भारतीय लोकसंस्कृतीतील स्त्रीजीवनातील महत्त्वाची रूढी. ही रूढी प्रतीकात्मकतेने साजरी होते. भारतातील विविध प्रांतात व विविध समाजजीवनात व स्तरात ही पद्धत थोड्याफार फरकाने अस्तित्वात आहे. स्त्रियांचा सर्जनशीलता, मातृत्वाचा व तिच्या ठायी असणाऱ्या नवनिर्माणाच्या क्षमतेचा अनुषंग या परंपरेच्या मागे आहे. ओटीभरणे ही अत्यंत सुलभ अशी क्रिया आहे; परंतु त्या परंपरेचे काही निकष, काही नियमही आहेत. ओटी फक्त विवाहित सवाष्ण (जिचा पती हयात आहे अशी सौभाग्यवती) स्त्रियांचीच भरली जाते. विधवा स्त्रीची ओटी भरली जात नाही. हा या पद्धतीतील सामान्य व प्राथमिक नियम आहे. जशी स्त्रीची ओटी भरली जाते तशीच आदिमाया देवी या स्त्रीशक्तीरूपाचीही खण नारळाने ओटी भरून पूजन केले जाते.
ओटी म्हणजे नाभिखालचे पोट म्हणजेच जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग. यालाच ओटी-पोट असेही म्हणतात. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याप्रमाणेच स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे, वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. स्त्रीजीवनातील हा महत्त्वाचा विशेष आहे. विवाहित स्त्रीची कूस उजावी, तिचा ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभीष्टचिंतन केले जाते. एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा तिच्या सर्जनशीलतेचाच आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो. ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होतो. ग्रामीण भागात यालाच फळ भरणे म्हणतात. तसेच लग्नानंतर गर्भधान विधी यातही ओटी भरली जाते. मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतीकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये अन्युस्युत आहे. माहेराहून सासरी जाणाऱ्या मुलींची ओटी भरली जाते. ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरे, लेकुरवाळे हळकुंड, हळद, कुंकू, पाच प्रकारची फळे इत्यादी साधन सामुग्री वापरली जाते. नवविवाहिता असेल तर या पद्धतीला खूप महत्त्व आहे. पाच सुवासिनी तिची ओटी भरतात. एक एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात. कालांतराने यथोचित पुत्रप्राप्ती झाल्यावर एक, दोन जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात. ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्त्वाची आहे. ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतीकात्मक अर्थ आहे. या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्ननिवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक, शुभदायी आहेत. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही रूढी अजूनही समाजजीवनात पाळली जाते यावरूनच या विधीचे महत्त्व लक्षात येते.
Very nice