चांद केशर जैनू : (३० नोव्हेंबर १९४४ – ५ डिसेंबर २०२२) . संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रसिद्ध शाहिरा व कलावंत. त्यांचे पूर्ण नाव केशर जैनू चांद असे आहे. त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील आनेवाडी गावात एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण जेमतेम झाले होते. त्यांचे वडील गुलाबराव जगताप हे शाहीर व तमाशा कलावंत होते. १९५८ पासून त्यांचे शाहीर गुलाबराव जगताप आनेवाडीकर तमाशा मंडळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड गाजले होते. वडीलांच्या तमाशा मंडळात केशरताईंनी गायक कलावंत म्हणून वयाच्या चौदाव्या वर्षी सुरुवात केली. त्यांच्या गायन शैलीत एक वैशिष्ट्य होते. त्यांची गायनातील उत्कृष्ट अदाकारी प्रेक्षकांना खूप आवडायची त्यामुळेच त्या गायनासाठी खूप चर्चेत राहिल्या. वडिलांकडून कलेचा वारसा मिळत गेल्याने केशरताईची जडणघडण अद्वितीय राहिली. केशरताईनी अगदी लहानपणापासूनच कलेवर मनापासून प्रेम केले. केशरताईचा आवाज त्यांच्या सारखाच नाजूक आणि तलम रेशमी होता. त्यातूनच त्यांनी स्वतःचा कलाविष्कार निर्माण केला.
केशरताईचे वडील गुलाबराव जगताप यांनी काही काळ स्वतःचा तमाशा फड चालवून तो विसर्जित केला. पत्नी आणि दोन मुलींसह ते आनेवाडीतून मुंबईत आले. त्याकाळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोर धरला होता. त्यावेळेस महाराष्ट्रात एक बुलंद आवाजाच्या ध्येयवादी लोकशाहीर अमर शेख यांच्या कलापथकाचे सामाजिक प्रबोधनाचे वातावरण ढवळून निघाले होते. लोकशाहीर अमर शेख यांच्या विचारांनी केशरताई प्रचंड भारावल्या होत्या. तमाशाच्या फडात जीवन बरबाद करण्यापेक्षा त्यांनी अमर शेख यांच्या कलापथकात सहभागी होऊन देशसेवा व समाजसेवा करावी असे ठरविले. संघर्षाच्या परिस्थितीत त्या अमर शेख यांच्या कलापथकात सामील झाल्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम चळवळ आणि भारत-चीन आक्रमणाच्या आंदोलनात केशरताईनी एक स्त्री असूनही पुरुषांच्या बरोबरीने एक पाऊल पुढे टाकत कार्य केले. या माध्यमातून त्यांनी अनेक पोवाडे, लोकगीते, क्रांतीगीते जोरकसपणे गायली. केशरताई स्वभावाने कायम नम्र होत्या. वेगवेगळ्या लोकनाट्यातून विविध भूमिका त्या सहजसुंदर अभिनयातून साकारत असत तेव्हा त्यांना प्रेक्षकाच्या टाळ्या हमखास मिळत. शाहीर अमरशेख जेव्हा गगनभेदी आवाजातून गाणे गायचे तेव्हा त्यांना केशरताई आपल्या नाजूक आणि जादूई आवाजातून आलाप देत असत. त्यावेळी कार्यक्रमात खूपच रंगत यायची.
कवी नारायण सुर्वे यांची ‘डोंगरी शेत माझं गं, मी बेनू किती? ही कविता जेव्हा अमर शेख गायचे तेव्हा त्यासाठी केशरताईची लाभलेली साथ अद्वितीय मिश्रण ठरत असायची. त्यामुळेच ऐकणाऱ्यांचे कान तृप्त होत राहायचे. चळवळीत राहून त्यांनी स्वतःची एक वैयक्तिक गायनशैली निर्माण केली ती अमर राहिली. त्यांच्या शाहिरीत सौंदर्य, विविधता, सहजता आणि देशप्रेम यांची जाणीव होती. अमर शेख, अण्णाभाऊ साठे या प्रतिभावंत शाहिरांना आदरयुक्त नायक मानून या कलावंतिनीने आपल्या सुरेल आवाजाने समाजप्रबोधनाच्या चळवळीत एक वेगळा ठसा निर्माण केला.
शाहीर अमर शेख आणि केशरताईचे वडील गुलाबराव जगताप यांचे २९ ऑगस्ट १९६९ रोजी अपघातात निधन झाले. त्यानंतर त्या अमर कला पथकाच्या माध्यामातून अधिक सक्रीय राहिल्या. याच दरम्यान त्यांनी शाहीर जैनू चांद यांच्याशी विवाह केला. पुढे या पती पत्नीने अमर कला पथक चालवून सामाजिक प्रबोधनचा वसा चालू ठेवला. या पथकाकडून सामाजिक विषयावरील अनेक नाटके आणली. गावोगावी नाटकाचे प्रयोग होताना त्यांच्या कलेचे कौतूक व्हायचे. नाटकांच्या प्रयोग व शाहिरीच्या कार्यक्रमातून मिळालेल्या पैशातून त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांना मदत केली. संगीतकार दत्ता डावजेकर, विश्वनाथ मोरे, तुकाराम शिंदे या संगीतकारांनी केशरताईच्या अनेक लावण्या स्वरबद्ध केल्या. त्याचबरोबर आकाशवाणी, दूरदर्शन या प्रसार माध्यमातून त्यांनी गाणी देखील गायली. कवी ना.धो.महानोर, नारायण सुर्वे यांच्या कविता आणि लावण्या वेगळ्या ढगांत गाऊन एक वेगळेपण सिद्ध केले. केवळ अभिनय किंवा गायन न करता सर्वस्व अर्पण करून त्यांनी शाहीरी कला जोपासली. त्यांना सई परांजपे यांच्या दिशा या हिंदी चित्रपटात नाना पाटेकर यांच्या बहिणीची छोटीशी भूमिका करण्याचा योग आला.
केशरताईनी मुंबईतील गिरणी कामगारांच्या चळवळीतही सांस्कृतिक प्रबोधन केले. एका ठिकाणी त्या कार्यक्रमास गेल्या असता त्यावेळी त्यांना गरोदरपणाची नऊ महिने पूर्ण झाली होती. कार्यक्रम पूर्णत्वाकडे जात असताना त्यांना प्रसवकळा सुरु झाल्या. तरीही न डगमगता त्या कार्यक्रमास साथ देत राहिल्या हे कदापि विसरता येत नाही. यातून त्यांची कलेप्रतीची निस्सीम भावना अधोरेखित होते. सामाजिक प्रबोधनाचा वारसा जपण्यासाठी त्यांनी केलेली कलेची सेवा सर्वश्रूत राहिली. या कार्याचा गौरव म्हणून त्यांना जवळपास पाच पुरस्कार मिळाले. जीवनात संघर्षाला तोंड देत त्यांनी कलेद्वारे सांस्कृतिक प्रबोधनाचे मोठे कार्य शेवटपर्यंत केले. त्यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले.
संदर्भ : क्षेत्र संशोधन
समीक्षण : जगतानंद भटकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
