यासीन बालालाल महाब्री : ( १५ मे १९३७ – ८ डिसेंबर१९९९). महाराष्ट्रातील प्रसिद्ध तबला, ढोलकी, पखवाज, संबळ, हालगी वादक. त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या बहादुरवाडी ता. वाळवा जि. सांगली येथे एका गरीब मुस्लीम कुटुंबात झाला. लहान वयातच घरातील हाताला लागेल ते साधन वाजवण्याचा छंद त्यांना होता. त्यातूनच त्यांना विविध चर्मवाद्याविषयी आवड निर्माण झाली. तबला, ढोलकी, पखवाज, दिमडी, हालगी, संबळ, ताशा, चौघडा, डमरू, डफली, ढोलक अशी १४ प्रकारची चर्मवाद्ये एकाचवेळी वाजवण्याचा प्रकार रूढ करून त्यांनी या लोककलेत नावलौकिक मिळवला. याशिवाय शास्त्रीय एकल तबलावादन ही त्यांची विशेष खासियत होती. सांस्कृतिक कार्यक्रमात यासीन महाब्री हे नाव दिसले ही प्रेक्षकांची हमखास गर्दी हे समीकरण बनले होते.
यासीन बालालाल महाब्री यांचे वडील बालालाल महाब्री हे मुस्लीम असूनही रोज रात्री गावातील मंदिरात भजनासाठी जायचे. पोटासाठी मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करायचे. आपला मुलगा यासीनचा वाजवण्याचा छंद आणि आवड बघून वडिलांच्या मनात यासीनला तबला शिकवायला पाहिजे असा विचार आला. १९६० च्या सुमारास गाव सोडून ते कुटुंबासह कोल्हापुरात राहण्यास आले. पुढे वडिलांनी यासीन यांना वयाच्या ९ व्या वर्षापासून कोल्हापुरातील प्रसिद्ध असलेले तबला विभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांच्याकडे गुरूकुल पद्धतीने तबला शिकण्यासाठी ठेवले. त्यांना तबला शिकत असताना पैशाची चणचण नेहमीचीच भासत रहायची त्यामुळे त्यांनी सांगलीतील गोकुळ लोकनाट्य तमाशातील संगीतबारीत लीला गांधी, उषा चव्हाण, संजीवनी बिडकर यांच्या कला पथकामध्ये तबला- ढोलकी वाजवण्यास सुरुवात केली. ते तबला वाजवण्यात तरबेज तर होतेच परंतु तमाशा क्षेत्रात ढोलकीची जास्त गरज आहे म्हणून त्यांनी ढोलकी हातात घेतली. त्यांचा पुढे जास्तीत जास्त ओढा ढोलकी वादनाकडे राहिला. तबल्यावर बोटांनी अधिराज्य गाजवलेले असल्यामुळे त्यांनी ढोलकीला तबल्याच्या पद्धतीने वाजवून एक वेगळाच बाज निर्माण करण्यात ते यशस्वी झाले.
गुरु बाबासाहेब मिरजकर यांच्या सानिध्यात राहून वादनाचे शास्त्रीय धडे गिरवण्याचा योग आला. यासीन यांचे प्राविण्य बघून गुरु मिरजकर थक्क होत असायचे. येथे मिळालेले ज्ञान नंतरच्या काळात यासीन यांना पुढील वाटचालीसाठी उपयोगी पडले. यामुळे हे गुरु शिष्यांचे नाते शेवटपर्यंत अतूट राहिले. दुसऱ्यासोबत काम करण्यापेक्षा आपणच लोकनाट्य मंडळ स्थापन करुन नर्गीस बानू, उमा, सूर्यकांत मांढरे, राजशेखर यांना सोबत त्यांनी कार्यक्रम करणे सुरू केले. यात ‘उसाला लागल कोल्हा’, हे पहिले लोकनाट्य सुरू केले. हे लोकनाट्य अल्पावधीतच प्रसिद्ध झाले. नंतर त्यांनी भरतार माझा कोल्हापुरी, बहुरूपी, तू तर चाफेकळी, आमदार, छंद प्रीतीचा अशी एकापाठोपाठ एक लोकनाट्य सादर करून रसिक मान्यता मिळवली. जेजुरीच्या लावणी गायिका रोशनबाई सातारकर यांच्यासोबत ‘लावणीचा सवाल ढोलकीचा’ हा आगळावेगळा कार्यक्रम सादर करून त्यांनी कलाक्षेत्रात एक वेगळेपण निर्माण केले. यानंतर चित्रपट व्यवसायात ढोलकी व तबला याचे पार्श्वसंगीत देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सुधारलेल्या बायका, खंडोबाची आण, काठी बायको, रंगू बाजाराला जाते,चला उठा लग्न करा, कोल दे खंडेराया,डाळिंबी, थापाड्या अशा अनेक दर्जेदार चित्रपटात ढोलकी व तबला वादनाची उत्तम साथ दिली.
