अनेक माहेश्वर शैव पंथांपैकी वेदकालापासूनची प्राचीन परंपरा असलेला व संपूर्ण भारतात पसरलेला एक प्रमुख संप्रदाय. यालाच ‘आगमान्त संप्रदाय’ असेही म्हटले जाते. पशुपती अथवा शिव यास उपास्य दैवत मानणारा हा पंथ आहे. पशु म्हणजे सामान्य सजीव व पती म्हणजे ईश्वर. ‘सर्व सजीवांचा ईश्वर’ या अर्थाने शंकरास पशुपती म्हटले आहे व म्हणून या पंथाचे नाव पाशुपत पंथ आहे.

यजुर्वेदात स्वतंत्र रुद्राध्याय आहे. त्यातही रुद्राचा-शिवाचा पशुपती असा उल्लेख आहे, यावरून या शिवोपासक पंथाचे प्राचीनत्व समजते. प्रत्यक्ष भगवान शिवाने पाशुपत पंथ स्थापन केला व या पंथाची मूलभूत तत्त्वे विशिष्ट ऋषींना सांगितली, असे या पंथाच्या आगम ग्रंथात दिले आहे.

शंकराच्या अठरा अवतारांपैकी आद्य अवतार लकुलीश (इ.स.सु. २००) हा या पंथाचा अध्वर्यू मानला जातो. गुजरातमधील कायारोहण क्षेत्रात एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहात शिवाने प्रवेश केला व मृतदेहात चैतन्य आले. मृतदेहाजवळ पडलेल्या लाकडावरून (लकुल) यास ‘लकुलीश’ असे नाव मिळाले. नकुलीश या नावानेदेखील तो प्रसिद्ध आहे.

पाशुपत पंथ मुख्यत: गुजरात व राजस्थानमध्ये पसरला व नंतर याचा प्रसार दक्षिण व उत्तर दिशांनाही झाला. नकुलीशाची शिष्यपरंपरा पुढीलप्रमाणे दिलेली आढळते : नकुलीश > कौशिक > गार्ग्य > मैत्रेय > कौरुष > ईशान > परगार्ग्य > कपिलांड > मनुष्यक > कुशिक > अत्री > पिंगल > पुष्पक > बृहदार्य > अगस्ती > संतान > कौंडिण्य (राशीकर) विद्यागुरू. पाशुपत संप्रदायाचा प्रसार करणाऱ्यांमध्ये न्याय-वैशेषिक संप्रदायातील मुख्य विद्वान वात्स्यायन (इ.स.चे तिसरे किंवा चौथे शतक), उद्योतकर (सातवे शतक), वाचस्पतिमिश्र (नववे शतक), भासर्वज्ञ (दुसरे शतक) व उदयन (दहावे शतक) यांचा समावेश होतो. गुणरत्न (सु. चौदावे शतक) याने वैशेषिकांना ‘पाशुपत’ म्हटले आहे; तर उद्योतकराने स्वत:स ‘पाशुपताचार्य’ म्हटले आहे. शंकराचार्यांनी शारीरिकभाष्यापाशुपत सूत्रांची चर्चा केली आहे. श्रीरामानुजाचार्यांनीसुद्धा स्वत:च्या श्रीभाष्यातील पाशुपताधिकारणामध्ये पाशुपत पंथातील चार संप्रदायांचे वर्णन केले आहे. श्रीकंठशिवाचार्य तसेच अप्पय्या दीक्षित या दोघांनी टीका तसेच व्याख्या लिहून ब्रह्मसूत्र-सिद्धांतांना शैव-सिद्धांतांमध्ये परिवर्तित केले आहे. अशाप्रकारे दक्षिणेतही हा पंथ प्रसिद्ध होता, हे समजते.

