गुरू रामदास : (२४ सप्टेंबर १५३४—१ सप्टेंबर १५८१). शिखांचे चौथे गुरू. मूळ नाव भाई जेठा. त्यांचा जन्म लाहोरमधील चुना मंडी येथे झाला. वडिलांचे नाव हरिदास, तर आईचे नाव दया कौर. भाई जेठा यांना लहानपणापासून अध्यात्माचे आकर्षण होते. शीख अनुयायींसोबत ते गुरू अमरदास (१४७९–१५७४) यांना भेटण्यासाठी गोइंदवाल येथे गेले. तेथे त्यांनी गुरू अमरदास यांची मनोभावे सेवा केली. त्यांच्या नम्र स्वभावाने प्रेरित होऊन गुरू अमरदास यांनी त्यांची मुलगी बीबी भानी यांचे लग्न त्यांच्याशी लावले. पृथ्वी चंद, महान देव आणि अर्जुन ही त्यांची तीन मुले. पुढे गुरू अमरदास यांनी भाई जेठा यांना योग्य उत्तराधिकारी मानले. १५७४ साली गुरुपद देऊन त्यांना रामदास (ईश्वराचा सेवक) असे संबोधले.

गुरू रामदास यांचे कार्य मुख्यत्वे रामदासपूर शहराच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी गुरू अमरदास यांच्या कारकिर्दीतच ‘गुरू का चक्क’ ही वस्ती बांधण्यास सुरू केली. तसेच विविध व्यापारी आणि व्यावसायिकांना तेथे जागा उपलब्ध करून दिली. त्यांनी विविध सामाजिक स्तर आणि व्यवसायातील लोकांना एकत्रित या शहरात वसवले. हळूहळू हे ठिकाण व्यावसायिकांचे केंद्र बनले. याच ठिकाणाला रामदासपूर म्हणून ओळखले जाते. आज रामदासपूर हे शहर, शीख धर्माचे पवित्र केंद्र, अमृतसर या नावाने जगप्रसिद्ध आहे. शहर निर्मितीसोबतच गुरू रामदास यांनी शहराच्या पूर्वेकडे पवित्र कुंड खोदण्याचे काम सुरू केले. पुढे या कुंडास अमृतसरोवर असे नाव दिले गेले. शिखांचे तीर्थक्षेत्र बनविण्याच्या उद्देशाने सरोवराच्या मध्यभागी असलेल्या बेटावर सध्याच्या सुवर्णमंदिराच्या बांधकामास त्यांनी सुरुवात केली. पुढे त्यांचा मुलगा, शिखांचे पाचवे धर्मगुरू अर्जुनदेव (१५६३–१६०६) यांनी ते बांधकाम पूर्ण केले.

शीख धर्माच्या प्रसाराचे संतुलन राखण्यासाठी आणि गुरू दरबार व लंगरची परंपरा चालू ठेवण्यासाठी त्यांनी ‘मसंद परंपरा’ सुरू केली.

गुरू रामदास हे एक प्रतिभावान कवी होते. शीख धर्मग्रंथ ‘ग्रंथसाहिब’मध्ये त्यांचे ३० रागांमधील एकूण ६३८ पद आणि श्लोक संगृहीत आहेत. त्यांनी ‘लावां’ रचले. शीख धर्मात विवाह सोहळ्याला ‘आनंद कारज’ म्हणतात. शीख विवाह परंपरेत वधूवर गुरू ‘ग्रंथसाहिब’ला चार वेळा प्रदक्षिणा घालतात. याप्रसंगी रागी (कीर्तनकार) हे लावें क्रमाने गातात.

गुरू रामदास यांच्या वाणीत सेवा, समर्पण, साधेपणा, प्रेम, नावरूपी रत्न आणि गुरूचे महत्त्व यांचे वर्णन मिळते. ‘शब्द हे गुरू असल्याचे आणि गुरू हे शब्द असल्याचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणतात “बाणी गुरू, गुरू है बाणी। विचि बाणी अंम्रितु सारे॥”

गोइंदवाल येथे ते ब्रह्मलीन झाले.

संदर्भ :

  • पदम, प्यारासिंह, ‘संक्षेप सिक्ख इतिहास’, अमृतसर, २०१३.
  • महाजन, राजींदरकौर, ‘श्री गुरू ग्रंथसाहिबजी में अभिव्यक्त मानवता’, दिल्ली, २०२३.

समीक्षक : राजिंदरसिंह तेजासिंह पानेसर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.