काळे,  बबन :  ( १ जानेवारी १९३४ – १५ सप्टेंबर १९७९ ). महाराष्ट्रातील प्रसिद्ध  ढोलकी वादक. त्यांचे पूर्ण नाव बबन लक्ष्मण काळे असे आहे.  त्यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे येथे एका गरीब कुटुंबात झाला.  घरातच पूर्वापार कला नांदत असल्यामुळे लहान वयातच घरातील हातात मिळेल त्यावर वाजवण्याचा छंद त्यांना जडला.  त्यांच्या आई लिलाबाई काळे मांजरीकर या त्या काळाच्या प्रसिद्ध तमाशा कलावंत होत्या.  त्यांचा स्वतःचा तमाशाचा फड होता.  या फडातील अभिनय, वगनाट्य, लोकनाट्य  या कलांचा  बबन काळे यांनी लहानपणापासूनच जवळून अभ्यास केला. पुढे आईच्या संगीतबारीत आईसोबत राहून आणि बघूनच ते ढोलकीवादन शिकले. त्यांचा जास्तीत जास्त ओढा ढोलकी वादनाकडे राहिला. त्याकाळात मराठी चित्रपटसृष्टी व मराठी रंगभूमीवर आपल्या ढोलकी वादनाने अगदी तरुण वयात नाव कमावण्याचे भाग्य त्यांना लाभले.   कडक  ढोलकी वादन हे त्यांच्या ढोलकी वादनाचे खास वैशिष्टय होते. तर ढोलकीवादन करताना ढोलकीवर जोरात थाप मारीत हय्या… म्हणायचे हे त्यांचे  एक वेगळेपण होते. त्यामुळे चित्रपट, रंगभूमीवर ढोलकी वादनासाठी बबन काळे हे नाव सन्मानाने घेतले जायचे.  त्यांना कलाक्षेत्रात ढोलकीपटू ही पदवी बहाल करण्यात आली. त्यांनी शेवटपर्यंत ढोलकीवर प्रेम करीत त्यासाठीच आयुष्य समर्पित केले.
ढोलकीवादक बबनराव काळे यांच्या आई लीलाबाई काळे मांजरीकर १९३०  च्या दशकात  प्रसिद्ध तमाशा कलावंत होत्या.   त्यांचा स्वतःचा तमाशा फड होता. घरातच पूर्वापार  कला नांदत असल्यामुळे बबनरावांवर कलेचे आईकडून संस्कार झाले.  लहानवयापासून आईचे कलेवर असलेले प्रेम, आईची कला आणि आईच्या कलेसाठीचा सन्मान याचा बबनरावांना  खूप हेवा वाटायचा.  इकडे बबनराव देखील कलेवर हळूहळू प्रेम करू लागले.  म्हणून बबनरावांची वादनाची आवड लक्षात घेऊन तसेच वादनात शास्त्रशुद्धपणा यावा म्हणून आईने त्यांना पुण्यातील जेष्ठ तबलावादक मोहम्मद हानीफ मेहबूब खाॅ मिरजकर यांच्याकडे तबला शिक्षणासाठी काही काळ पाठविले. तबला शिक्षणासाठी गुरुकडे आल्यावर त्यांनी आपले तबलावादन विकसित करून घेतले. तबलावादनातील अनेक प्रकारचे बारकावे त्यांनी आत्मसात करीत त्यांना गुरूचे उत्तम मार्गदर्शन मिळत गेले.  त्यांनी १९६०  ते १९७०  च्या दशकात अनेक मराठी चित्रपट विशेषत:  तमाशा प्रधान चित्रपटात अभिनयाचा तसेच ढोलकीचा उत्तम साज चढविला.  तबला वाजविण्यात ते तरबेज होतेच, परंतु त्यांचा जास्तीत जास्त ओढा शेवटपर्यंत ढोलकीवादनाकडेच राहिला. त्यांची आई त्यांचे ढोलकीवादन बघून बेहद खुश व्हायच्या.  आईच्या संगीत बारीत व  तमाशा मंडळात त्यांनी बराच काळ ढोलकीवादन करून हे तमाशा मंडळ नावारूपास आणले.  त्यांची ढोलकीवादनावर हुकूमत राहिल्यामुळे त्यांनी  ‘सखा माझा मंत्री झाला ‘ हे लोकनाट्य स्वतः लिहून त्यात त्यांनी काम देखील केले.  या लोकनाट्यात नृत्य बिजली म्हणून जयमाला इनामदार यांची मुख्य भूमिका होती, त्यामुळे हे लोकनाट्य प्रचंड गाजले.   त्याचे महाराष्ट्रात हजारो प्रयोग झाले.