पाशुपत सूत्र हा पाशुपत पंथाचा मूळ ग्रंथ असून तो शिवावतार लकुलीशरचित आहे. त्यावर कौंडिण्य (सु. चौथे ते सहावे शतक या दरम्यान) याने रचलेले पंचार्थभाष्य आहे. माधवाचार्य (सु. चौदावे शतक) यांनी आपल्या सर्वदर्शनसंग्रहात पाशुपत पंथाचे तत्त्वज्ञान ‘नकुलीशदर्शन’ या नावाने विस्तारपूर्वक सांगितले आहे. पाशुपत सूत्र हा ग्रंथ त्यावरील कौंडिण्यभाष्यासह १९४० मध्ये त्रिवेंद्रम विद्यापीठाने ‘ओरिएन्टल मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररी’च्या वतीने संपादित व प्रकाशित केला आहे. कौंडिण्यभाष्यामध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या जीवनाचा पुसटसा उल्लेख आहे. कौंडिण्यापूर्वी झालेल्या अथवा समकालीन लेखकांची चर्चा त्यात नाही; परंतु काही ठिकाणी पाठभेद मात्र आढळतात. त्यात सांख्य व योगासंबंधी चर्चासुद्धा आढळते. काही ठिकाणी वेदमंत्रसुद्धा दिले आहेत. मनुचाही उल्लेख केलेला आढळतो. कौंडिण्यभाष्याची भाषा सुंदर, सरळ आहे, तर वाक्यरचना पातंजलमहाभाष्यानुसार आहे.

या माहेश्वर दर्शनाच्या प्रस्तावनेत वैष्णव दर्शनातील विष्णूचे दास्यत्व या संकल्पनेवर आक्षेप घेतला आहे. मुक्त जीव परतंत्र असून ईश्वराच्या दासाप्रमाणे आहे हे मत आक्षेपार्ह मानले आहे व तो सर्व प्रकारे परमेश्वरासारखाच होतो व त्याला परमेश्वराचेच ऐश्वर्य प्राप्त होते, अशी या दर्शनाची धारणा आहे.

पाशुपत सूत्र हा ग्रंथ पाच मंत्रांनुसार पाच अध्यायात विभागलेला असून एकूण श्लोकसंख्या १६८ आहे. सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष, आणि ईशान हे पाच मंत्र होत. प्रथम अध्यायात वस्तू-पदार्थाचे विवरण, भस्माचे महत्त्व, यम-नियम, आधिकारिक ऐश्वर्य, षट्सूत्रीकरण, ऐश्वर्यनित्यत्व व सद्योजातमंत्र या विषयांवर विवेचन केले आहे. दुसऱ्या अध्यायात आधिकारिक कार्य-कारण, आनुषंगिक चर्या तसेच वामदेवमंत्र हे विषय स्पष्ट केले आहेत. तिसऱ्या अध्यायात विधी-विधान व अघोरमंत्र यावर विवेचन आहे. चौथ्या अध्यायात अंतर्गत विधान-ज्ञान, आधिकारिक असन्मार्ग, तत्पुरुषमंत्र या विषयांची चर्चा आहे. पाचव्या अध्यायात योगीलक्षण अर्थात योगप्रक्रियेचे स्वरूप, शून्यागारगुहा, योगविषयक वस्तू-पदार्थ, दुःखान्त अर्थात निरतिशय स्वात्मसुखानुभूती तसेच ईशानमंत्र हे विषय स्पष्ट केले आहेत.

साधकाला परमशिवप्राप्ती होण्यासाठी सहजसोपे उपायवर्णन पाशुपत सूत्र या ग्रंथात केले आहेत. भगवान शिवाची पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने, केवळ मानसपूजेनेही प्रार्थना करून त्याच्याशी सायुज्यता प्राप्त करून घेता येईल, हेच या पाच अध्यायांद्वारे साधकाला समजावले आहे. ह्या ग्रंथात ईश्वराच्या सगुण अथवा निर्गुण स्वरूपाचे वर्णन आढळत नाही. केवळ ‘ॐ’ या प्रतीकाचे वर्णन केलेले दिसते.

