शर्मा, मनमोहन : (१ मे १९३७). भारतीय रासायनिक अभियंता. भारत सरकारने त्यांच्या कार्याबद्दल त्यांना पद्मभूषण (१९८७) आणि पद्मविभूषण (२००१) आणि अभियांत्रिकी विज्ञानातील शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार (१९७३) यांनी सन्मानित केले.
शर्मा यांचा जन्म राजस्थानमधील जोधपूर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण जोधपूर येथेच झाले. मुंबई विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आता इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी) विभागातून त्यांनी रसायन तंत्रज्ञान शाखेची बी.केम. (१९५८) आणि एम.एस्सी. (टेक) (१९६०) पदव्या संपादन केल्यात. त्यानंतर पीटर डन्कवर्र्टस यांच्या मार्गदर्शनाखाली केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळवली (१९६४). त्यानंतर भारतात त्यांची युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली आणि नंतर त्यांनी या विभागाचे संचालकपदही भूषविले.
शर्मा यांनी युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथील कार्यकाळात विभागात अनेक सुधारणा केल्या आणि विभागाचा दर्जा सर्वदृष्टीने उंचावला. त्यांच्या संशोधन कार्यातील काही महत्त्वाची संशोधने पुढीलप्रमाणे : एकाधिक प्रक्रियामध्ये सूक्ष्म टप्प्यांची भूमिका (Role of microphase in multiple reactions), कार्बन डायऑक्साईडच्या ब्रॉनस्टेड आधारित उत्प्रेरक उपस्थितीत केलेल्या सजलीकरण (Hydration) क्रियेचा अभ्यास, त्यानंतर कार्बन डायऑक्साइड (CO2) आणि कार्बोनिल सल्फाइड (COS) यांच्या अमाइन्स आणि अल्केनॉल अमाइन्स (Amines and alkanol amines)च्या द्रावणातील शोषणक्रियेच्या गतिशास्त्रावरील अभ्यास. सदर शोषण प्रक्रियेतील कार्बन डायऑक्साइड आणि कार्बोनिल सल्फाइड यांच्यातील रेखीय मुक्त ऊर्जा संबंध (linear free relationships) लक्षात आले. त्यांनी केलेल्या संशोधनातून अनेक रासायनिक प्रक्रिया निर्माण झाल्या. क्रियाधानी (रिॲक्टर) बाबतचे त्यांचे कार्यही नानाविध प्रकारचे आहे. सूक्ष्म (मायक्रो) अथवा अब्जांश (नॅनो) कणांवरील त्यांच्या संशोधनांमुळे वस्तुमान बदलाचे (मास ट्रॅन्सफर) प्रमाण विशिष्ट प्रक्रिया घडून येण्यास कारणीभूत ठरले आहे. संशोधनकार्याव्यतिरिक्त शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातदेखील त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.
शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली २००८-०९ मध्ये राष्ट्रीय उच्च शिक्षण आणि संशोधन समिती (नॅशनल कमिटी फॉर हायर एज्युकेशन अँड रिसर्च; NCHER) स्थापन करण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विशेष साहाय्या योजना (SAP) अंतर्गत आयोगाने प्रगत अभ्यास केंद्र (CAS) आणि डिपार्टमेन्ट ऑफ स्पेशल असिस्टन्स (DSA) द्वारा संचलित उन्हाळी आणि हिवाळी शाळांचे संलग्नीकरण करून त्यांना भरीव आर्थिक सहाय्य उपलब्ध केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली उच्च शिक्षण पद्धतीच्या पुनर्रचनेसाठी १५०० विद्यापीठांचा सहभाग असलेली ग्यानम समिती (Gnanam Committee) स्थापन करण्यात आली. पेट्रोलियम आणि वायू विभागाच्या सायंटिफिक ॲडव्हायजरी कमिटीचे (SAC) अध्यक्ष या भूमिकेतून त्यांनी मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित कामकाजात महत्त्वाचे योगदान दिले. अनेक उद्योग धंद्यानाही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांना पुढीलप्रमाणे अनेक पुरस्कार प्राप्त झाले : फिक्की पुरस्कार (१९८१), इन्साचे विश्वकर्मा पदक (१९८५), जी. एम. मोदी. पदक (१९९१), मेघनाद साहा पदक (१९९४), रॉयल सोसायटी (ब्रिटन)चे लिव्हरह्यूम पदक, इन्साचे प्रमोशन अँड सर्विस टू सायन्स पदक. तसेच ते सर जगदीशचंद्र बोस मेमोरिअलचे व्याख्याता, प्रसिद्ध विद्यापीठांचे डी.लिट आणि मुंबई विद्यापीठाचे डी.एस्सी. असे अनेक सन्मानही मिळाले. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो हा सन्मान मिळविणारे भारतीय तंत्रज्ञ होत. इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स (बंगळुरु) या संस्थेचे फेलो (FASc.), अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे (प्रयागराज ) फेलो (FNASc.), रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनियरिंगचे (लंडन) फेलो (FREng.) आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेसचे ते फेलो (FTWAS.) आहेत. इंडिअन नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे (INSA) ते अध्यक्ष आणि नंतर सल्लागार समितीमध्येही होते.
कळीचे शब्द : #उत्प्रेरक #सजलीकरण #रिॲक्टर
संदर्भ :
- https://en.mwikipedia.org
- https://www.insaindia.res.in
- https://www.ictmumbai.edu.in
- https://in.linkedin.com.dr.m-m-sharma
समीक्षक : श्रीनिवास केळकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.