आज आपण एकविसाव्या शतकातील जागतिकीकरणाच्या संस्कृतीत जगत आहोत. वनवासी संस्कृती, कृषी संस्कृती, औद्योगिक संस्कृती अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्या संस्कृतीचा प्रवास झाला आहे. आजची एकविसाव्या शतकातील संस्कृती ही प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञानाच्या आधारावर उभी राहिलेली आहे. आजच्या या माहितीच्या महास्फोटामध्ये नवनवीन माहिती लोकांपर्यंत रोज पोहोचते आहे. ही माहिती जशी उपयोगी पडणारी आहे, तशीच ती गोंधळात टाकणारीही आहे. ही सर्व माहिती योग्य प्रकारे, खऱ्या व प्रमाणित स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचविण्याचे अनेक प्रयत्न होताना आपण पाहतो. यात यशस्वी होण्यासाठी – ही ज्ञानसंस्कृती म्हणजे काय? तिचे स्वरूप काय? या ज्ञानसंस्कृतीची निर्मिती कशी झाली? तिचे मूलभूत घटक कोणते? आणि त्यांची बिजे मराठी भाषिक समाजात कशी रुजविता येतील? ह्या बाबींचा विचार होणे अतिशय आवश्यक आहे. विश्वकोशाचे प्रमुख कार्य हेच आहे.

पार्श्वभूमी : पृथ्वीवर सजीव सृष्टीच्या विकासापासून आजतागायत निसर्गात उत्क्रांतीचा एक अखंड प्रवास आपण पाहतो. या प्रवासात इतर प्राण्यांप्रमाणेच मानवालाही उत्क्रांतीच्या अनेक टप्प्यांमधून जावे लागले. सर्व प्राण्यांप्रमाणेच मानवातही शारिरीक उत्क्रांती  घडून आली; मात्र एका ठरावीक टप्प्यानंतर मानवाच्या जाणिवांचा आणि बौद्धिक क्षमतांचा विकास हा जलद गतीने झाला. इतर प्राण्यांमध्ये मात्र त्यांच्या जगण्याच्या संघर्षाकरिता आवश्यक तेवढ्याच बुद्धीचा व जाणिवांचा विकास झाला. मानवापाशी आलेल्या समूहजीवनाच्या प्रेरणेचा विकास संस्कृतीमध्ये करून मानवाने स्वत:चे स्वतंत्र असे सामाजिक भावविश्व निर्माण केले.  त्याच्या भावभावना, जाणिवा व शोधक बुद्धी यांच्या प्रगतीतून त्याच्या संस्कृतीचा विकास झाला. अगदी पुराश्मयुगापासूनच मानवी अस्तित्वास सामूहिक जीवनाचे स्थैर्य मिळाल्यानंतर मानवाची अंगभूत जिज्ञासा जागृत होऊ लागली. या जिज्ञासेतूनच निरीक्षण व अनुमान यांच्या जोरावर मानवाने आपल्या बुद्धीने आपल्या भोवतालच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. अशा प्रयत्नांचे प्रारंभिक रूप आपल्याला पुराश्मयुगीन गुफांमधील भित्तिचित्रांच्या रूपात पाहता येते. समूहजीवनातील श्रमविभागणीचा प्रत्ययही या भित्तिचित्रांवरून येतो. आपल्या कार्यसिद्धीसाठी निसर्गातील अन्य साधनांचा वापर होऊ शकतो हे जेव्हा माणसाच्या लक्षात आले, तो मानवी संस्कृतीचा प्रारंभबिंदू ठरतो. आदमगड आणि भीमबेटका येथील भित्तिचित्रांमधून अश्मयुगीन मानवाने आपल्या वेगवेगळ्या गरजा भागविण्यासाठी केलेल्या व्यवस्थांचे प्रतिबिंब आपण पाहू शकतो. येथील शिकारीची दृश्ये आणि समूहनृत्यासारखी सामूहिक जीवानाचे प्रतिनिधित्व करणारी दृश्ये ही सर्व या प्रारंभिक मानवी संस्कृतीची उदाहरणे आहेत.

