ईजिप्तमधील नाईल नदीवर बांधण्यात आलेली दोन धरणे. नव्याने बांधण्यात आलेले आस्वान उंच धरण (आस्वान हाय डॅम) आणि आस्वान कमी उंचीचे धरण (आस्वान लो डॅम) किंवा जुने आस्वान धरण अशी नाईलवर बांधण्यात आलेली
दोन प्रमुख धरणे आहेत.
आस्वान उंच धरण (आस्वान हाय डॅम) : नाईल ही आफ्रिकेतील आणि जगातील सर्वांत लांब (लांबी ६,६५० किमी.) नदी आहे. विषुववृत्ताच्या दक्षिणेस उगम पावणारी ही नदी पूर्व आफ्रिकेतील ११ देशांतून उत्तरेस वाहत जाऊन भूमध्य समुद्रास मिळते. दक्षिणेकडील सूदानमधून ऊत्तरेस ईजिप्तमध्ये वाहत आल्यानंतर तेथील आस्वान शहरापासून दक्षिणेस ११ किमी. अंतरावर आस्वान हे मातीचे उंच धरण बांधण्यात आले आहे. हे धरण जुन्या आस्वान धरणापासून दक्षिणेस ६ किमी. वर आहे. या धरणाच्या स्थानाचे अक्षांश व रेखांश अनुक्रमे २३° ५८′ १४″ उत्तर आणि ३२° ५२′ ४०″ पूर्व असे आहे. आस्वान धरणामुळेच आस्वान शहर प्रसिद्धीस आले. हा धरण परिसर ईजिप्त आणि सूदानमधील ऊष्ण वाळवंटी व ओसाड प्रदेश आहे. पूर नियंत्रण, वर्षभर पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करून शेतीसाठी जलसिंचन करणे आणि जलविद्युत निर्मिती प्रकल्पाद्वारे ईजिप्तमधील शहरे व उद्योगांना मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा करणे अशा बहुउद्देशीय हेतूने हे धरण बांधण्यात आले आहे. धरणाच्या बांधकामास १९६० मध्ये सुरुवात होऊन १९७० मध्ये ते पूर्ण झाले. हे धरण जगातील सर्वांत लांब भारस्थायी प्रकारचे धरण असून त्याच्या बांधकामात माती, ग्रॅनाइट, दगड व सिमेंटचा वापर केलेला आहे. आस्वान उंच धरणाला आधुनिक अभियांत्रिकीतील एक अद्भुत नमुना मानले जाते. धरणाच्या उभारणीसाठी एक महापद्म (बिलिअन) डॉलर इतका खर्च आला होता.
आस्वान धरणाची उंची १११ मी., माथ्याची लांबी ३,८३० मी. व रुंदी ९८० मी. आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता १६९ महापद्म घनमीटर असून धरणातील पाण्याचा प्रत्यक्ष साठा ४४३ लाख घनमीटर इतका आहे. या धरणामुळे निर्माण झालेल्या कृत्रिम जलाशयाला ईजिप्शियन लोक नासर या नावाने ओळखतात, तर सुदानी लोक त्याला न्यूबिया म्हणतात. हे जगातील सर्वांत मोठ्या मानवनिर्मित सरोवरांपैकी एक आहे. नासर जलाशयाचा विस्तार ईजिप्तमध्ये सुमारे ३२० किमी. पर्यंत झालेला असून त्यापुढील वरच्या खोऱ्यातील (दक्षिणेकडील) सुमारे १६० किमी. चा विस्तार सूदानमध्ये आहे. या जलाशयाने सुमारे ५,२५० चौ. किमी. भूक्षेत्र व्यापले आहे. जलाशयाची खोली ९० मीटर असून सरासरी रुंदी २२ किमी. आहे. ईजिप्त व सूदान या दोन्ही देशांच्या दृष्टीने हे धरण महत्त्वाचे आहे. ईजिप्त आणि सूदान या दोन देशांमध्ये झालेल्या नाईल नदी पाणीवाटप करारानुसार नाईल नदीतून वर्षाला वाहणाऱ्या ७४ महापद्म घनमीटर इतक्या एकूण पाण्यापैकी ५५.५ महापद्म घनमीटर पाणी ईजिप्त देशाने घ्यायचे असून उर्वरित पाणी सूदानला द्यायचे आहे. येथील जलविद्युत निर्मिती प्रकल्पात वीज निर्मितीसाठी प्रत्येकी १७५ मेगॅवॉट क्षमतेची १२ विद्युतजनित्रे बसविली असून त्यांतून वार्षिक १० महापद्म किलोवॉट तास इतकी वीज निर्माण केली जाते.
या धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जेव्हा धरणात पाणी साठविण्यात आले, तेव्हा प्राचीन काळापासून नाईल नदीला येणाऱ्या विनाशकारी पुराचे नियंत्रण पहिल्यांदा मानवाच्या हातात आले. धरणात जेव्हा पुराचे पाणी साठविले जाते, तेव्हा ते पाणी जलसिंचनाखालील जमिनीला पाण्याचा अधिक वापर करण्यासाठी, नव्याने हजारो हेक्टर क्षेत्र जलसिंचनाखाली आणण्यासाठी, धरणाच्या खालच्या व वरच्या भागात जलवाहतूक सुकर करण्यासाठी आणि अधिकाधिक वीज निर्मितीसाठी सोडले जाते. हे धरण ईजिप्तसाठी वरदान ठरले आहे. या धरणामुळे ईजिप्तच्या अर्थव्यव्यस्थेत, औद्योगिक विकासात आणि शेतीत अमूलाग्र बदल घडून आले आहेत. शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध झाल्यामुळे अवर्षणावर मात करता आली आहे. या धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणात अंतर्गत मासेमारी व्यवसाय चालतो. नौकानयनासाठीही या धरणाचा उपयोग झाला आहे.
नाईल नदीच्या खोऱ्यात अबू सिंबेल मंदिरापासून ते फिलाए मंदिर अशी अनेक प्राचीन व प्रसिद्ध न्यूबियन स्मारके व मंदिरे होती. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने त्यांना विशेष महत्त्व होते. त्यांपैकी पाच स्मारके यूनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समाविष्ट होती. अबू सिंबेल मंदिर, कुब्बत अल-हवा ही प्राचीन आणि मध्ययुगीन राजांची थडगी, एलफँटाइनी शहर, दगडाच्या खाणी व सूच्याकार स्तंभ (स्मारक), सेंट सिमोननचा मठ, फातिमिद स्मशानभूमी या त्यांपैकी विशेष महत्त्वाच्या वास्तू होत्या; परंतु आस्वान धरणामुळे या सर्व वास्तू आणि मंदिरे आस्वान धरणाच्या जलाशयाखाली जाण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यासाठी एक मोठी पुरातत्त्व मोहीम राबविण्यात येऊन अनेक प्राचीन मंदिरे आणि स्मारके सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. आस्वानपासून दक्षिणेस सुमारे २६५ किमी. अंतरावर असलेल्या अबू सिंबेल खेड्यात, दुसऱ्या रॅमसीझच्या काळात टेकडीवजा खडकामध्ये कोरलेले प्रसिद्ध अबू सिंबेल मंदिर होते. आस्वान धरणाच्या जलाशयाखाली ते मंदिरही बुडणार होते, त्यामुळे त्याचे स्थलांतर करणे आवश्यक होते. धरणाच्या जलाशयाखाली हे मंदिर बुडू नये म्हणून यूनेस्कोने यंत्रणा उभारून ते मंदिर खंडश: कापून त्याची उंचावर पुन:स्थापना केली. हे स्थलांतर पूर्णपणे यशस्वी ठरले. त्यामुळे ईजिप्तमधील एका अत्यंत प्रसिद्ध स्मारकाचे नासर सरोवराच्या काठावर जतन करण्यात आले. अशा प्रकारे धरणाचे पाणी साठविण्यापूर्वी न्यूबियन स्मारकांची पुन:स्थापना करण्यासाठी राबविण्यात आलेल्या चळवळीनुसार साधारण २२ स्मारकांची पुन:स्थापना केली.
धरणाच्या निर्मितीसाठी नव्वद हजार ईजिप्शियन शेतकरी आणि सुदानी न्यूबियन आदिवासी लोकांचे पुनर्वसन करावे लागले. पन्नास हजार इजिप्शियनांचे पुनर्वसन आस्वानपासून उत्तरेस ५० किमी. वरील कावम उंबू (कोम ओम्बो) खोऱ्यात करून तेथे न्यूबेरिया नावाचा एक नवीन कृषिविभाग निर्माण करण्यात आला. बहुतांश सुदानी लोकांनी सूदानमधील खश्म अल किरबाह येथे स्थलांतर केले; परंतु सर्वांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन होऊ शकले नाही. त्यामुळे पुनर्वसित लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. धरणामुळे या प्रदेशात भूकंपाचे प्रमाण वाढले असल्याची शक्यता वर्तविली जाते.
आस्वान धरणाचे अनेक चांगले फायदे झाले असले, तरी काही प्रतिकूल परिणामांच्या रूपात मोठी किंमतही मोजावी लागली आहे. आस्वान धरणामुळे झालेले मानवी विस्थापन, तसेच पुरातत्त्वविषयक महत्त्वाच्या असणाऱ्या वास्तूंचे नुकसान
या स्वरूपात फार मोठी किंमत मोजावी लागली. त्याशिवाय अतिरिक्त सिंचनामुळे ईजिप्तमधील नदीलगतच्या शेतजमिनीची सुपीकता हळूहळू कमी होत जाऊन तिची उत्पादकता घटत गेली. या धरणामुळे नाईल नदीला येणाऱ्या वार्षिक पुराचे पूर्णपणे नियंत्रण करण्यात आलेले आहे. धरण होण्यापूर्वी पुरामुळे या नदीच्या खोऱ्यात दरवर्षी सुमारे ४० द. ल. टन सुपीक गाळाचे संचयन व्हायचे. त्याचा फायदा शेतीसाठी होत असे; परंतु धरणामुळे पुराचे संपूर्ण पाणी आणि त्यासोबत वाहून येणारा सुपीक गाळ जलाशयात आणि कालव्यांमध्ये साचू लागला. त्यामुळे पुराचे पाणी जरी जलाशयालगतच्या शेतजमिनीवर पसरले, तरी तेथे गाळाचे विशेष संचयन होत नाही. त्यामुळे ईजिप्तला कृषी उत्पादनासाठी वर्षाला सुमारे एक द. ल. टन कृत्रिम खतांचा वापर करावा लागतो. कृत्रिम खतांचा वापर करणे हे खर्चिक असून त्याचा तुटवडाही जाणवतो. नैसर्गिक सुपीक गाळाच्या तुलनेत हा पर्याय पुरेसा होऊ शकत नाही.
आस्वान कमी उंचीचे धरण (जुने आस्वान धरण) : नवीन आस्वान धरणापासून खालच्या बाजूस (उत्तरेस) ६ किमी. वर आणि आस्वान शहराच्या दक्षिणेस साधारण ५ किमी. अंतरावर हे धरण आहे. प्रामुख्याने पूरनियंत्रणासाठी ब्रिटिशांनी इ. स. १८९९ ते १९०२ या कालावधीमध्ये हे धरण बांधले होते. इ. स. १९१२ आणि १९३३ मध्ये या धरणाच्या माथ्याची उंची वाढविण्यात आली होती. कोरड्या ऋतूत शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी आणि वीजनिर्मितीसाठी त्या पाण्याचा उपयोग केला जाई. या धरणामध्ये ४.९ महापद्म घन मीटर पाणी साठविले जाते. एकेकाळी हे जगातील सर्वांत मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक होते. त्याची लांबी २,१४२ मी. आहे. त्याला १८० सांडवे असून त्यांच्यातून प्रचंड गाळासह पुराचे संपूर्ण पाणी सोडले जात असे. नाईलच्या कालव्यांना सतत पाणीपुरवठा होत राहावा म्हणून नाईल नदीवर नवीन आस्वान उंच धरण बांधण्यात आले. ईजिप्तच्या विकासात सर्व दृष्ट्या या आस्वान धरणाचा वाटा मोठा आहे.
संदर्भ :
Scudder, Thayer, Aswan High Dam Resettlement of Egyptian Nubians, Springer, 2016.
समीक्षक : सुरेखा दौंडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
