इंडियन नॅशनल थिएटर : भारताच्या सांस्कृतिक इतिहासात अभिनय आणि संहिता या दृष्टीने मापदंड म्हणून मानली जाणारी एक सांस्कृतिक संस्था. इंडियन नॅशनल थिएटर अर्थात आयएनटी म्हणून सुपरिचित असलेल्या या संस्थेची स्थापना ५ मे १९४४ रोजी मुंबईत झाली. सन १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभागी आंदोलकांना अटक करून वरळी इथे तुरुगांत डांबले असता, सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जनजागृती करून स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र करण्याची चर्चा तुरुगांत झाली. हे सर्व करण्यासाठी एक संस्था स्थापन करण्याचा निर्णयही झाला आणि इंडियन नॅशनल थिएटरची स्थापना करण्याचे ठरले. कवी इक्बाल यांच्या जन्मदिनी पाच भाषेतील कवींचे काव्य संमेलन आयोजित करून या संस्थेच्या कार्याची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि राजस्थान हे आयएनटीचे कार्यक्षेत्र असून महाराष्ट्रात मुंबई तर गुजरातमध्ये राजकोट येथे आयएनटीची कार्यालये आहेत.
प्रारंभीच या संस्थेने देख तेरी बंबई,आम्रपाली, मीराबाई अशा अनेक नृत्यनाटिका सादर करत सांस्कृतिक क्षेत्रात स्वत:च्या नावाच्या ठसा उमटविला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या कांदबरीवर आधारीत डिस्कव्हरी ऑफ इंडिया ही नृत्य नाटिका सादर केली. हळूहळू आयएनटीने नाट्यनिर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्लिश, कन्नड, पारशी इत्यादी भाषांमधून नाट्यनिर्मिती सुरू केली. माधव मनोहर लिखित आणि आत्माराम भेंडे दिग्दर्शित सशाची शिंगे हे आयएनटीचे पहिले नाटक. फार्स हा नाट्यप्रकार मराठी रंगभूमीवर आणण्याचा बहुमान आयएनटीला मिळतो.कोंडी, धुम्मस, छिन्न, ती फुलराणी, करार, बे दुणे पाच अशा शंभराहून अधिक मराठी नाटकांची निर्मिती संस्थेने केली. जवळजवळ तेवढ्याच गुजराती नाटकांची निर्मिती केली. वेगवेगळे प्रयोग करून नाट्यसृष्टीत नवी समीकरणे मांडण्याचे श्रेय या संस्थेला दिले जाते. महाराष्ट्राचा खरा ठेवा लोककलांमध्ये आहे या जाणीवेने आयएनटीने लोकाप्रयोज्य कला संशोधन केंद्रांची स्थापना केली. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान आदी राज्यातील लोककलांचे संशोधन आणि संवर्धनाचे कार्य आणि अनेक कलाप्रकारांचे दप्तरीकरण करण्याचे कार्य त्याद्वारे चालविले आहे. लोककला आणि आदिवासी कलांचे महोत्सव आयोजित करून नागर प्रेक्षकांना लोककलांचे आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले आहे. आयएनटीचे लोकप्रयोज्य कला संशोधनकेंद्राचे दालन देश विदेशातील लोककला अभ्यासकांसाठी खुले आहे.
लोकमहाभारत अर्थात जांभूळ आख्यान तसेच खंडोबाचं लगीन हो लोकनाट्ये मराठी रंगभूमीवर आणून लोककलावंतांना व्यावसायिक रंगमंचावर प्रवेश मिळवून देण्यात संस्थेचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील अनेक लोककला, आदिवासी कलाप्रकार आणि विधीप्रकारांवर संशोधन करून संशोधननाट्ये सादर केली. भक्तीसंगीत महोत्सव, आदिवासी कला महोत्सव आयोजित करून अनेक कलाप्रकारांना संजीवन देण्याचे कार्य केले. अस्तंगत होत चाललेल्या कलांचे सर्वेक्षण करून त्यांचे जतन व्हावे म्हणून अशा कलांची प्रशिक्षण देणारी प्रशिक्षण शिबीरे आयएनटीने वेळोवेळी आयोजित केली आहेत. रासगरबा स्पर्धा आणि अखिल भारतीय लोकनृत्य स्पर्धा या दोन स्पर्धांचे संस्था सातत्याने आयोजन करीत आहे.
संस्थेतील लोकप्रयोज्य कला संशोधन केंद्राने अनेक लोककला प्रकारांना आणि लोककलावंतांना परदेशात कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. १९८५ साली पॅरीस फेस्टीव्हलमध्ये भारताचे सांस्कृतिक प्रतिनिधीत्व या संस्थेने केले आहे. परभणीचे प्रसिद्ध गोंधळी राजारामभाऊ कदम, सांगलीचे शाहीर बापूराव विभुते, लोकशाहीर विट्ठल उमप, लावणी सम्राज्ञी माया जाधव यांनी पॅरीस फेस्टीव्हलमध्ये आपल्या लोककला सादर केल्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना उत्तेजन मिळावे म्हणून आंतर महाविद्यालयीन मराठी आणि गुजराती एकांकिका स्पर्धेचे आयोजन संस्था गेली अनेक वर्षे करीत आहे. या स्पर्धेतून मराठी आणि गुजराती रंगभूमीला लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि तंत्रज्ञ देण्याचे महान कार्य आयएनटीची एकांकिका स्पर्धा करीत आहे. आयएनटी एकांकिका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नवी कोरी संहिता सादर करावी लागत असल्याने दरवर्षी साधारण अनेक नव्या संहिता मराठी रंगभूमीसाठी उपलब्ध करण्याचे कार्यही आयएनटी करीत आहे .
संदर्भ : www.intabc.org