प्राणिसृष्टीमधला वानर आणि त्यापासून पुढे उत्क्रांत झालेला मानव यांच्या जनुकीय (जेनेटिक) जडणघडणीत फारसा फरक दिसत नाही. मानवाचा पूर्वज एप वा आजच्या मानवाच्या शरीराशी साम्य दर्शविणारे उरांग-उटांग, चिंपांझी यांसारखे वानर आणि मानव यांच्या एकूणच डिएनएमध्ये फरक हा फक्त दीड ते पावणे दोन टक्के इतकाच आहे; मात्र बौद्धिक विकासाच्या दृष्टीने या दोहोंमध्ये प्रचंड फरक आढळून येतो. त्यामुळे पृथ्वीवर मानवाचे सार्वभौम साम्राज्य निर्माण झाले आहे व इतर प्राणिसृष्टीचे जीवन आज मानवाच्या मर्जीवर अवलंबून आहे. इतकी थक्क करणारी ही प्रगती मानवाने आपल्या शारिरीक शक्तीच्या बळावर केलेली नसून या सर्व बदलांमागे प्रचंड गतीने उत्क्रांत झालेला मानवाचा मेंदू आहे.

वानर व माणूस ह्यांची मूलभूत शारिरीक रचना साधारण सारखीच आहे, मात्र मेंदूच्या संरचनेत घडत गेलेला फरक हेच मानवी प्रगतीचे कारण ठरल्याचे दिसून येते. मानवाच्या जाणिवा व त्याची बौद्धिक क्षमता ह्यांचा विकास आणि त्याचबरोबर मानवाच्या मेंदूच्या संरचनेत होत जाणारा बदल हा एकत्रितपणे होत होता. वैज्ञानिक परिभाषेत सांगावयाचे झाल्यास मानवी मेंदूतील प्रिफ्रंटलकॉर्टेक्स्टचा झालेला विकास हेच सर्व क्षेत्रांत मानव करत असलेल्या विजयी संचाराचे गमक आहे.

ज्ञाननिर्मिती

          निसर्गातील घटना आणि प्रक्रिया यांकडे प्रारंभीच्या काळात आश्चर्याने पाहणारा मनुष्य हळूहळू या इंद्रियगोचर पण अपूर्व घटनांबाबत कार्यकारणभावाचा संबंध शोधू लागला. यामुळेच मानवी जीवनाचा प्रवास हा समूहाकडून सामाजिक संस्कृतीच्या दिशेने सुरू झाला. आपल्या व आपल्या प्रियजनांच्या सुरक्षिततेसाठी टोळ्यांमध्ये जगणारा मनुष्य आपल्या सहकाऱ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी हळूहळू हावभाव करू लागला. या हावभावांमधूनच पुढे विविध बोली भाषा विकसित झाल्या. याच बोलींमधून भाषांचा विकास होऊन त्यांतून लिप्या निर्माण झाल्या. अशा प्रकारे टोळीजीवनापासून विकास घडवत मानवाने आपापल्या समूहाची स्वतंत्र संस्कृती निर्माण केली.

