“मराठी भाषा विभाग” व “महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून” मराठी भाषेच्या आणि मराठी विश्वकोशाच्या प्रचार व प्रसाराकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून वाई तालुक्यातील शाळांमधील इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता सन 2023 पासून विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सदरची स्पर्धा ही वाई तालुक्यापर्यंत सीमित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात ऑनलाइन आयोजित करण्याचा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा मानस आहे.
मराठी विश्वकोश मंडळामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी कुमार विश्वकोश हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. ज्ञानवर्धन स्पर्धेचा अभ्यासक्रम हा कुमार विश्वकोश या प्रकल्पावर तसेच मराठी विश्वकोशाची प्रस्तावना आणि मराठी वर्णानुक्रम यांवर आधारित असणार आहे. स्पर्धेचे माध्यम मराठीच असणार आहे. अभ्यासक्रमही मराठीतच असणार आहे. हा अभ्यासक्रम इयत्ता नववीच्या मुलांना झेपेल आणि रुचेल असा विज्ञानविषयाशी निगडित आहे.
विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेचे उद्दिष्ट : विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा हा उपक्रम मराठी भाषेचा प्रचार आणि वाचन संस्कृतीची जोपासना करणे या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकरिता मराठी विश्वकोशातर्फे राबवला जात आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाची प्रवेश फी घेण्यात येत नाही.
विद्यार्थ्यांना सर्वांगीण विचार करायला प्रवृत्त करणे आणि स्पर्धा परीक्षांना आवश्यक विचारसरणीला खतपाणी घालणे हे एक उद्दिष्ट याद्वारे साध्य होईल. तसेच या निमित्ताने विद्यार्थ्यांना मराठी विश्वकोश वाचनाकरिता प्रोत्साहन मिळेल. विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासाठी मराठी विश्वकोशाचा एक उपयुक्त संदर्भग्रंथ म्हणून अधिकाधिक वापर करावा, याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेचे स्वरूप :
- सन २०२3 पासून विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येत होती. परंतु यावर्षीपासून ऑनलाइन स्वरूपात घेतली जाणार आहे.
- ज्ञानवर्धन स्पर्धा मराठी, हिंदी, इंग्रजी अथवा कोणत्याही माध्यमातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना देता येईल. ही स्पर्धा केवळ मराठी भाषेतूनच घेतली जाईल.
- संगणक किंवा मोबाईलचा वापर करून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी परीक्षा यंत्रणा राबविण्यात येणार आहे.
- परीक्षेच्या नोंदणीकरिता लिंक व अभ्यासक्रम विश्वकोश मंडळाच्या संकेतस्थळावर लवकरच दर्शविण्यात येईल.
- प्रत्यक्ष परीक्षेचा दिनांक आणि वेळ संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
- परीक्षेमध्ये ५० बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार असून प्रत्येक प्रश्नाला दोन गुण यानुसार एकूण १०० गुण असणार आहेत. परीक्षा कालावधी एक तासाचा असेल.
- परीक्षा झाल्यानंतर लगेच निकाल जाहीर होणार नाही. त्यानंतर कार्यालयीन परीक्षा समिती आणि संगणक विभाग यांच्या समन्वयाने निकालाचे योग्य परीक्षण करून त्यानंतर निकाल मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
- या स्पर्धेच्या अनुषंगाने आवश्यक असलेला अभ्यासक्रम, नमुना प्रश्नसंच, परीक्षेची लिंक, परीक्षेचा निकाल व इतर आवश्यक बाबी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या www.marathivishwakosh.org या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहेत.
- ज्ञानवर्धन स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांमधून ग्रामीण व शहरी शाळांतून, तालुकानिहाय, जिल्हानिहाय, राज्यस्तरीय अशा स्वरूपात पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. सदर परीक्षेच्या अनुषंगाने आवश्यक असणारी माहिती मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रकाशित करण्यात येणार आहे.