कदम, गुलाबराव : ( २४ ऑगस्ट १९४६ – ७ जानेवारी २०२६). गुलाबराव राधाकृष्ण कदम. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गोंधळ महर्षी. ते पारंपरिक गोंधळी म्हणून सर्वत्र परिचित होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील परभणी येथे झाला. त्यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले. त्यांनी गोंधळ कलेला स्थानिक सोबत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना गोंधळ महर्षी या नावाने ओळखले जाते. गुलाबराव यांना गोंधळाचा वारसा आपले वडील राधाकृष्ण, आजोबा राजाराम बापू यांच्याकडून मिळाला. वडील व आजोबांच्या सानिध्यात राहून त्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून गोंधळ ही लोककला शिकून घेतली. प्रेरणेने आणि परंपरागत पद्धतीने मिळालेल्या या कलेतून त्यांनी महाराष्ट्राचे लोकवैभव असलेल्या गोंधळ लोककलेचा प्राचीन इतिहास मांडला. गोंधळ कलेतून त्यांनी कदमराई गोंधळ हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकार पुढे चालू ठेवला. गोंधळ कला प्रकार सादर करताना मुद्राभिनय, गायनातील स्वरमनी, उत्तम संवाद आणि अद्वितीय नृत्य याला विशेष स्थान दिले. त्यामुळे त्यांनी सादर केलेला गोंधळ कला प्रकार रसिकप्रिय ठरला.
गुलाबराव यांचे वडील राधाकृष्ण बापू कदम यांनी परंपरेने लाभलेला गोंधळ कलाप्रकार सुरु ठेवला. ते शुभ प्रसंगी जसे की लग्न, वास्तुशांती, मुंज, नवस पूर्ण करण्यासाठी गोंधळ कार्यक्रम करायचे. गुलाबराव यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत ही कला आत्मसात केली. घरात पूर्वापार सर्वच जन गोंधळ कला शिकलेले असल्यामुळे त्यांना या कलेने मोठे केले. ते ऐकून, बघून उत्तम प्रकारे गायन करायचे. गुलाबराव संबळ, तुणतुणे, दिमडी, झांज इत्यादी वाद्ये वाजविण्यात देखील पारंगत होते. त्यांनी ताल आणि लय यावर हुकमत मिळवलेली होती. ते गोंधळ कलाप्रकार ताकदीने सादर करण्यासाठी सतत नवनवे प्रयोग करण्यासाठी प्रयत्नशील राहिले. मराठी मातीत रुजलेल्या, नाविन्यपूर्ण झालेल्या आणि घराघरात सर्वत्र पोहोचलेल्या गोंधळ या कला प्रकाराला गल्लीपासून थेट सातासमुद्रापार नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. गोंधळ कला सादर करताना त्यांनी आयुष्यभर आई जगदंबेची उपासना आपल्या सुश्राव्य गायनातून साकार केली.
गोंधळ कला सादर करताना त्यांचा पहाडी आवाज राहायचा. श्रोत्यांसमोर कला सादर करताना करडी नजर आणि कलेत जीव ओतून काम करायचे. ते ६० मीटरचा अंगरखा आणि दीडशे हातांचे पागोटे घालून अत्यंत ताकदीने गोंधळ सादर करायचे तेव्हा त्यांच्या कलेतून अलौकिक अनुभव प्रेक्षकांना येत राहायचा. मुद्राभिनयात वाकबगार असलेले गुलाबराव गोंधळामध्ये प्रथम देवीदेवतांचे आवाहन उत्तम प्रकारे मांडायचे. त्यानंतर त्यांचे साथीदार संभळ, सोलोवादन, देवी महात्म्य, गुरुवंदन हे गोंधळाचे पूर्वरंग मांडायचे त्यावेळी सहकलावंतांना गुलाबरावांनी दिलेली प्रेरणा अफलातून राहायची. कार्यक्रमात पांडवप्रताप, विक्रमपुराण, जांभूळ आख्यान, दैवी भागवत, हरीविजय, बहिण भावाची कहाणी, नवनाथ सार आदींचा समावेश करून गुलाबराव कार्यक्रमात रंगत आणायचे. यात गोंधळ करणारा प्रमुख सरदार, संबळवादक, तुणतुणे वादक, दिमडी वादक यांची त्यांना गोंधळासाठी लाभलेली साथ श्रोत्यांपर्यंत निखळ आनंद पोहोचविण्यात महत्त्वाची ठरायची. म्हणून त्यांचा कदमराई गोंधळ हा कलाप्रकार नावलौकिक प्राप्त ठरला.
