गवार ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव स्यामोप्सिस टेट्रॅगोनोलोबा असे आहे. भारतात सर्वत्र या शिंबावंत वनस्पतीची लागवड फळभाजीसाठी (शेंगांसाठी) करतात. एकूण उत्पादनाच्या सु. ८० % गवारीचे उत्पादन भारतात होते. तिचे सर्वाधिक उत्पादन मुख्यत्वे वायव्य भागात होते. जोधपूर भोवतालचा प्रदेश तिच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या भागाला लागून असलेल्या पाकिस्तानच्या प्रदेशातही तिचे उत्पादन होते. गवारीच्या वाढत्या मागणीमुळे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया तसेच आफ्रिकेच्या विविध भागांत तिची लागवड केली जाते.
गवार ही सरळ व जोमाने वाढणारी वर्षायू वनस्पती असून ३०-६० सेंमी. उंचीपर्यंत वाढते. खोड खाचदार असते. पाने संयुक्त व त्रिदली असून पर्णिका लंबवर्तुळाकार, तीक्ष्ण, दातेरी व दोन्ही बाजूंना केसाळ असतात. फुले लहान, किरमिजी रंगाची असतात. शेंगा जाड, मांसल व गुच्छाने येतात. प्रत्येक शेंगेत ५-१२ बिया असतात. बिया काहीशा चौकोनी व चपट्या असतात.
गवारीच्या शेंगा गोड, शीतल, रेचक व पाचक असून बद्धकोष्ठता आणि पित्त यांवर गुणकारी ठरतात. असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. शेंगांत अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात. गवारीची लागवड फळभाजी, हिरवा चारा, दाणे, हिरवळीचे खत व डिंक (खळ) यांसाठी करतात. रोजच्या आहारात गवारीचा समावेश होतो. दाण्यांमध्ये ३५-४२ % मगज असतो. दाण्यांतील अंकूर काढून उरलेला भाग (भ्रूणपोष) दळून पांढरे पीठ मिळते. यात भ्रूणपोषित गॅलॅक्टोमॅनन हा डिंक असतो. पाण्यात तो मिसळून जी जेली तयार होते, त्याला गवार डिंक म्हणतात. दुग्धव्यवसायात आइस्क्रीम बनविताना तसेच चीज आणि मांस यांवर प्रक्रिया करताना स्थिरक म्हणून हा डिंक वापरतात. यांखेरीज. कापड व कागद उद्योग, खाणकाम, स्फोटक पदार्थ, सौंदर्यप्रसाधने अशा विविध धंद्यांत गवार डिंक वापरतात.