खडसे, महादेवराव : (१६ फेब्रुवारी १९३१ – १२ मार्च २०१७ ). महाराष्ट्रातील प्रसिद्ध सनई वादक. विदर्भातील एकमेव सनई वादक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचे पूर्ण नाव महादेवराव हंगुजी खडसे असे आहे. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील नागपूर येथे अत्यंत गरीब कुटुंबात झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी वडील हंगुजी खडसे यांच्याकडून सनई वादनाचे शिक्षण घेतले. परंतु वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना जास्त काळ पितृछत्र लाभले नाही. त्यामुळे पुढील सनई व संगीत शिक्षण मामाकडे राहून पूर्ण केले. वडील आणि मामा यांच्याकडून त्यांना सनई वादनातील बारीक-सारीक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी आकाशवाणीची परीक्षा उत्तीर्ण केली. नंतर गुरु पं. बद्रीप्रसादजी, पं. जगदीश प्रसाद व पं.अण्णा क्षीरसागर यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेऊन स्वतःचे सनई वादन विकसित केले. नागपूर आकाशवाणीचे ते एकमेव सनई वादक होते. नागपूर दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन त्यांच्याच सनई वादनाने झाले. सनई, तिचे सूर, तिचा ताल आणि लय, गुरूचा वारसा आणि प्रचंड मेहनत या जोरावर त्यांनी स्वतःची वादनकला विकसित केली. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. ते मितभाषी होते.
शासकीय असो की खाजगी कार्यक्रम त्यांचे सनई वादन हे ठरलेले समीकरण असायचे. भारतात अनेक नामांकित संगीत संमेलनात त्यांनी हजेरी लावून आपल्या सनई वादनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना अनेक कार्यक्रमांत गोपाळराव वाडेगावकर,  शंकरराव पोपटकर, संपतलाल आणि जयकुमार या नामवंत तबला वादकांची साथ लाभली.  सनई एक मंगल वाद्य म्हणून ओळखले जात असायचे परंतु महादेवरावांनी या वाद्याला मैफलीतून स्थान देऊन या वाद्याची परिपूर्णता रसिकांना अनुभवास आणून दिली. ते सनईवर तोडी राग वाजवून वातावरण प्रसन्न करायचे तेव्हा या कलावंताच्या कलेतील परमोच्च गुणांचे दर्शन घडत जायचे. सनई वादन आणि सहकारी वर्गाची साथसंगत यांचा सुंदर मिलाफ घडवून आणताना त्यांनी संगीतातील शिस्तबद्धता कधीच ढळूच दिली नाही. ते आपल्या मधुर सनई वादनाने रसिकांचे संपूर्ण लक्ष आपल्याकडे खेचून घेण्यात अग्रेसर होते. तर अनावश्यक कसरती आणि हरकती ते मुद्दामहून टाळून त्यांचे सर्वस्वी लक्ष सनईवर होते. म्हणूनच त्यांच्याकडे सांगीतिक सच्चेपणावर रसिकांना मंत्रमुग्ध करणारे सनई वादक म्हणून बघितले जायचे.  ते सनई वादनाच्या अनुभवातून बरेच काही शिकले. त्यांनी स्वतःची वादनशैली निर्माण करीत असताना सनई वादनातील सौंदर्य, विविधता आणि सहजता यांची सुंदर ओळख केली.
खडसे यांच्या कार्यक्रमात सनईवर वाजवलेल्या विविध रागाची कौशल्यपूर्ण मांडणी ऐकून रसिकांनी अनेकदा टाळ्यांच्या प्रचंड निनादात कार्यक्रम प्रसिद्ध केले . त्यांच्या मैफीली ऐकण्यासाठी मुद्दामहून संगीत क्षेत्रातील अनेक समकालीन गायक, वादक मंडळी हजेरी लावत असायचे. म्हणूनच त्यांनी स्वतःचे सनई वादनाचे ज्ञान यावर रियाजाने हुकूमत गाजवली होती. त्यांच्या सनई वादनाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या रागांमध्ये ते सुंदर गुंफण घालायचे तेव्हा त्यांची एक अनोखी वैयक्तिक शैली म्हणून ती रसिकांना मंत्रमुग्ध होत जायची. त्यांचे सनई वादन गायकी पद्धतीचे होते.
सनई वादन हे वाद्य जसे मोठ्याने वाजवायचे तसे ते खालच्या पट्टीतही वाजवून मैफल रंगवण्याचे तंत्र त्यांना लाभले होते. सनईच्या विविध पैलूंचा अनुभव घेता आल्यामुळे त्यांची नैसर्गिक प्रतिभा त्यांच्या वादनातून झळकत राहायची. त्यांचे सनई वादन मध्य भारतात आणि नागपूर मध्ये खूप गाजले. निरनिराळे समारंभ, संगीत समारोहात त्यांना त्यांच्या सनई वादनाचा मोठा चाहता वर्ग लाभला.  त्यांच्या शिष्यांनी देखील त्यांच्या कडून सनई वादनाची कला शिकून घेतली. त्यांना लहान मोठे अनेक पुरस्कार मिळाले. २०१५ साली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. महादेवरावांनी भारतभर सनई वादनाचे स्वतंत्र कार्यक्रम केले. सनई वादनात नाविन्यता आणत वादन बहुरंगी करण्याचा ते प्रयत्न करायचे.  त्यांच्या सनई वादनाविषयीच्या अनेक मुलाखती वर्तमान पत्रातून प्रकाशित झाल्या.  सनईतील ताल-सुरांची गुंफण घालताना  सनई वाद्याशीच एकनिष्ठ राहत त्यांनी संगीताची सेवा मनोभावे केली. त्यांच्या घराण्याचा वारसा त्यांची मुले राजेश महादेवराव खडसे, विज्ञानेश्वर महादेवराव खडसे आणि नातू निखील राजेश खडसे चालवत आहेत.
वृद्धापकाळाने नागपूर येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ : क्षेत्रसंशोधन
समीक्षण : जगतानंद भटकर

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.