पाशुपतांचे तत्त्वज्ञान भेदाभेदवाद म्हणून ओळखले जाते. हे पाच पदार्थांचे शास्त्र आहे ‒ कार्य, कारण, दुःखान्त, योग आणि विधी. कार्य म्हणजे चिदचित्स्वरूपाचे कार्य असणारे जगत् (पशू). विद्या, कला व पशु हे कार्याचे तीन प्रकार आहेत. कारण म्हणजे ईश्वर (पती). दुःखान्त ज्ञान, वैराग्य इत्यादींमुळे होत नसून तो फक्त शिवाच्या प्रसादामुळेच होतो, असे कौंडिण्याने म्हटले आहे. दुःखाचा अंत अनात्मक व सात्मक असा दोन प्रकारचा असू शकतो. अनात्मक दुःखान्त म्हणजे सर्व दुःखांचा निःशेष उच्छेद. सात्मक दुःखान्तात दृक्शक्ती/ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती या दोन शक्तींच्या स्वरूपातील ऐश्वर्याची प्राप्ती होते. दृक्शक्तीचे विषयभेदांच्या अनुरोधाने दर्शन, श्रवण, मनन, विज्ञान आणि सर्वज्ञत्व हे पाच प्रकार आहेत. तर क्रियाशक्ती मनोजवित्व, कामरूपित्व आणि विकरणधर्मित्व (इंद्रियरहिततत्त्व) या तीन प्रकारची आहे. योग म्हणजे पातंजलयोगाप्रमाणे चित्तवृत्तिनिरोध नसून आत्मा व ईश्वर यांच्या ऐक्यास कारणीभूत होणाऱ्या जप, ध्यान, शिवावरील अव्यभिचारी निष्ठा यांसारख्या गोष्टी. ‘चित्तशुद्धी घडवून आणणारा विधी’ या अर्थी योग मानला गेला आहे. विधींमध्ये धर्मार्थसाधक अशा अनेक व्रतांचा व नियमांचा समावेश होतो.

शिव हाच जगाची उत्पत्ती, स्थिती व लय घडवून आणतो. म्हणूनच ज्याला दुःखान्त हवा त्याने शिवाची उपासना करावी. शिव हा निमित्तकारण आहे. आद्य श्रीशंकराचार्यांनी ईश्वरकारणवाद्यांचा जो उल्लेख केला आहे, त्यात त्यांना पाशुपतही अभिप्रेत आहेत. मुक्तीच्या अवस्थेत जीव हा शिवात विलीन होत नसून त्याच्या सतत संयोगात राहतो. हेच ‘शिव-सायुज्य’ होय.

या दर्शनाच्या सूत्रांचा प्रारंभ ‘अथ’ या शब्दाने होतो. ‘अथ’चा या ठिकाणी अर्थ अगोदर प्रस्तुत झालेली गोष्ट म्हणजेच शिष्याने गुरूला विचारलेला, सर्व प्रकारच्या दुःखांचा अंत कसा होईल?, हा प्रश्न. यानंतर गुरूंचे वर्णन केले आहे. लाभ, मल, उपाय, देश, अवस्था, विशुद्धी, दीक्षाकारी आणि बल हे प्रत्येकी पाचांचा समूह असणारे अष्टगण आणि तीन वृत्ती हा नववा गण हे जो जाणतो व शिष्यावर संस्कार करतो तो गुरू. पुढे इतर शास्त्रांहून वेगळे असणाऱ्या या शास्त्राच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख केला आहे. इतर शास्त्रांमध्ये दुःखान्त म्हणजे केवळ दुःखाची निवृत्ती; तर ह्या शास्त्रात दुःखान्त म्हणजे परमैश्वर्याची प्राप्ती. इतरत्र अगोदर नसलेले कार्य नंतर अस्तित्वात येते; परंतु या शास्त्राप्रमाणे पशु आदी कार्य नित्य आहे. इतर शास्त्रांमध्ये परमेश्वर कर्मसापेक्ष कारण आहे; पण या शास्त्रात तो निरपेक्ष कारण आहे. परमेश्वर निरपेक्ष कारण असण्याच्या ह्या सिद्धांतावर घेतल्या जाणाऱ्या संभाव्य आक्षेपांचा विचार करून या सिद्धांताचे समर्थनही केले आहे.

पाचांचा समूह असणारे अष्टगण :

  • लाभ : ज्ञान, तप, नित्यत्व, स्थिती, शुद्धी ह्या पाच प्रकारचा आहे.
  • मल : मिथ्या ज्ञान, अधर्म, (विषयांच्या) आसक्तीचे कारण, (सदाचरणापासून) च्युत होणे आणि (जीवरूप) पशुत्वाच्या प्राप्तीचे मूळ या आत्म्याच्या आश्रयाने असणाऱ्या पाच वाईट गोष्टी म्हणजे पाच प्रकारचा मल.
  • उपाय : वासचर्या (उचित पद्धतीने राहणे), जप, ध्यान, नेहमी रुद्राचे स्मरण आणि (त्याला) शरण जाणे हे पाच प्रकारचे उपाय.
  • देश : गुरू, (ज्ञानी) जन, गुहा, स्मशान आणि रुद्र हे ज्ञान आणि तप वृद्धिंगत करणारे पाच प्रकारचे देश.
  • अवस्था : व्यक्त, अव्यक्त, जप, दान, निष्ठा या पाच प्रकारच्या अवस्था.
  • विशुद्धी : पाच प्रकारच्या मलाचा नाश म्हणजेच विशुद्धीचे पाच प्रकार.
  • दीक्षाकारी : वस्तू, काल, क्रिया, (रुद्राची) मूर्ती आणि गुरू या दीक्षेसाठी आवश्यक पाच गोष्टी.
  • बल : गुरूभक्ती, बुद्धीची निर्मलता, द्वंद्वांवर विजय, धर्म आणि सावधानता हे बलाचे पाच प्रकार.

