महाराष्ट्रातील पूर्व विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या झाडीपट्टीच्या जिल्ह्यांतील दंडी जमातीचे गीत. दंडीगान सादर करताना साधारणपणे पाच कलावंतांची आवश्यकता असते. दोन पुढे राहून नेतृत्व करीत असतात, तर मागे उभे असलेले तीन साथीदार त्यांना साथ देण्याचे कार्य करीत असतात. संपूर्ण अंगभर झाकणारा पायघोळ अंगरखा धारण करून दंडीगान सादर केले जाते.दंडीगानमध्ये स्त्रिपात्राला स्थान नसते. हे लोकनाट्य म्हणजे पुरुषांनी सादर केलेली पुरुषपात्राचीच लोककला होय. दंडीगानमध्ये प्रमुख वाद्य वीणा असते. दंडीगान सादर करणारा दंडी कलावंत गोंधळातही तेवढ्याच तत्परतेने नाचताना आढळून येतो. आपल्या डाव्या हातात वीणा आणि उजव्या हाती टाळ घेऊन दंडी आपले दंडीगान हे लोकनाट्य सादर करीत असतात. उजव्या हाताच्या पाचही बोटांमध्ये टाळांची दोरी गुंडाळून करंगळी व अनामिका यांच्यात एक टाळ आणि तर्जनी व अंगठा यांच्यात दुसरा टाळ बंदिस्त करून टाळ वाजविण्याचे कौशल्य दंडी कलावंतामध्ये असते. गाण्याच्या ओळी म्हणताना विशिष्ट प्रकारे नाचण्याची त्यांची एक पद्धती आहे. गाण्यातील अंतरा गायल्यानंतर ‘चाल’ गाताना चाल बदलून तिच्यासोबत नाचाचा आवर्तही बदलला जातो.अशाप्रकारे प्रेक्षकांकडून दाद मिळविण्यात दंडी तरबेज असतात. वारंवार तोचतोच नृत्यप्रकार कोणालाही कंटाळवाणा होणार हे या कलावंतांना पुरेपूर माहिती असते. म्हणून नाचाचे वेगवेगळे प्रकार ते गाण्याच्या चालीनुसार सादर करीत असतात. अर्थात या साऱ्या नृत्यविभ्रमांचे कोठेही शास्त्रीयप्रकारे चित्रीकरण करण्यात आलेले नाही; परंतु वंशपरंपरेने त्यांची विशिष्ट पद्धती आकारास आली आहे.
दंडीगानाची सुरुवात नेहमी गण गाऊन होत असते. सर्व भारतीय लोककलांप्रमाणे बुद्धीची देवता गणेशाचे गायन करणे ही प्रथा दंडीगानानेही अनुसरलेली आहे. गण आटोपल्यानंतर नमन सादर केले जाते.त्यानंतर दंडी कलावंत कथासार प्रारंभ करतो. कथासार हा दंडीगान या लोकनाट्याचा आत्मा आहे. रात्रभर चालणारे विविध विषयांवरचे कथासार आपल्या प्रेक्षकांना कसे खिळवून ठेवतील, यावर या लोककलावंतांचा कटाक्ष असतो. कथासारामध्ये वर्णन केलेल्या प्रसंगानुसार पुढील दोन कलावंत चाल गातात आणि मागील तिघे साथीदार नंतर तीच ओळ उचलून प्रेक्षकांच्या मनावर तो प्रसंग बिंबविण्याचे कार्य करीत असतात. दंडीगानामध्ये लावणी व चौक यांना महत्वाचे स्थान आहे. त्यातही चौक किंवा पोवाडा हा काव्यप्रकार दंडीगानासाठी अधिक अनुकुल आहे. जार- मैत्र अशा शीर्षकाने ख्यात असलेले एक कथानक अनेकदा दंडी कलावंत घोळवून घोळवून सादर करीत आले आहेत.उत्तान शृंगाराला पौराणिकतेची झालर लावलेले चंद्रावळीचे आख्यान दंडीगानात अनेकदा सादर केले जाते.याशिवाय दंडार, लळित,गोंधळ आदींचेही चौक कथानकासाठी दंडीगान स्वीकारत असते.
दंडीगान व दंडार यांचे केवळ नामसाम्यच नाही तर अनेक बाबतीत साहचर्यही असल्याचे आढळून येते. एकमेकाच्या काव्याची उसनवारी या दोन लोककलाप्रकारांनी वैपुल्याने केलेली आहे. काव्यप्रकारांच्या बाबतीतही या दोहोत सारखेपणा दिसून येतो.अनेकदा दंडी कलावंत दंडारीतही तेवढ्याच हिरिरीने भाग घेताना आढळतात. पण दंडारीमध्ये आवश्यक असलेला टाहारा किंवा दंड मात्र दंडीगान नामक लोकनाट्यामध्ये अजिबात वापरला जात नाही. शिवाय दंडार हे लोकनाट्य कोहळी, सुतार, कलार, गोंड, गोवारी अशा अठरापगड जातीजमातींना आपल्यात सामावून घेत असते. तर दंडीगान ही दंडी या वंशपरंपरेने कला सादर करणाऱ्या एका विशिष्ट लोकसमूहाची कला आहे.
बारसे, तेरवी अशा प्रसंगांनी दंडी आपली कला सादर करीत असतात. यजमानाकडे आलेल्या पाहुण्यांचे मनोरंजन करून त्यांच्याकडून बिदागी प्राप्त झाली की हे कलावंत आनंदित होत असतात. ही बिदागी स्वीकारण्याचीही त्यांची विशिष्ट रीत आहे. पाहुणा हातात नोट धरून उभा असतो. तेव्हा दंडी कलावंतांचा प्रमुख त्याच्याजवळ जातो. त्याच्याकडून त्याचे नाव गाव विचारून तिथूनच आपल्या सवंगड्यांकडे इशारा करतो.त्याने केलेल्या संकेतांवरून इकडे त्या पाहुण्याच्या नावाचा उद्घोष आपल्या गाण्यात दंडी कलाकार करतात. आणि त्या पाहुण्यासह साऱ्यांनाच बुचकळ्यात पाडतात. हातवारे करून सांकेतिक भाषेत संदेश सांगण्याच्या या पद्धतीला करपावली असे नाव दंडी देतात. ही पद्धती आपल्याला गोंधळातही आढळून येते.
संदर्भ :
- बोरकर,डॉ.हरिश्चंद्र,लुप्तप्राय लोकाविष्कार,तारा प्रकाशन,साकोली,२००८.
समीक्षक – अशोक इंगळे