गोंधळ कला सादर करताना गुलाबराव ६० मीटरचा घातलेला अंगारखा आणि दीडशे हातांचे पागोटे सांभाळून ते गोंधळ कलेचा मूळ बाज रसिकांसमोर सादर करायचे तेव्हा त्या कलेचे वैशिष्ट्य उलगडत राहायचे. कलेचा वारसा जपण्यासाठी त्यांची धडपड निश्चितच नोंद घेण्यासारखी राहिली. गोंधळ ही कला दोन प्रकारचे असते असे ते सांगायचे. एक रेणुराई व दुसरी कदमराई. रेणुराई म्हणजे रेणुका देवीचा गोंधळ असतो. तर दुसरा तुळजाभवानीचा गोंधळ. कदमराई गोंधळामध्ये भेदिक कथा, पुराण, वग, पारंपारिक गाणी, कवी विष्णुदासांची अष्टपदी, संत दुनियादास महाराज यांची भेदिक गाणी, संत तुकडोजी महाराज यांची जनजागृतीची गाणी, पौराणिक कथा मध्ये राजा हरिश्चंद्राची कथा, द्रौपदी वस्त्रहरण, विक्रम व नवनाथ गोरखनाथांचा जन्म, निळावंती व्याख्यान, कर्मसंपदा व्याख्यान, चंद्र गुजरात व्याख्यान असे अनेक वग, गाणी या सर्वांचे सादरीकरण करण्याची पद्धत असते. एक अंतरा पूर्ण झाला की त्याचा भावार्थ समजून सांगणे, कथा स्वरूपात सर्वसामान्यांना सहज कळेल म्हणून कदमराई मध्ये हरदासी पद्धतीला खूप महत्त्व असते.
गुलाबराव देवीची स्तुती, पौराणिक कथा आणि गीतांचा वापर करून सांगताना भक्ती आणि मनोरंजनाचा अनोखा संगम घडून येत राहायचा. नृत्य व संवाद शैली यावर त्यांनी हुकमत गाजवलेली असल्यामुळे त्यांचे कार्यक्रम बघणे म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे खरेखुरे दर्शन होत असायचे. कपाळावर कुंकू, गळ्यात देवीची प्रतिमा, कवड्याची माळ, झुपकेदार पांढऱ्या मिशा आणि डोक्याला पागोटे ठेवून गुलाबराव पहाडी आवाजातून कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त करून द्यायचे. त्यांनी गोंधळाच्या हजारो कार्यक्रमातून एक प्रकारे समाजप्रबोधनाचे कार्य केले.पिता राधाकृष्ण बापूंच्या पश्चात आपल्या कला संचाचे प्रमुख म्हणून गोंधळाची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली.
औरंगाबाद( छ.संभाजीनगर) आकाशवाणी, पुणे आकाशवाणी तसेच दूरदर्शनवरील कार्यक्रमातही त्यांनी सहभागी होऊन गोंधळ कला बहरवत ठेवली. जयपुर, हैदराबाद, दिल्ली, भोपाळ इत्यादी मोठ्या शहरातून वडिलांबरोबर सतत कार्यक्रम करण्याचा योग त्यांना लाभला.1989 साली अपना उत्सव कार्यक्रमात स्वतंत्ररीत्या त्यांनी अफलातून संबळ वादन केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर गोंधळ कला सादर करून लोककला जोपासण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या अधिपत्याखाली पारंपरिक लोककलेचे जतन व संवर्धन व्हावे म्हणून अनेक पारंपरिक गोंधळ कार्यशाळा संपन्न झाल्या. गोंधळ कला शिकू इच्छिणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडविले. गोंधळ कलेचे वैशिष्ट्य, कलेचा बाज आणि कलेचा मान या गोष्टीबद्दल ते नेहमी मार्गदर्शन करायचे. पाणी अडवा -पाणी जिरवा, बेटी बचाओ, हुंडाबळी, कोरोना जनजागृती,आणि एचआयव्ही निर्मूलनासाठीच्या जनजागृतीवर कार्यक्रमात त्यांनी हिरीरीने सहभागी होऊन समाजप्रबोधन केले. त्यांच्या कलेचा गौरव म्हणून त्यांना २०१८ साली महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ मराठवाडा भूषण पुरस्कार, छत्रपती गौरव पुरस्कार परभणी, छत्रपती संभाजीनगर गोविंद सन्मान पुरस्कार २०२३ याबरोबर राष्ट्रीय पातळीवरील संगीत नाटक अकादमीचे तीन पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले.
गोंधळ लोककलेतील स्वरमणी म्हणून ते ख्यातकीर्त राहिले. त्यांनी या कलेला जसा राजाश्रय मिळाला तसा लोकाश्रय सुद्धा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. ते गोंधळ कलेतील हरहुन्नरी व्यक्तिमत्व आणि चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांचे परभणी येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
संदर्भ : https://www.adhunikkesari.com/article/2506/ ( 30/03/2026)
समीक्षण : जगतानंद भटकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.