पाली साहित्यातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ. ‘पंचगतिदीपनी’ हा ग्रंथ बौद्ध संस्कृत ग्रंथ ‘षड्गतिकारिका’चे पाली भाषांतर आहे. अश्वघोषाला ‘षङ्गतिकारिका’चे रचनाकार मानतात. तसेच या ग्रंथाचा संबंध वात्सीयपुत्रीय-सम्मितीय संप्रदायाशी होता. कालांतराने नवव्या ते बाराव्या शतकामध्ये ‘षङ्गतिकारिका’ची अनुक्रमे चीनी, तिबेटी व पाली भाषांमध्ये भाषांतरे झाली. पालीमध्ये ‘षड्गतिकारिका’चे ‘छगतिदीपनी’ या नावाने म्यानमार येथे भाषांतर झाल्याचे आढळते. या ग्रंथावर म्यानमार व कंबोडियामध्ये संशोधन सुरू होते. ‘छगतिदीपनी’ ग्रंथातील असुर गतीचा सहावा कण्ड अनुवादकर्त्याने प्रेतकण्डभागात समाविष्ठ केला. त्यामुळे ग्रंथाचे नाव पंचगतिदीपनी असे झाले. ग्रंथनाम बदलाची माहिती पंचगतिदीपनी-अट्ठकथेत मिळते. त्यानंतर या ग्रंथाचा समावेश थेरवाद परंपरेतील ग्रंथ साहित्यात करण्यात आला.

मज्झिमनिकायातील महासीहनाद सुत्तामध्ये बुद्ध सारिपुत्ताला उपदेश देताना पुढीलप्रमाणे सांगतात :

“पंच खोइमा,सारिपुत्त,गतियो|कतमा पंच ? निरयो,तिरच्छानयोनी, पेत्तिविसयो,मनुस्सा,देव|”

अर्थात,“सारिपुत्र, या पाच गती आहेत. कोणत्या पाच? नरक,तिर्यक (पशुपक्षी), प्रेत,मनुष्य आणि देव.”

पाली त्रिपिटकामध्ये सुद्धा ‘गती’ हा शब्द अभिसम्पराय या शब्दासमवेत प्रश्नार्थक स्वरूपात विचारला आहे. उदा., “तस्स का गति अभिसम्परायोति?” याचा अर्थ मृत्यूनंतर त्याला कोणती पारलौकिक अवस्था प्राप्त झाली ? गती हा शब्द ‘मृत्यूनंतरचे जीवाचे अस्तित्व’ या अर्थाने पाली त्रिपिटकामध्ये आढळतो. पंचगतिदीपनी या ग्रंथात एकूण ११४ गाथा आहेत.

त्या पाच भागांमध्ये (पाचकण्ड) पुढीलप्रमाणे विभागल्या आहेत :

मंगलाचरण (४ गाथा): यागाथांनी ग्रंथाची सुरुवात होते.

  • नरककण्ड (४०गाथा): (अ) अट्ठमहानरक (१७ गाथा),(ब) निरयुस्सदा (२३ गाथा)
  • तिरच्छानकण्ड (७गाथा)
  • पेतकण्ड (१८गाथा): (अ) पेत(८ गाथा), (ब) कुम्भण्ड (८ गाथा), (क) असुर (२ गाथा)
  • मनुस्सकण्ड (३३गाथा)
  • देवकण्ड (१२ गाथा)

‘पंचगतिदीपनी’ ग्रंथाचा मुख्य विषय नरक,पशुपक्षी, प्रेत, मनुष्य व देव या पाच गतींवर आधारित आहे. मनुष्य ज्या गतीतजन्म घेतो, त्यावर त्याचे सुख व दु:ख तसेच पारलौकिक अवस्था अवलंबून असते.या गती मनुष्याच्या कर्मावर आधारित आहेत,हे सांगण्याचा प्रयत्न या ग्रंथात करण्यात आला आहे. गतींची संकल्पना,मृत्यूनंतर स्वर्ग आणि नरकात जाणाऱ्या प्राण्यांची सर्वसाधारण उदाहरणे देऊन सोप्या भाषेत स्पष्ट केलेली आहे. उदा., मनुष्यांमध्ये जो विश्वासघातकी असतो,त्याला तलवारीसारखे पाते असलेल्या जंगलामध्ये तुकडे करून फेकले जाते, तो रडत असला,तरी त्याला कुत्रे, गिधाड, घुबड खात राहतात. लोक अनैतिक व वाईट कर्मापासून दूर राहावेत या हेतूने अनुवादकर्त्याने या ग्रंथात अशाप्रकारची उदाहरणे देऊन पाच गतींचे सखोल विवेचन केले आहे.बौद्ध धर्मानुसार वर्तमान किंवा मागील जन्मातील केलेल्या कृत्यानुसारच प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असतो. पाली साहित्यामध्ये स्वर्ग आणि नरक यादैवी संकल्पना नाकारूनस्वतःद्वारे केलेले चांगले वा वाईट कार्य हे कर्मफलाच्या सिद्धांतावर अवलंबून आहे, असे सांगितले आहे. ‘पंचगतिदीपनी’चे फ्रेंच, इंग्रजी, हिंदी, मराठी, बंगाली भाषेत अनुवाद झाले आहेत.

 

संदर्भ :

  • Feer, M. Léon, PAÑCAGATI-DĪPANA,Journal of Pali Text society,London,1884.
  • Hinüber, Oskar Von, A Handbook of Pāli Literature, Walter de Gruyter, Berlin,1996.
  • उपाध्याय, भरतसिंह, पाली साहित्य का इतिहास,हिन्दी साहित्य संमेलन, प्रयाग, १९९४.
  • कुमार, उज्ज्वल,पंचगतिदीपनी (मूल पालि, हिन्दी अनुवाद एवं व्याख्या),डी.के.प्रिंटवर्ल्ड(प्रा.) लि., दिल्ली.२०२५.                                                                                                                                                                                                                                                                                    समीक्षक :नीरज बोधी