हावभाव, बोली भाषा, लिपी, मिथके, पारलौकिक अस्तित्वाविषयीच्या संकल्पना, त्यांचा पुढे धर्मसंकल्पनांमध्ये झालेला विकास आणि या सर्व घटकांच्या अनुषंगाने कालांतराने त्या-त्या मानवी समाजाने निर्माण केलेले स्वतःचे साहित्य असा मानवी संस्कृतीच्या विकासाचा एक मार्ग आहे. स्वतःच्या अंतर्विश्वावर आधारित त्याने स्वतंत्र वाङ्मयाची निर्मिती केली आणि त्यातून मानवी मन अधिक प्रगल्भ झाले. कलेच्या रूपातून मानवी प्रतिभेने विविध कलाशाखांचा आविष्कार घडविला. कार्यकारणभावाची तार्किक संगती लावून निसर्गाची कोडी सोडविण्याचा जो प्रयत्न  मानवाने केला, त्यातून वैज्ञानिक क्षेत्राचा विकास झाला. अशा प्रकारे मानवी बुद्धीची प्रगती मानव्यविद्या, कला-सौंदर्यशास्त्र आणि विज्ञान-तंत्रज्ञान अशा विविध मार्गांनी झाली. या सर्व क्षेत्रांच्या विकासातून प्रगत झालेले मानवी व्यक्तित्व, त्यातून समृद्ध झालेले त्याचे भावविश्व आणि समाजमन हे मानवाच्या ज्ञानसंस्कृतीचे अंगभूत घटक ठरतात. आपण पंचेंद्रियांद्वारा आपल्या भोवतालचे जग जाणून घेतो, हे जाणून घेतानाच माणसाने गणित नावाची जग जाणून घेण्याची एक स्वतंत्र विद्याशाखा आपल्या बुद्धीतून निर्माण केली; जिला आज सहाव्या इंद्रियाचे स्थान प्राप्त झाले आहे.  मानवी संस्कृतीमध्ये ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आणि मानव्यविद्यांच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतींनी होते. मिळणाऱ्या माहितीचे तर्कसुसंगत असे काढलेले सार हेच ज्ञान होय. वैज्ञानिक क्षेत्रातील ज्ञान हे तर्कसुसंगतीवर आधारलेले , वस्तुनिष्ठ आणि वैश्विक असते. या ज्ञानावरच या क्षेत्रातील इतर ज्ञानशाखांचा विकास झाला. वैज्ञानिक क्षेत्रातील ज्ञानाचे संवर्धन मिळालेल्या माहितीचा व विकसीत केलेल्या ज्ञानाचा पडताळा करुन अणि त्या ज्ञानाचा सर्वांगाने विचार करून होत असते.

मानव्यशाखेतील ज्ञान हे मानवाची अंतःप्रेरणा, या प्रेरणेतून निर्माण होणारी प्रज्ञा; आणि मानवाला त्याच्या जीवनात येणारे अनुभव व या अनुभवांचा त्याने आपल्या परीने लावलेला अर्थ अशा दोन्ही गोष्टींच्या परस्पर संवादातून निर्माण होते. येणारा अनुभव एकच असतो, मात्र व्यक्तिपरत्वे त्या अनुभवाचे अर्थ बदलत जातात. म्हणजेच, आपल्याला येणाऱ्या अनुभवांवर प्रत्येक जण आपल्या बुद्धीनुसार संस्करण करत असतो. अनुभवांचा अर्थ असा वेगवेगळ्या प्रकारे लावण्याच्या प्रक्रियेतूनच मानवाने विश्लेषणात्मक ज्ञानाची निर्मिती केली आणि आपल्या विश्लेषणाला तर्कसंगतीचे अधिष्ठान देऊन मानव्यविद्यांमधील ज्ञानाच्या निरनिराळ्या शाखा निर्माण केल्या.

अशाप्रकारे ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया ही वैज्ञानिक क्षेत्रामध्ये जशी वस्तुनिष्ठ व वैश्विक असते तशीच ती मानव्यविद्यांच्या क्षेत्रामध्ये विश्लेषणात्मक आणि व्यक्तीसापेक्ष असते. ही ज्ञानप्रक्रिया ज्ञानाच्या आदानप्रदानातुन सामाजिक बनत जाते. या आदानप्रदानातुनच ज्ञानाचे अभिसरण समाजाच्या सर्व अंगोपांगात होते. आणि त्यातुनच समाजाची ज्ञानसंस्कृती निर्माण होते.

ज्ञानसंस्कृती

          ज्ञानाच्या आदानप्रदानाची ही व्यवस्था मानवी समाजजीवनाच्या इतिहासात निरनिराळ्या संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे विकसित झाली. ही ज्ञानप्रक्रिया सर्वांसाठी खुली असणे, सर्वांना त्याचा लाभ होणे आणि त्यात भर घालणे शक्य असेल, तरच या ज्ञानप्रक्रियेतून एक सुजाण व सुशिक्षित समाज उभा राहू शकतो. मात्र हीच ज्ञानप्रक्रिया काही व्यक्तींपुरती वा गटांपुरती मर्यादित राहिल्यास त्यातून ज्ञानास व ज्ञाननिर्मितीस पोषक वातावरण निर्माण होऊ शकत नाही. भारतात प्राचीन काळापासून निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये अशी ज्ञाननिर्मिती होत होती. मात्र हे ज्ञान काही वर्ग आणि काही व्यक्ती यांच्यापुरतेच मर्यादित राहिल्याने आपल्याकडे ज्ञानसंस्कृतीचे सर्वांगीण पोषण होऊ शकले नाही. आपल्याकडे ज्ञाननिर्मिती व्यक्तिनिष्ठ आणि व्यक्तिसापेक्ष राहिली. त्यातून सामूहिक ज्ञानाचा विकास होऊ शकला नाही.

छपाईच्या शोधापूर्वी अथवा छपाईचा शोध हा व्यवहारामध्ये सर्व जनांसाठी खुला होण्यापूर्वी ज्ञानविस्ताराची, आदानप्रदानाची साधने आणि संधी या दोन्ही गोष्टी मर्यादित होत्या. ज्ञानसंस्कृतीच्या विकासक्रमात मानवाने केलेला भाषेचा व लिपीचा वापर ही जर पहिली क्रांती मानली, तर छपाईचा शोध ही दुसरी क्रांती म्हणता येईल. या शोधामुळे ज्ञान सर्वदूर व सर्व स्तरांत पोहोचणे शक्य झाले. हा ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचा प्रारंभ म्हाणता येईल.

युरोपातही प्रबोधन काळापूर्वी ज्ञानाच्या क्षेत्रातील व्यवहार हे धर्माधिष्ठित होते. मात्र प्रबोधन काळानंतर विविध वैज्ञानिक शोधांमुळे पारलौकिक जीवनापेक्षा ऐहिक जीवनाचे महत्त्व अधिक वाढले. औद्योगिक क्रांतीनंतर जुन्या व्यवस्थांची जागा नव्या ज्ञानसंस्कृतीने घेतली आणि या काळात स्थापन झालेल्या विद्यापीठांनी समाजात ज्ञानसंस्कृतीची ऊर्जा निर्माण केली. यातून युरोपात सामूहिक ज्ञानाचा विकास घडून येऊ लागला आणि या ज्ञानाच्या जोरावर युरोपातील देशांनी जगभरात आपले वर्चस्व निर्माण केले. सतराव्या शतकापर्यंत भारत व चीन या देशांचा प्रभाव जागतिक व्यापारावर होता. परंतु युरोपातील ज्ञानसंस्कृतीप्रमाणे सर्वांसाठी खुली व सर्वसमावेशक आणि सर्वंकष ज्ञानसंस्कृती येथे न रुजल्याने या देशांना आपले वचर्स्व टिकवून ठेवता आले नाही. तर्कसुसंगत आणि अनुभवप्रामाण्यवादी अशा ज्ञानाची निर्मिती, आणि या ज्ञानप्रक्रियेत सर्व समाजाचा सहभाग हीच युरोपीय ज्ञानसंसकृतीचे वैशिष्ट्ये म्हणता येतील. युरोपमध्ये जे प्रबोधनपर्व सुरू झाले, त्यामध्ये छपाईच्या शोधाचे योगदान महत्त्वपूर्ण होते. ज्ञानाच्या लोकशाहीकरणाची आणि समावेशक ज्ञानसंस्कृतीची ही महत्त्वपूर्ण पायरी म्हाणता येईल.

सर्वसमावेशक ज्ञानसंस्कृती

          इंटरनेटच्या शोधानंतर ज्ञानसंस्कृतीच्या क्षेत्रात तिसरी क्रांती झाली आहे. या तिसऱ्या क्रांतीमुळे माहिती मिळविण्याची प्रक्रिया वैश्विक, जलद आणि दृक्‌श्राव्य माध्यमांद्वारे बहुस्पर्शी झाली आहे. यातून एक नवी विश्वसंस्कृती उदयास येत आहे. लोकशाहीकरणामुळे आज समाजातील सर्वच व्यक्तींना ज्ञान प्राप्त करण्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या संधींचा पुरेपूर वापर करता आला आणि या संधी समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविता आल्या, तर त्यातून एक सर्वसमावेशक अशी ज्ञानाच्या आदानप्रदानाची संस्कृती उभी राहू शकते.