वाद्यातील तालावर हुकमत गाजवलेल्या यासीन यांनी त्यांच्या वादनातून एकाच वेळी चौदा वाद्यावर आपल्या जादुई नजाकतीने एक वेगळेपण जपले होते. त्यामुळे रंगमंचावर एकाच वेळी सगळी वाद्ये वाजण्याचे त्यांचे कौशल्य पाहणा-या रसिकांसाठी हा अविस्मरणीय अनुभव असे. ढोलकीला राज्यमान्यता मिळवून देताना, ढोलकी कशी असावी, ती कशी वाजवावी आणि तिचे प्रत्येक बोल किंवा लय कशी असावी या सूक्ष्म गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला होता. सर्वच प्रकारची चर्मवाद्य वाजवण्यात ते पारंगत होते. या सर्व वाद्यांना तालप्रधान आणि भावपूर्ण वाद्य म्हणून त्यांनी विकसित केले.एकताल, दादरा, दीपचंदी या प्रकारचे ताल , कायदे,रेले, तुकडे-मुखडे, चक्रधार वाजवण्यात त्यांचा विशेष हातखंडा होता. त्यांचे लईकारीवर प्रचंड असे प्रभुत्व होते. त्याचबरोबर शास्त्रशुद्ध एकल (सोलो) ताशावादन, हालगी व ढोलकीची जुगलबंदी यात ते अग्रेसर असत.
यासीन यांनी आपल्या संपूर्ण हयातीत ढोलकीला जगभर मान्यता मिळवून दिली. १९७२ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांनी यासीन महाब्री यांचा एक ढोलकीवादनाचा कार्यक्रम पाहिला आणि त्याचवेळी सर्व रसिकांच्या समोर त्यांना ढोलकी सम्राट ही पदवी बहाल केली. तसेच महाराष्ट्र शासनातर्फे एकाचवेळी चार तालवाद्ये वाजविण्याचा विक्रम करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव कलाकार म्हणून त्यांना गौरविण्यात आले. वाद्यावर बोटांची जादू दाखवून रसिक प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या या कलावंताने महाराष्ट्राच्या लोककलेवर, विविध वाद्यावर भरभरून प्रेम केले.
यासीन महाब्री यांनी पांडुरंग मठपती यांना वयाच्या सातव्या वर्षी दत्तक घेऊन वाढवले आणि सांभाळ केला. त्यांना आपला वारसदार बनवले. त्यांच्या ‘ताल बरसात’ या ध्वनीफितीने इंग्लंड, जपान, अमेरिका, मॉरिशस आणि दुबई या देशातही प्रचंड लोकप्रियता मिळवली. तेथे या ध्वनीफितीने विक्रीचा विक्रम केला. शेवटपर्यंत ढोलकीसाठीच आयुष्य समर्पित करणाऱ्या या प्रतिभासंपन्न ढोलकीसम्राटाचे वृद्धापकाळाने निधन झाले.
संदर्भ : क्षेत्रसंशोधन
समीक्षक : जगतानंद भटकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.