जामसंडेकर, राजाराम सखाराम (५ एप्रिल १९५२ – २२ जानेवारी २०२६) : महाराष्ट्रातील एक प्रख्यात ढोलकीवादक. त्यांचे पूर्ण नाव राजाराम सखाराम जामसंडेकर असे होते. त्यांचा जन्म मुंबई येथील टँक पाखाडी परिसरातील आग्रीपाडा येथे एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांना सहदेव आणि महादेव ही सख्खी भावंडे होती, तर बाबुराव जामंसंडेकर हे त्यांचे सावत्र बंधू होते. बाबुराव यांचे उस्ताद आमिर हुसेन खाँ यांच्याशी निकटचे संबंध असल्याने त्यांनी तबलावादनाचे उत्कृष्ट शिक्षण घेतले होते. बाबुराव यांनी सहदेव यांना तबलावादनाचे प्रशिक्षण दिले आणि पुढे सहदेव यांनी राजाराम यांना तबलावादनाचे शिक्षण दिले. तथापि, राजाराम यांचा कल ढोलकीवादनाकडे अधिक होता. त्यामुळे त्यांनी अल्पवयातच तबल्याबरोबर ढोलकीचेही प्रशिक्षण घेतले. एकाच वेळी गळ्यात दोन ढोलक्या अडकवून वादन करण्याची त्यांची शैली वैशिष्ट्यपूर्ण मानली जात असे. त्यांनी स्वतःच्या अभ्यासातून ढोलकीवादनाची स्वतंत्र शैली विकसित केली.
राजाराम जामंसंडेकर हे कलेच्या ओढीने पूर्णतः भारावलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत ढोलकीवर नितांत प्रेम केले. कलाक्षेत्रात ते ‘आबा’ या टोपणनावाने ओळखले जात. तमाशा, वगनाट्य आणि लोकनाट्य यांमध्ये त्यांनी ढोलकीची अप्रतिम साथ दिली. त्यांच्या कडक आणि प्रभावी ढोलकीवादनामुळे त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाई. रेल्वे मंडळाने आयोजित केलेल्या ‘हिट्स ऑफ नौशाद’ या कार्यक्रमात त्यांना वादनाची संधी मिळाली आणि तेथूनच त्यांच्या कलात्मक कारकिर्दीला नवे बळ मिळाले. पुढे ते भारतीय रेल्वे सेवेत रुजू झाले. याच काळात त्यांना ज्येष्ठ संगीतकार विश्वनाथ मोरे यांचा सहवास लाभला. अनेक चित्रपटांसाठी चाली बांधणे, वाद्यसंगीताचे संयोजन करणे अशी विविध कामे त्यांनी केली. ढोलकीवरील त्यांच्या प्रभुत्वामुळे त्यांचा स्वतंत्र रसिकवर्ग निर्माण झाला. पं. सातमकर गुरुजी आणि पं. अरविंद मुळगावकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वादनाचे शास्त्रीय शिक्षण घेतले. ढोलकीबरोबरच तबला, पखवाज, ढोलक, संबळ आणि इतर चर्मवाद्यांच्या वादनातही ते प्रवीण होते.
प्रचंड परिश्रम आणि सातत्यपूर्ण साधनेद्वारे त्यांनी आपल्या बोटांतील कलात्मकता ढोलकीवादनातून व्यक्त केली. त्यांच्या कार्यक्रमांत ढोलकीचा अस्सल ठेका आणि रसिकांची उत्स्फूर्त दाद हे वैशिष्ट्यपूर्ण ठरत असे. त्यांच्या वादनातील शास्त्रशुद्धता आणि लयबद्धता यांमुळे त्यांची लोकप्रियता सातत्याने वाढत गेली. त्यांच्या ढोलकीवादनातील प्रावीण्यामुळे पं. भवानी शंकर यांनी त्यांची शिफारस तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्याकडे केली. त्यानंतर ते झाकीर हुसेन यांच्या ‘तालकचेरी’ या उपक्रमाचे महत्त्वाचे सदस्य झाले. त्यांनी झाकीर हुसेन यांच्यासोबत अनेक परदेश दौरे करून महाराष्ट्राच्या ढोलकीची ओळख जागतिक स्तरावर पोहोचविण्याचे कार्य केले.
