व्हायरस (Virus) म्हणजेच विषारी द्रव्य, असे नाव दिले. ॲडॉल्फ मेयर यांच्या प्रयोगांमुळेच पुढे व्हायरसचा शोध लागला व त्यामुळेच व्हायरसमुळे होणाऱ्या रोगोपचाराचे एक नवे विश्व खुले झाले.

पुढे १९३५ साली डीएनए/आरएनएच्या स्फटिकीकरणामुळे व त्या स्फटिकांच्या क्ष-किरण निरीक्षणामुळे डीएनए/ आरएनएच्या रचनेचा शोध लागला. याच पद्धतीने सर्वप्रथम स्फटिकीकरण करण्यात आलेला विषाणू म्हणजे टोबॅको मोसॅक व्हायरस यालाच टी.एम.व्ही. असे संबोधतात.

जरी ॲडॉल्फ मेयर यांच्या प्रयोगात काही त्रुटी होत्या तरी मात्र त्यामुळेच व्हायरसचा शोध लागण्यास मोठी मदत झाली आणि त्यातूनच पुढे व्हायरॉलॉजी या शास्त्राचा उदय झाला.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे