पाणिनीय संस्कृत व्याकरणाचे एक अत्यंत ठळक आणि उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे प्रकृति-प्रत्ययविभाग ही संकल्पना होय. भाषेतील शब्दांची योग्य ती उपपत्ती लावून त्यांचे साधुत्व आणि असाधुत्व सांगणे हे संस्कृत व्याकरणाचे मूलभूत कार्य होय. हे करीत असताना परंपरेतील वैयाकरणांनी विविध उपाय अमलात आणले. अशा अनेक उपायांमध्ये पाणिनीने केलेला तत्कालीन संस्कृत शब्दांचा प्रकृति-प्रत्यय असा विभाग सर्वख्यात आणि चिरंतन ठरला. प्रत्येक शब्दाचे बाह्यस्वरूप लक्षात घेऊन त्यामध्ये एक मूळ शब्दघटक म्हणजेच प्रकृती आणि त्याला जोडले जाणारे विविध प्रत्यय पाणिनीने कल्पिले आहेत. उदा., रामः या शब्दामध्ये राम अशी प्रकृती असून सु असा विभक्तिप्रत्यय आहे. प्रत्येक प्रकृतीला आणि प्रत्ययाला स्वतंत्र अर्थ बहाल केला आहे. प्रकृती आणि प्रत्यय यांना दिलेले स्वतंत्र अर्थ हे त्या शब्दाच्या अर्थाशी जुळत आहेत की नाही, याची योग्य ती तपासणी करून अशा प्रकृति-प्रत्ययांनी युक्त शब्दांची घडण त्याने सूत्ररूपात मांडलेली आपल्याला दिसून येते. प्रकृतीचे प्रमुख दोन प्रकार म्हणजे प्रातिपदिक आणि धातू. प्रातिपदिक हे असंख्य असल्याने तसेच त्यांचे अर्थही लोकांत प्रसिद्ध असल्याने त्यांचे स्वतंत्र असे परिगणन केलेले कुठे दिसत नाही. याउलट धातू आणि त्यांचे अर्थ तुलनेने मर्यादित असल्याने त्यांची व्यवस्थित यादी धातुपाठामध्ये मिळते.

त्याचप्रमाणे प्रत्यय सांगताना त्याचे विशिष्ट अर्थ त्याने ते वेळोवेळी सांगताना नमूद केले आहेत. काही ठिकाणी स्वतंत्र असा अर्थ न सांगता विकरणासारखे प्रत्यय सांगितले आहेत. त्यामुळे हे प्रत्यय स्वतंत्र अर्थाचे न होता ते स्वार्थीच होतात, असे ‘अनिर्दिष्टार्थाः प्रत्ययाः स्वार्थे भवन्ति’ या संकेतावरून कळून येते. प्रत्यय हे प्रामुख्याने विभक्ती आणि कृत्-तद्धित या दोन प्रकारांमध्ये विभागता येतात. सुप् आणि तिङ् ह्या प्रत्याहारांमध्ये पठित केलेले प्रत्यय विभक्ति प्रत्यय होत. जसे देव + सु = देवः, पठ् + ति = पठति इत्यादी. तसेच धातुंना कृत् प्रत्यय लावून धातुसाधिते आणि नामांना तद्धित प्रत्यय लावून विविधार्थी तद्धित शब्द तयार करता येतात. त्याचप्रमाणे धातूंना विशिष्ट अर्थी काही सनादी प्रत्ययसुद्धा लावले जातात. जसे, इच्छा हा अर्थ व्यक्त करावयाचा असताना धातूंना ‘सन्’ असा प्रत्यय लावून ‘पिपठिषति’, ‘जिगमिषति’, ‘जिज्ञासति’ अशी क्रियापदे तयार केली जातात. तसेच प्रयोजक हा अर्थ अभिप्रेत असताना ‘णिच्’, तर एखादी क्रिया पुन्हापुन्हा घडत आहे हे सांगण्यासाठी ‘यङ्’ हा पौनःपुन्यार्थ प्रत्यय लावून विशिष्ट क्रियापदे तयार करता येतात.

‘उणादयोबहुलम्’ (३.३.१) या सूत्राद्वारे पाणिनीने काही शब्दांचे अस्तित्त्व अव्युत्पन्न म्हणून मान्य केले आहेच. त्यामुळे त्याने उपयोजिलेला शब्दांचा हा प्रकृति-प्रत्यय विभाग काल्पनिक असून जिथे जरूर असेल, तिथेच तो करावा हे त्याचे ठाम मत होते, हे यावरून स्पष्ट होते. अभ्यंकरांनी महाभाष्याच्या प्रस्तावना खंडात असे म्हटले आहे की, प्रकृतीचे आणि प्रत्ययांचे अर्थ साक्षात् वाचकत्वाने मनात येतात का द्योतकत्वाने, हा विचारच त्याने (पाणिनीने) केलेला नाही. तसेच पुढे त्यांनी पदमंजरीकारांचे यासंदर्भातले मत नमूद केले आहे. पदमंजरीकारांच्या म्हणण्यानुसार पाणिनीने वेदांमध्ये तसेच तत्कालीन लौकिक भाषेत शिष्टलोकांमध्ये प्रयुक्त असणारे शब्द हे शुद्ध किंवा साधू मानून त्यांचा योग्य अर्थ कळावा या हेतूने त्यांचा प्रकृति-प्रत्यय विभाग कल्पिला आहे. अशा वेळेस त्याने सांगितलेले प्रत्यय लावून कोणत्याही धातूवरून अथवा नामावरून जर शब्द केला आणि जर तो व्यवहारामध्ये नसेल, तर त्याचा प्रयोग करू नये असे पदमंजरीकार म्हणतात. त्यामुळे वेदांमध्ये प्रयुक्त तसेच शिष्टांच्या भाषिक व्यवहारामध्ये असलेलेच शब्द वापरावेत, असे पाणिनीचे ठाम मत असावे असे अभ्यंकरांनी प्रतिपादिले आहे.

संदर्भ :

  •  Abhyankar, Kashinath, A Dictionary of Sanskrit Grammar, Oriental Institute, Baroda, 1986.
  •  Bhate, Saroja, Panini : Makers of Indian Literature, Sahitya Akademi, ISBN: 81-260-1198-X.
  • Shastri, Vidyaranya P. S. Subrahmanya, Lectures on Patanjali’s Mahabhashya, Volume 1, Annamalai, 1944.
  • अभ्यंकर, काशीनाथ, श्रीमद्भगवन्पतञ्जलिकृत व्याकरणामहाभाष्य, प्रस्तावना खंड, भाग सातवा, पुणे, १९२८.
  • वर्मा, सत्यकाम, संस्कृत व्याकरण का उद्भव और विकास, दिल्ली, १९७१.

समीक्षक – भाग्यलता पाटस्कर

प्रतिक्रिया व्यक्त करा