गुरू अंगददेव : (३१ मार्च १५०४—२९ मार्च १५५२). शिखांचे दुसरे गुरू आणि ‘गुरुमुखी’ या पवित्र लिपीचे निर्माते. त्यांचा जन्म पंजाबमधील फिरोजपूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव भाई लेहना (लहणा) असे होते. सुरुवातीला ते देवी दुर्गाचे उपासक होते. शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांना भेटताक्षणी त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन भाई लहणा त्यांचे शिष्य बनले व निराकार भक्तीकडे वळले. निस्वार्थ भावनेने त्यांनी गुरू नानकदेवांची सेवा केली व वेळोवेळी त्यांनी घेतलेल्या परीक्षेत ते यशस्वी झाले. त्यानंतर गुरू नानकदेवांनी त्यांना आपले अंगस्वरूप मानून ‘अंगद’ हे नाव दिले व त्यांना आपले उत्तराधिकारी नेमले.
उत्तराधिकारी बनल्यानंतर त्यांनी गुरू नानकदेवांनी प्रारंभ केलेल्या श्रेष्ठ कार्यांना पुढे नेले. ते स्वतः एक कवी आणि प्रबुद्ध विचारक होते. त्यांनी पंजाबमधील अविकसित लिपीचे संशोधन करून तिला नवीन रूप दिले व गुरुमुखी लिपीची निर्मिती केली. ‘गुरुमुखी’ या नावामुळे त्या लिपीला धार्मिक महत्त्व आले आणि तिचा स्वीकार करणे हे पवित्र कार्य बनले. पर्यायाने शीख समुदाय संघटित होण्यास मदत झाली. गुरू नानकदेवांनी केलेल्या यात्रांच्या आठवणी आणि त्यांच्या शिकवणींचा संग्रह करण्यासाठी साहित्याची आवड असलेल्यांना त्यांनी प्रेरित केले, ज्याचा परिणाम म्हणून पंजाबी साहित्यात ‘जन्मसाखी-परंपरा’ विकसित झाली.
गुरू अंगददेव यांनी लंगर-प्रथा (सामुदायिक भोजनालय) पुढे सुरू ठेवली आणि या माध्यमातून जातीगत विषमतेला आळा घातला. विभिन्न प्रकारच्या अनिष्ट रीती व अंधविश्वासामध्ये जखडलेल्या शारीरिक आणि मानसिकरित्या दुर्बल समाजाला सबळ आणि निरोगी बनविण्यासाठी त्यांनी जागोजागी व्यायामशाळा बनविल्या. अशाप्रकारे शेवटपर्यंत त्यांनी जनकल्याण आणि गुरू नानकदेवांच्या शिकवणींचा प्रसार केला. शेवटी गुरू अमरदास यांना आपला उत्तराधिकारी करून त्यांनी आपला देह ठेवला.
संदर्भ :
- गाडगीळ, न. वि. ‘शिखांचा इतिहास’, पुणे, १९६३.
- जग्गी, रत्न सिंह, ‘गुरू मान्यो ग्रंथ’, नांदेड, २००८.
समीक्षक : परविंदरकौर महाजन
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.