दासोपंतांचे लळीत : दासोपंत म्हणजे पंधराव्या शतकातील नाथपंचकातील एक पंडित संत कवी होत. पंचक म्हणजे मध्ययुगातील संत एकनाथ यांच्या समकालीन संतांचा समूह होय. यामध्ये संत एकनाथ, जनीजनार्दन, रेणुका नंदन, रामा जनार्दन आणि संत दासोपंत यांचा समावेश होतो. दासोपंत यांचा जन्म १४७३ मध्ये झाला. ते मुळचे कर्नाटकचे, बीदरच्या बहामनी बादशाहीत नारायण पेठ म्हणजे आत्ताचे गुलबर्गा येथील होते. पार्वती बाई आणि वडील दिगंबर पंत देशपांडे यांचे सुपूत्र, लहानपणापासूनच दत्ताचे निस्सीम भक्त होते. कर्नाटकमधुन भ्रमंती करत करत, दासोपंतांनी महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील अंबाजोगाईला आपली कर्मभूमी म्हणून निवडले. अंबाजोगाईच्या बुटेदरीत निर्मनुष्य शांतता असे; मात्र विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचे इथे साम्राज्यदेखील होते. औदुंबराच्या वृक्षाखाली बसून दासोपंतांनी अध्यात्मासारख्या अवघड विषयावर साहित्य निर्माण केले. प्रतीकांचा, रूपकांचा वापर करून अध्यात्माची निर्मिती करत, दासोपंतांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध आणि संपन्न केले आहे. त्यांनी एकट्या भगवत गीतेवर  पाच  ग्रंथ रचले असून त्यांनी रचलेल्या ग्रंथांची एकूण संख्या सव्वा लक्ष आहे. गीतार्थ बोध चंद्रिका  यात नऊ हजार ओव्या आहेत, तर पदार्णवांची संख्या सव्वा लक्ष आहे. शिवाय दत्त आख्यान सांगणारे, दत्ताच्या पूजाविधी सांगणारे, दत्ताची महती सांगणारे, आणि वेदांवर भाष्य करणारे विपुल ग्रंथलेखन दासोपंतांनी केली आहे. असे म्हणतात की, दासोपंत त्या काळामध्ये रोज एका ढब्बू पैशाची शाई संपेल एवढे लिखाण करत असत. शिवाय त्यांचे हस्ताक्षर ही अतिशय सुंदर व वळणदार होते. दासोपंतांनी रचलेली पासोडी हे त्यांच्या लेखनाचा, चित्रकलेचा उत्तम दाखला आहे. सौंदर्य, कलात्मकता, माधुर्य, सहजता, सरलता भाषेचा प्रसादिकपणा आणि लय या गुणांची साक्ष पासोडी मध्ये बघावयास मिळते. दासोपंतांनी रचलेली पासोडी ही चाळीस फूट लांब आणि चार फुट रुंद एवढ्या कपड्यावर आहे. यावर त्यांनी पंचीकरण म्हणजेच अध्यात्माच्या सोळाशे ओव्या चित्राकृती मध्ये रचल्या आहेत. दासोपंतांची पासोडी म्हणजे मराठी शारदेचे अमोल वस्त्र मानले जाते. दासोपंतांच्या साहित्यातील विविधता, विलक्षणपणा, सौंदर्य, कलात्मकता, वैचित्र्य हे पदोपदी दिसून येते. साहित्याच्या बाबतीत संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही दृष्टीने दासोपंत एकमेवाद्वितीय संतकवी आहेत. यांच्या लक्षावधी रचनांमुळे त्यांना ‘नवकोट नारायण’ असेही म्हटले जाते. दासोपंतांच्या विपुल साहित्य निर्मितीमुळे सर्जनशीलतेमुळे आजही वाचक, संशोधक, यांना आव्हान देत ते अजिंक्य उभे आहेत. मराठीसोबतच दासोपंतांनी संस्कृत, हिंदी, कन्नड, तेलगु, पंजाबी या भाषांमध्येही रचना केलेली आहे. अध्यात्मिक साहित्य रचनेमध्ये समाजजीवन आणि  लोकजीवन, संगीत, चित्र, वाद्य, नाट्य ,नृत्य या कलांचा समावेश करणारे दासोपंत हे एकमेव संत कवी होते. म्हणून दासोपंत यांना ‘ललितकला गुण निधी’ आणि ‘सर्वज्ञ’ असे म्हटले जाते. विपुल साहित्य संपदा निर्माण करणाऱ्या दासोपंतांनी वयाच्या पासष्टाव्या वर्षी देहत्याग केला. आजही दासोपंतांची समाधी अंबाजोगाईच्या नरसिंह तीर्थावर आहे. दासोपंतांचे वारसदार म्हणून एकमुखी दत्त देवस्थान धाकटे आणि थोरले देवघर म्हणून अंबाजोगाईत स्थित आहे. इथेच मार्गशीर्ष महिन्यात दोन्ही देव घरांमध्ये दासोपंतांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे दत्त नवरात्र उत्सव संपन्न होतो. दासोपंतांच्या रचना त्यांनी सांगितलेल्या विधिवत पुजा, आरत्या, शेजारत्या, पालखी सोहळे, जयंती सोहळे  इथे नऊ दिवस संपन्न होतात.

दासोपंतांनी नाट्य, नृत्य, संगीत रचना यांची विपुल निर्मिती  केली आहे. त्यापैकीच एक म्हणजे पदार्णवातील लळित पदे ही होत. लळित हा लोकनाट्य कलाप्रकार मराठी रंगभूमीचा आद्य प्रकार म्हणून ओळखला जातो. ‘लीला’ या शब्दावरून लीला नाट्य ते लळीत असा शब्द तयार झाला असावा. लळीत म्हणजे नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी गावयाचे मंगल गाणे किंवा सोंग आणून केलेले किर्तन असे अर्थ सांगितले जातात. या अर्थाने वरून गायन आणि कीर्तनाशी लळीताचा अनुबंध स्पष्ट होतो आणि लळीताच्या या स्वरूपाचा पुरेपूर प्रत्यय दासोपंतांच्या लळीत नाट्यातून येतो. दासोपंतांचे लळीत नाट्य मार्गशीर्ष महिन्यातील दत्त नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला केवळ अंबाजोगाई येथील धाकटे आणि थोरले देवघरात दत्तमूर्ती समोर सादर होते. दासोपंतांच्या लळीत पदांच्या संहिता यांचे विषय रूपकात्मक, कूट, खेळिया, नवल कोडे, सामाजिक, कौटुंबिक असे बहुस्पर्शी आहेत. या लळिता मध्ये गोंधळ जोगवा, भुत्या, दिवटी, डफ गाणे, वासुदेव, जात्यावरच्या ओव्या, बाळसंतोष या लोकसंस्कृतीच्या उपासकांवर आधारित पदे आहेत. सोबतच जोगी, जोगन, बैरागी, बेरगण, कानफाटे, जंगम, साधु  यांवर आधारित पदे आहेत. फुगडी पिंगा, कोंबडा याशिवाय नातेसंबंधात गृहस्थ भाऊ यावर आधारित पदे आहेत. सद्यस्थितीत यातील वीस ते पंचवीस पदांचे सादरीकरण होत असले तरी पन्नास ते पंचावन पदांच्या लळीतपदाचे हस्तलिखितही उपलब्ध आहे. दासोपंतांची पदे म्हणजे भक्ती नाट्यातून होणारा लोकशैलीचा समाज जागर आहे. तसेच याचे स्वरूप लोकसाहित्याच्या भक्ती रंगातून घडवलेला रंगपीठीय आविष्कारच आहे. या लळितामध्ये दासोपंतांच्या पदांची लिखित संहिता आणि दोन पदांच्यामध्ये उत्स्फूर्त संपादनी असते. या संपादनीमध्ये  सामाजिक, राजकीय, आर्थिक विषमता, समकालीन घटनांवर उत्स्फूर्त  भाष्य केले जाते. संपादनीतील संवाद लोकशैलीत, लोकभाषेत असतात. परंपरा हीच सादरकर्त्यांची दिग्दर्शक आणि प्रशिक्षक असते. सादरकर्ते अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने देवाला आळवत असतात. प्रत्येक पदानंतर, ‘आनंदे दत्तात्रेय देव देव, दासोपंत स्वामी महाराज की जय’ असा जयघोष होतो. सादरकर्ते स्वतःला रंगकर्मी म्हणण्याऐवजी ‘सोंग’ म्हणून घेतात. रंगभूषा, वेशभूषा यांच्यातही साधेपणा असतोतर नेपथ्य नसल्यातच जमा असते. संगीत, नृत्य नाट्य गायन-वादन यांचा सुरेख संगम असतो. लळिताचा प्रेक्षक हा सश्रद्ध मनाचा भाविक भक्त असतो, तरी क्रिया आणि प्रतिक्रिया या मुळे हा अविष्कार रंगत जातो. दिवसाच्याच समय मर्यादेत संपन्न होणाऱ्या लळितामध्ये नवता आणि परंपरांचा सुंदर सुमेळ असतो. पारंपरिक गायनाच्या चाली, वादये म्हणून, मृदुंग, तबला, टाळ, झांजा, संवादिनी पारंपारिक नृत्य यांचा लळितामध्ये समावेश दिसून येते. शतको शतके चालणाऱ्या लळितामध्ये स्त्रियांचा सहभाग केवळ पदे गाण्या पुरता प्रेक्षक म्हणूनच असतो किंवा एखाद्या क्रीडा प्रकारात असतो; मात्र या लळितात स्त्रियांचे सोंग नाही. एकूण लळित नाट्यात दृक-श्राव्य प्रत्यय येऊन अध्यात्मा सोबतच उच्चतम प्रकारची नाट्य अनुभूती मिळते.

संदर्भ :

  • https://www.discovermh.com/daso-digambarpant-deshpande/