भारतीय ताम्रपाषाण युगातील एक महत्त्वाची संस्कृती. राजस्थानमधील बनास आणि भेडच नदीच्या काठी ही उदयास आली. याच नदीच्या काठी असणाऱ्या अहाड येथे ह्या संस्कृतीचे प्रथम उत्खनन झाले. त्यामुळे या संस्कृतीला अहाड आणि बनास संस्कृती असे म्हणतात. ही संस्कृती राजस्थानातील ‘मेवाड’ या नैर्ऋत्य भागात पसरली होती. साधारणतः इ. स. पू. ३००० ते इ. स. पू. १५०० म्हणजे जवळ जवळ १५०० वर्षे ही संस्कृती वेगवेगळ्या भागांत नांदत होती.
या संस्कृतीचा काळ वायव्य भागात वसलेल्या सिंधू संस्कृतीशी संलग्न असा आहे. त्यामुळे दोन्ही संस्कृती ह्या एकाच काळात वेगवेगळ्या ठिकाणी नांदत होत्या. ह्या संस्कृतीचे काही अवशेष हे मध्य प्रदेशातील माळवा भागात सुद्धा सापडले आहेत. बनास, कोठारी, गंभिरी, खरी आणि भेडच तसेच त्यांच्या उपनद्यांच्या काठी असलेल्या सु. १०६ ठिकाणी अहाड संस्कृतीच्या पाऊलखुणा अवशेषांच्या स्वरूपांत दिसून येतात. अहाड (१९५३-५४; १९६१-६२) येथे झालेले लहान प्रमाणातील उत्खनन आणि बालाथल (१९९४-९८; २००१), गिलुंड (१९५९-६०; २००५) येथे झालेले मोठ्या प्रमाणातील उत्खननामुळे आपल्याला अहाड संस्कृतीच्या सांस्कृतिक, सामाजिक तसेच आर्थिक स्थितीची पूर्ण कल्पना येते. उत्खनन झालेल्या ठिकाणी सापडलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांचा अभ्यास करून व रेडीओकार्बन पद्धतीने कालमापन केल्यानंतर ह्या संस्कृतीचे पुढील तीन टप्पे मानले गेले आहेत : १. प्रारंभिक काळ (३०००–२५०० इ. स. पू.); २. विकसित काळ ( २५००–२००० इ. स. पू.); ३. उत्तर काळ (२०००–१५०० इ. स. पू.).
अहाड येथील उत्खननात दोन स्तरांची संस्कृती दिसून आली. पहिली ताम्रपाषाणयुगीन आणि दुसरी म्हणजे प्राचीन ऐतिहासिक कालखंडातील होती. उत्खननातून समोर आलेल्या अवशेषांमधून आपल्याला त्यांच्या दैनंदिन राहणीमानातील सर्व वैशिष्ट्ये कळतात. अहाड संस्कृतीमधील लोक एक किंवा दोन अथवा अनेक खोल्या असलेल्या घरांत राहात असत. घरे आकाराने आयताकृती, गोलाकार किंवा चौरसाकार अशी होती. ही सर्व घरे एकतर दगड किंवा भाजलेल्या विटा आणि चिखल थापून बनवलेली असत. आकाराने मोठ्या असलेल्या घरांचा पायथा हा जवळ जवळ १ मी. रुंदीचे दगड वापरून भक्कम केलेला असे. बालाथल आणि गिलुंड येथे सार्वजनिक वास्तुकलेचे अवशेष मोठ्या प्रमाणात दिसून येतात.
अहाड संस्कृतीतील लोकांची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेती, पशुपालन आणि शिकार यांवर अवलंबून होती. उत्खननात मिळालेल्या अवशेषांवरून ते गहू, तांदूळ, सातू, तीळ, बाजरी, ज्वारी इत्यादी शेतमाल पिकवीत असत. तसेच गाय, बैल, मेंढीपालन, शेळी इत्यादी पाळीव प्राणी बाळगत असत. अनेक वन्य प्राण्यांची शिकार केली जात असे.
अहाड संस्कृतीचे तंत्रज्ञान हे पूर्णतः तांबे या धातूवर आधारलेले असे होते. अहाड संस्कृतीच्या ठिकाणी केलेल्या उत्खननात तांब्याची विविध अवजारे सापडली आहेत. उदा., कुऱ्हाड, तासणी, विविध आकाराच्या सुऱ्या, छिन्नी आणि विविध प्रकारची बाणांची टोके इत्यादी. काही दगडी हत्यारे तसेच हाडांपासून बनवलेली आणि गुळगुळीत केलेली छोटी टोकदार अवजारे सुद्धा वापरात असावीत. मौल्यवान दगडांपासून बनवलेले विविध प्रकारचे दागिने आढळून आले आहेत.
अहाड संस्कृतीमधील मृद्भांडी ही रंगीत होती. तसेच ती चाकावर तयार केलेली होती. त्यांतील काही कमी दर्जाची (उदा., जाड लालसर रंगाची आणि करड्या रंगाची), तसेच काही उत्कृष्ट बनावटीची (उदा., बारीक लाल रंगांची, काळी आणि लाल रंग मिश्रित आणि बदामी रंगांची) होती. यांतील चांगल्या बनावटीची मृद्भांडी ही मऊ मातीपासून बनवलेली आणि भाजून भक्कम केलेली अशी होती. बदामी रंगांची मृद्भांडी ही सिंधू संस्कृतीमधील मृद्भांड्यांशी साधर्म्य असणारी आहेत. मृद्भांडी ही ताटली, हंडी, वाडगे, पेला ह्या स्वरूपांत दिसून येतात. ज्यांचा उपयोग धान्य व पाणी साठवून ठेवण्यासाठी, तसेच दैनंदिन जीवनात केला जात असे. गिलुंड येथे झालेल्या उत्खननात विविध प्रकारच्या मातीपासून बनवलेल्या मोहरा (शिक्के) सुद्धा दिसून आल्या आहेत. त्यांच्यावर विविध प्रकारचे छाप कोरण्यात आलेले आहेत.
इ. स. पू. २००० पासून अहाड संस्कृती ही दक्षिण दिशेस माळवा भागाकडे स्थलांतरित झाली आणि पुढे त्यातून माळवा संस्कृती उदयास आली.
संदर्भ :
- Dhavlikar, M. K. Indian Protohistory, Books and Books, New Delhi, 1997.
- IAR (Indian Archaeology : A Review), Archaeological Survey Of India, New Delhi.
- Misra, V. N.; Shinde, V.; Mohanty, R. K.; Dalal, K.; Mishra, A.; Pandey L. & Kharakwal, J. ‘The Excavation At Balathal : their contributions to the Chalcolithic and Iron Age cultures of Mewar, Rajasthan’, Man and Environment 20 (1), 1995.
- Sankalia, H. D.; Deo, S. B. & Ansari, Z. D. Excavations at Ahar (Timbavati), Deccan College and Post-Graduate Research Institute, Pune, 1969.
- Shinde, Vasant; Sinha-Deshpande, Shweta & Sarkar, Amrita, Chalcolithic South Asia: Aspects of Crafts and technologies, Pentagon Press, New Delhi, 2016.
- जोगळेकर, पी. पी. ‘राजस्थान के अहाड संस्कृती के पुरास्थलोंसे प्राप्त प्राणी अवशेषोंका अवलोकन’, पुराप्रवाह, २: १२१-१२९, २०१७.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर