तीळ

त्वचेवरील नैसर्गिक लहान व रंगीत डाग. तिळाला मस असेही म्हणतात. मेलॅनीन हे रंगद्रव्य असलेल्या पेशींपासून तीळ तयार होतात. काहींच्या जन्मापासूनच शरीरावर तीळ असतात आणि त्यामुळे त्यांना ‘जन्मखूण’ मानतात. परंतु बऱ्याचदा हे तीळ लहान वयात, पौगंडावस्थेत किंवा गरोदरपणात शरीरावर वाढू शकतात. बहुधा वाढत्या वयाबरोबर ते दिसेनासे होतात. शरीराच्या कोणत्याही भागावर तीळ वाढू शकतात. ते आकारमानाने लहान-मोठे असून चपट (सपाट) किंवा त्वचेच्या वर उंचवट्यासारखे असतात. दुसऱ्या प्रकारच्या तिळाला फुगीर तीळ म्हणतात. त्यांचा रंग फिकट तपकिरी ते निळसर-काळा असतो. बहुतेक तीळ लहान असतात आणि त्यांच्या दृश्यरूपात सहसा बदल होत नाहीत. काही वेळा तिळावर लांब व गडद केस असतात. अशा केसयुक्त तिळामध्ये कर्करोग उद्भवण्याचा संभव अधिक असतो. काही कुटुंबातील सदस्यांच्या शरीरावर तीळ वाढण्याची प्रवृत्ती असू शकते. तीळ सहजासहजी दिसून येत नाहीत. मात्र, चेहऱ्यावरील ठळकपणे दिसणारे तीळ काही लोकांना अनाकर्षक वाटतात. असे तीळ शस्त्रक्रियेने काढून टाकता येतात.

बहुतेक तीळ घातक नसतात. मात्र, क्वचित प्रसंगी त्याचे रूपांतर कर्करोगयुक्त अर्बुदात होऊ शकते. अशा प्रकारच्या कर्करोगाला कृष्णकर्करोग (मेलॅनोमा) म्हणतात. या रोगाची सुरुवात तिळापासून होऊन त्याचा रंग बदलतो, खाज सुटते, आकार वाढतो आणि काही वेळा तेथून रक्त वाहते. या रोगामुळे लगतच्या निरोगी ऊतींचा नाश होतो आणि हा कर्करोग शरीराच्या इतर भागांत पसरू शकतो. वेळीच निदान झाल्यास आणि उपचार केल्यास कृष्णकर्करोग बरा होऊ शकतो. त्यामुळे तिळाच्या स्वरूपात कोणताही बदल झाल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.