केवळ शिकारीवर अवलंबून असलेल्या आदिमानवाने शेती करण्यास प्रारंभ केला, तेव्हा त्यातून एका सुस्थिर कृषिसंस्कृतीचा प्रारंभ झाला. त्या वेळी कोणापाशी किती जमीन याला महत्त्व होते. वैज्ञानिक क्रांतीसोबतच युरोपात औद्योगिक संस्कृतीचा विकास झाला. जमिनीपेक्षा भांडवलाचे महत्त्व वाढले. ज्यापाशी भांडवल अधिक, त्याचे महत्त्व समाजात वाढले. आता तेच महत्त्व ज्ञानसंस्कृतीस आले आहे. ज्ञानातून निर्माण होणारे नवेनवे तंत्रज्ञान शोधण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये वा समाजात असेल, त्या व्यक्ती वा तो समाज हे एकविसाव्या शतकात महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

विसाव्या शतकाच्या अखेरीस माहितीतंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या अनन्यसाधारण प्रगतीच्या जोरावर संपूर्ण जगामध्ये संपर्क-क्रांती घडून आली. मोबाईल, संगणक, इंटरनेट यांसारख्या अत्याधुनिक साधनांच्या जोरावर आजवर एकमेकांपासून विलग राहिलेले मानवी जग एकत्र आले. आज आपण खरोखरच ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या महोपनिषदातील सत्याचा अनुभव घेत आहोत. आणि जगाच्या या जवळ येण्यामुळे माहितीचा महास्फोट झालेला आपण पाहत आहोत. आज आपल्या हातात इतकी साधने आहेत की, जगाच्या सुदूर कोपऱ्यातील माहितीदेखील सर्व बाजूंनी आपल्याला प्राप्त होत आहे. या अशा अंगावर येणाऱ्या माहितीचा तर्कसुसंगत अर्थ लावणे अतिशय आवश्यक बनलेले आहे. हा अर्थ लावण्यासाठी आपल्याला त्या-त्या ज्ञानशाखांमधील मूलभूत संकल्पनांचा व सिद्धान्तांचा योग्य परिचय असणे आवश्यक आहे. अशा ज्ञानानंतरच आपण वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधील संकल्पनांचा परस्पर संबंध पाहू वा पडताळू शकतो. अशा प्रकारे मूलभूत ज्ञान आपल्या गाठीशी नसल्यास प्रचंड गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत. काही दशकांपूर्वी भाषा, भौगोलिक अंतर, साधनांची उपलब्धता आदी अनेक मर्यादांमध्ये बांधली गेलेली ही ज्ञानप्रक्रिया आज तंत्रज्ञानाच्या उपलब्धीनंतर संपूर्ण जगास कवेत घेऊ शकत आहे. ज्ञाननिर्मिती, ज्ञानप्रचार आणि ज्ञानप्रसार हे सर्वच आज विकसित तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे सर्व जनांसाठी खुले आहे. निर्मिती झालेल्या ज्ञानाचे संहितीकरण, त्यावर अधिक प्रक्रिया आणि त्यातून नव्याने होणारी ज्ञाननिर्मिती ह्या प्रक्रिया आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळेच सहज शक्य बनलेल्या आहेत. या एकूणच ज्ञानप्रक्रियेत आज असे तंत्रज्ञान गाठीशी असणारी प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने हातभार लावू शकते.

या पार्श्वभूमीवर माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातील प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ भारतापाशी असल्याने गेल्या पंचवीस ते तीस वर्षांत जागतिक स्तरावर भारताची विशेष दखल घेतली जात आहे. भारतीयांच्या बौद्धिक क्षमतेची अनुभूती युरोप व अमेरिका यांसारख्या विकसित देशांनाही येत आहे. याचा उपयोग करून आपल्या प्रचंड जनशक्तीला या ज्ञानसंस्कृतीमध्ये सहभागी करून घेऊन सक्षम करता आले, तर एक जागतिक महाशक्ती म्हणून आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करता येईल. त्यामुळे उपलब्ध सर्व प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे सर्व समाजघटकांमध्ये ज्ञानाच्या प्रक्रियेस चालना देणे हेच विश्वकोशाचे उद्दिष्ट आहे.