सावळदा संस्कृती : (इ. स. पू. २५००–२०००). महाराष्ट्रातील आद्य शेतकर्‍यांची एक सर्वांत जुनी संस्कृती. इ. स. पू. २५०० च्या सुमारास ह्या संस्कृतीचा उदय झाला. या संस्कृतीचा शोध सर्वप्रथम नंदुरबार (पूर्वीचा धुळे) जिल्ह्यातील सावळदा या ठिकाणी लागला. या गावाच्या नावावरूनच या संस्कृतीला ‘सावळदाʼ असे नाव देण्यात आले. तापी नदीच्या खोऱ्यातील सावळदा, कवठे व प्रवरा नदीच्या खोऱ्यातील दायमाबाद (जि. अहमदनगर) ही या संस्कृतीची महत्त्वाची स्थळे आहेत. सावळदा ही ताम्रपाषाणयुगीन संस्कृती असली, तरी या संस्कृतीच्या लोकांनी धातू व दगडांपेक्षा हाडांपासून बनवलेल्या हत्यारांना प्राधान्य दिलेले दिसते. हरणासारख्या प्राण्यांच्या हाडांपासून बनवलेल्या सुऱ्या, चाकू, तीराग्रे यांसारखी हत्यारे दगडी हत्यारे व अवजारांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर सापडली.

सावळदा संस्कृतीची खापरे ही लाल रंगाची असून त्यांवर काळ्या रंगात नक्षीकाम केलेले आहे. प्राणी, पक्षी, जलचर – मासे इत्यादी – शिकारीसाठी वापरले जाणारे मत्स्यबाण (harpoons) इत्यादींचे चित्रण या खापरांवर आढळते. भांड्यांमध्ये प्रामुख्याने हंडे, वाडगे, थाळ्या यांचा समावेश होतो. दायमाबाद येथे चार खूर असलेले साठवणीचे रांजणही आढळून आले.

सावळदा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननामधून प्राथमिक अवस्थेतील शेतीचे पुरावे मिळाले. या संस्कृतीचे लोक प्रामुख्याने बाजरी व क्वचित गहू आणि ज्वारीची लागवड करत असत. सावळदा येथील उत्खननात सापडलेली घरे आकाराने छोटी म्हणजे साधारण दीड ते दोन मीटर व्यासाची आहेत. ही घरे खड्ड्यात केलेली असत (dwelling pits). दहा- बारा सेंमी. खोलीचा गोलाकार किंवा लंबगोलाकार खड्डा खणून त्या भोवती वासे उभारून छप्पर केले जाई. घरांच्या अंगणात धान्य साठवण्यासाठी बळदांसारखे खड्डे केलेले होते. अंगणातले लहान आकारांचे खड्डे हे उत्खननकर्त्यांच्या मते, रात्री कोंबड्या ठेवण्यासाठी असावेत. येथील एक लंबगोलाकार आकाराचे घर खूप मोठे होते (४x३ मी.). घराची जमीन ३० ते ४० सेंमी. खोलीवर होती. एका कोपर्‍यात चूल होती. हे घर वसाहतीच्या प्रमुखाचे असण्याची शक्यता आहे.

दायमाबाद येथील उत्खननात सापडलेली घरे यापेक्षा मोठी होती. काही दोन तर काही तीन खोल्यांची घरे होती.  त्यांच्या भिंती सु. ३० सेंमी. उंचीच्या असून त्यांवर काठ्या आणि मातीचे लेपण असावे. घराच्या आत गोलाकार खड्ड्यात चूल आणि धान्य साठवणीची बळदेही सापडली आहेत. मात्र येथे घरे बांधण्याआधी पूर्वनियोजन दिसून येत नाही. लहान वस्तीमध्ये जागा मिळेल तशी घरे बांधली गेली होती. येथील एक घर चतुष्कोनी आकाराचे होते (४.५ मी.). बैठी भिंत घालून त्याचे दोन भाग केलेले होते. या घरात एक लिंगाच्या आकाराचा दगड उत्खननात सापडला आहे. हा दगड धार्मिक समजूतींशी निगडीत असून हे मांत्रिकाचे घर अथवा मंदिर असण्याची शक्यता आहे.

कवठे येथील उत्खननात काही दफनांचे पुरावेही मिळाले आहेत.

महाराष्ट्रातील माळवा, जोर्वे यांसारख्या इतर ताम्रपाषाण संस्कृतींच्या तुलनेत सावळदा संस्कृतीचे लोक अप्रगत अवस्थेत होते. प्रामुख्याने तापी नदीच्या खोऱ्यात विस्तार असलेल्या ह्या संस्कृतीचे लोक खानदेश भागात फार काळ टिकाव धरू शकले नाहीत.

संदर्भ :

  • Annual Bulletin of the Archaeological Survey of India, IAR 1958-59, 1959-60, 1974-75 & 1984-85, New Delhi.
  • Shinde, V. S. ‘Settlement Pattern of The Savalda Culture : The First Farming Community of Maharashtra’, Bulletin of the Deccan College Research Institute, Vol. 49, pp. 417-426, Pune, 1990.
  • ढवळीकर, म. के. महाराष्ट्राची कुळकथा, पुणे, २०११.

                                                                                                                                                                     समीक्षक : प्रमोद जोगळेकर