नवव्या गणात भैक्ष्य ‒ भिक्षेने प्राप्त होणारे, उत्सृष्ट ‒ इतरांनी टाकलेले व यथालब्ध ‒ यदृच्छेने मिळालेले या तीन प्रकारच्या वृत्तींचा (अन्नार्जनाचे उपाय) समावेश होतो.

पाशुपतांच्या धार्मिक आचारात भस्माला विशेष महत्त्व आहे. त्यांच्या मते भस्मस्नान म्हणजे खरा यज्ञ. या पंथातील साधूंना सिद्धी प्राप्त झाल्या तरी त्यांच्या उपयोगाने समाधीत व्यत्यय निर्माण होतो. म्हणून सिद्धींच्या मागे लागणे अयोग्य मानले आहे. साधे संन्यस्त जीवन जगणे, लोभत्याग व क्रोधत्याग करणे, क्षमाशील असणे, ॐकाराचा जप करून व योगाचरण करून शिवाशी एकरूप होणे हीच या पंथाची प्राचीन काळापासूनची शिकवण आहे.

या पंथाचे अनुयायी इंद्रियांचे आरोग्य तसेच शुद्धता यांवर भर देतात. इतर पंथांच्या विरुद्ध मूक, बधिर व्यक्तींसाठी ह्या संप्रदायात प्रवेश नाही. नित्यनैमित्तिक कर्मांची सूची पाशुपत सूत्र ग्रंथात तसेच गणकारिका नावाच्या भासर्वज्ञ याच्या टीकेत दिली आहे. या पंथात साधनेच्या पाच अवस्था आहेत. साधक साधना करताकरता दुःखांपासून जेव्हा मुक्ती मिळवतो, तेव्हा तो अमर होतो व रुद्राच्या सान्निध्यात राहू लागतो. हाच मोक्ष आहे.

साधकाने सद्योजातमंत्राच्या आवर्तनांनी ईश्वराची पूजा करणे अपेक्षित आहे. दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या कर्माची आवश्यकता नाही. यज्ञ व श्राद्धकर्म सुद्धा वर्जित आहे; कारण यात बळीचा उल्लेख आहे. भस्म, रुद्राक्ष, बिल्वपत्र, पंचाक्षरमंत्र याच गोष्टी पूजेसाठी आवश्यक मानल्या आहेत व इतर कुठल्याही बाह्य सामग्रीची अपेक्षा नाही.

परंतु पाशुपत पंथाची ही साधी, सोपी शिकवण व आचारपद्धत लयाला जाऊन पुढे अघोरी व कापालिक पंथ निर्माण झाले. त्यामुळे या पंथाची बदनामी होऊन तो विकृतांचा पंथ म्हणून हेटाळणीस पात्र ठरला.

हा पंथ प्राचीनकालापासून भारतात सर्वत्र पसरला होता, हे भारतभर सर्वत्र आढळणाऱ्या लकुलीशमूर्तींवरून समजून येते. परंतु विचित्र पद्धतींचा शिरकाव या पंथात झाल्यामुळे काळानुसार याचे महत्त्व व प्रसिद्धी कमी होत गेली.

संदर्भ :

  • Trubner, Karl J. Vaishnavism, Shaivism and Minor Religious Systems, Strassburg, 1913.
  • जोशी, पं. महादेवशास्त्री, भारतीय संस्कृती कोश खंड ५, पुणे, १९६८.
  • श्रीमाधवाचार्य (र. पं. कंगले), सर्वदर्शनसंग्रह, मुंबई, १९८५.
  • (सर्वदर्शनाचार्यश्रीकृष्णानन्दसागर:), पाशुपतसूत्रम्, वाराणसी, १९८७.

                                                                                                                                                                           समीक्षक : प्राची मोघे