बबनरावाकडे उत्तम अभिनय करण्याची सुद्धा कला अवगत होती. १९५८ च्या दशकात खूप गाजलेल्या  ‘सांगते ऐका’ चित्रपटात ‘बुगडी माझी सांडली गं…’ हे जेष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांच्यावर चित्रीत झालेले गाणे बबन काळे यांनी ढोलकीचा अफलातून साज चढवून रसिकप्रिय केले.  त्यांनी ढोलकीवादन केलेल्या तमाशाप्रधान चित्रपटांच्या यादीत,  केला इशारा जाता जाता…,  रंगपंचमी, सवाल माझा ऐका,  पुढारी, दोन बायकांचा दादला, रंगल्या रात्री अशा,  मुक्काम पोस्ट ढेबेवाडी यासह अनेक लोकप्रिय चित्रपट होते. यात त्यांनी ढोलकी वादन करून त्या चित्रपटांच्या नावलौकिकात ढोलकीवादनाने  भर घालण्याचे अद्वितीय कार्य केले.  आपल्याला लाभलेल्या ज्ञानाच्या जोरावर या कलावंताने बोटांची जादू त्यांनी ढोलकीवर उमटवली. केवळ ढोलकीच्या तालावर त्याकाळातील तमाशाप्रधान चित्रपट या कलावंताने प्रचंड गाजवून सोडले.  त्यामुळेच त्यांचे ढोलकीवादन रसिकांना खूप भावत असायचे. प्रसिद्ध कलावंत लीला गांधी,  संजीवनी बिडकर, उषा चव्हाण यांच्याबरोबर त्यांनी अनेक रंगमंचीय कार्यक्रम सुद्धा केले.   या कलावंतांना व विशेष करून नृत्यांगनांना ढोलकीसाठी त्याकाळी बबन काळे यांचाच हात लाभला होता. तसेच ज्येष्ठ  संगीतकार वसंत पवार, राम कदम यांना देखील ढोलकी वादनासाठी  तेच हवेहवेसे होते.   त्यांच्या हातांच्या बोटांच्या स्पर्शानी ढोलकी बोलकी झाल्याचा भास रसिकांना होत असायचा.
ढोलकीवादन करताना त्यांनी ढोलकीचा बाज कदापि ढळू दिला नाही.  त्यांच्या ढोलकीवादनात वैशिष्ट्यपूर्णता असल्यामुळे गाणे असो की लावणी, वाजवताना ते तल्लीन होत असायचे. ढोलकीला तालप्रधान करताना त्यांनी तेवढ्याच आत्मियतेने आणि निष्ठेने ढोलकीवादन केले.  ते एकताल, दादरा हे ताल व कायदे, रेला, तुकडे, मुखडे , लयकारी खूप चांगल्या पद्धतीने वाजवण्यात तरबेज होते. जेष्ठ संगीतकार व गायक सुधीर फडके यांच्या बरोबर त्यांनी नेफा आघाडीवर भारतीय जवानांच्या करमणुकीसाठी कार्यक्रम केले. त्यावेळी त्यांनी वाजवलेल्या ढोलकीचे भारतीय जवानाकडून खूप कौतुक करण्यात आले. ढोलकी वाजवण्यापूर्वी  ते गाणे कशाप्रकारे वाजवायचे हे आत्मसात करायचे. छोटा किंवा मोठा मंच असो त्यावरील ढोलकी साजरीकरणाला त्यांनी तेवढयाच आत्मविश्वासाने आणि निष्ठेने सामोरे जायचे.  त्यांचा अनेक नामवंत संगीतकारासोबत स्नेह होता. त्यामुळेच चित्रपट क्षेत्रात व रंगभूमीवर त्यांचे नाव चर्चेत होते. ते मितभाषी आणि आपल्या कलेवर निस्सीम प्रेम करणारे ते प्रतिभावंत कलावंत होते.
त्यांच्या वादनात एकच ठेका किंवा लय  कधीच राहिला नाही.  बबन काळे यांनी आपल्या संपूर्ण हयातीत ढोलकीवर जीवापाड प्रेम करीत ती कला जिवंत ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न  केला. त्यांनी ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या  नाटकात निळू फुले, राम नगरकर, सुवासिनी देशपांडे, लीला गांधी यांच्या समवेत त्यांनी अभिनय करून विनोदी भूमिका साकारली. शिवाय त्यात अफलातून ढोलकीवादन करून हे नाटक अजरामर केले. त्यांनी लवंगी मिरची कोल्हापूरची, बेल भंडार या नाटकातून उत्तम ढोलकीवादन व अभिनय करण्याचे काम केले.  त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना मराठी चित्रपट सृष्टी व मराठी रंगभूमीवर ढोलकीपटू ही पदवी बहाल करण्यात आली. त्यांनी अनेक वगनाट्य व लोकनाट्य  सुध्दा लिहिली. त्यांनी रात्रंदिवस रियाज करून आपल्या ढोलकीवादनात जडणघडण करून घेतली. आईच्या ढोलकी वादनाच्या हट्टापायी व प्रेमापोटी या कलावंताने ढोलकीतील शास्त्रशुद्धपणा रसिकांसमोर आणला.   त्यांनी अनेक नामवंत कलावंतांना देखील ढोलकीची साथ देण्याचे उत्तम कार्य केले.  त्यांना  आपल्या वादनातून नावलौकिक मिळवित कलाक्षेत्रात मोठा चाहता वर्ग लाभला.  शेवटपर्यंत ढोलकीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या या प्रतिभावंत  ढोलकीपटूचे अर्धांगवायूमुळे निधन झाले.
संदर्भ : क्षेत्रसंशोधन
समीक्षण : जगतानंद भटकर

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.