गुरू अमरदास : (५ मे १४७९—१ सप्टेंबर १५७४). शिखांचे तिसरे गुरू. त्यांचा जन्म अमृतसरजवळील बासरके येथे झाला. वडिलांचे नाव तेजभान, तर आईचे नाव लखो (लखमी) असे होते. अमरदास हे वैष्णवपंथी होते. खूप तीर्थयात्रा करूनसुद्धा त्यांना समाधान वाटत नसे. एखादा गुरू भेटावा आणि आपल्या आयुष्याचा उद्धार करावा, असे त्यांना नेहमी वाटत असे. एक दिवस असेच योग्य गुरूच्या शोधात असताना बीबी अमरों (गुरू अंगददेव यांची कन्या) यांच्याकडून ‘गुरुबानी’ ऐकली आणि त्यांना गुरू अंगददेव यांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली. ते खडूर साहिब येथे गुरू अंगददेव यांना भेटण्यासाठी गेले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन अमरदास यांनी गुरू अंगददेव यांना आपले गुरू मानले. त्यानंतर त्यांनी गरीब-गरजूंची, लंगरची आणि गुरू अंगददेव यांची नि:स्वार्थपणे सेवा केली. परिणामस्वरूप गुरू अंगददेव यांनी १५५२ साली अमरदास यांना गुरूपद सोपविले.
गुरू अंगददेव यांच्या आदेशानुसार गुरू अमरदास यांनी व्यास नदीच्या काठावर गोइंदवाल या शहराची स्थापना केली. कालांतराने हे शहर शीख धर्माच्या प्रसाराचे आणि अध्यात्माचे एक प्रमुख केंद्र बनले. गुरू अमरदासांनी गुरू नानकांच्या तत्त्वांचा प्रचार करण्यासाठी २२ धार्मिक उपदेश केंद्र (मंजी) स्थापन केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी पंगतीत बसून लंगरभोजन केल्यानंतरच गुरूंच्या दरबारात प्रवेश करून सत्संग करण्याचा नियम स्थापित केला. महिलांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी पडदापद्धत आणि सतीची प्रथा बंद करण्यावर भर दिला. त्यांनी सु. २२ वर्षे गुरूपद सांभाळले. शीख धर्मग्रंथ गुरू ‘ग्रंथसाहिब’मध्ये त्यांचे १८ रागांमध्ये ८८४ सूक्ते वा श्लोक संगृहीत आहेत. त्यांनी आपला जावई असलेल्या भाई जेठा (रामदास) यांना उत्तराधिकारी नेमून १५७४ मध्ये गुरूपद सोपविले.
गुरू अमरदास यांनी आपल्या वाणीत ईश्वराची महिमा, प्रभूप्राप्तीचे साधन, जनकल्याण व सेवा आणि परमेश्वराचे नामस्मरण यांवर विशेष भर दिला. पुढे दिलेल्या वाणीत ते असे म्हणतात की, “मन मैलै सभु किछु मैला, तनि धोतै मनु हछा न होइl”
अर्थ : जर मन मलिन असेल, तर सर्व मलिन होते. शरीर वारंवार धुण्याने मन शुद्ध होत नाही. तर प्रभूचे नामस्मरण करून चांगले विचार ठेवून आणि सत्याचे आचरण करून मन शुद्ध होते.
गोइंदवाल येथे ते ब्रह्मलीन झाले.
संदर्भ :
- पदम, प्यारासिंह, ‘संक्षेप सिक्ख इतिहास’, अमृतसर, २०१३.
- महाजन, राजींदरकौर, ‘श्री गुरू ग्रंथसाहिबजी में अभिव्यक्त मानवता’, दिल्ली, २०२३.
समीक्षक : राजिंदरसिंह तेजासिंह पानेसर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.