शारीरिकदृष्ट्या कृश असले तरी त्यांच्या हातातील ठेका आणि लय यांमुळे रसिक मंत्रमुग्ध होत असत. ढोलकीवरील विविध बोल, लय, ठेका आणि सादरीकरणातील सूक्ष्म बारकावे त्यांनी आपल्या वादनातून प्रभावीपणे व्यक्त केले. त्यामुळे त्यांचे वादन रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले. ग्रामीण भागातील कार्यक्रमांसाठी ते अनेकदा प्रतिकूल परिस्थितीतही प्रवास करीत. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी अनेक किलोमीटर पायी चालत जाऊन, स्वतःची बॅग आणि वजनदार सिसमची ढोलकी वाहून नेत, ते दीर्घकाळ उत्साहाने वादन करीत असत. त्यांच्या या समर्पणातून त्यांच्या कलासाधनेची प्रचीती येत असे. ते अत्यंत नम्र स्वभावाचे असल्याने प्रत्येक ठिकाणी रसिकांशी आदराने वागत असत. संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी तबला, ढोलकी आणि पखवाज वादन केले. हिंदीतील नाचे मयुरी, नगीना, राम लखन, खलनायक तसेच मराठीतील गोंधळात गोंधळ, हळदीकुंकू इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी वादन केले. त्यांना अनेक नामवंत संगीतकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. संगीतकार आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत–प्यारेलाल, राम–लक्ष्मण, उत्तमसिंग आणि बप्पी लाहिरी यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते.
लोकसंगीतापासून शास्त्रीय संगीतापर्यंत ढोलकीला जागतिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तमाशा, लावणी आणि लोकसंगीताचा अस्सल बाज जपत त्यांनी ढोलकीला चित्रपटसृष्टी आणि शास्त्रीय संगीताच्या सर्वोच्च मंचापर्यंत पोहोचवले. अनेक वादकांनी ढोलकीवर शास्त्रीय संगीत सादर करताना तबल्याच्या परंपरेचा आधार घेतला; मात्र राजाराम जामंसंडेकर यांनी ढोलकीचा अस्सल लोकसंगीताचा बाज कायम ठेवून तिची स्वतंत्र शास्त्रीय अभिव्यक्ती विकसित केली. ढोलकीला स्वतंत्र, प्रतिष्ठित आणि प्रमुख वाद्य म्हणून स्थापित करण्यात त्यांचे योगदान मैलाचा दगड ठरले.
सन १९८३ मध्ये त्यांना कोर्ग आयलंड फेस्टिव्हलसाठी निमंत्रित करण्यात आले. लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी महाराष्ट्रातील विविध लोककला सादर करण्यासाठी तयार केलेल्या पाच सदस्यीय चमूमध्ये संगीतकार अच्युत ठाकूर, कमलाकर पाटील, मंदा काळे आणि राजाराम जामसंडेकर यांचा समावेश होता. या सादरीकरणातून भारताला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या यशामुळे राजाराम जामंसंडेकर यांच्या कलागुणांचे मोठे कौतुक झाले. राजाराम आणि त्यांचे बंधू सहदेव हे दोघेही कुशल वादक आणि संगीतकार होते. ध्वनिमुद्रिका कंपन्यांसाठी संगीतबद्ध केलेल्या रचनांमध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप, नंदेश उमप आणि गायिका उत्तरा केळकर यांच्यासोबत त्यांनी काम केले. ढोलकीवरील त्यांच्या प्रेमामुळे त्यांनी या वाद्याला एक स्वतंत्र आणि प्रभावी अभिव्यक्ती प्राप्त करून दिली. त्यांना मोठा रसिकवर्ग आणि शिष्यपरिवार लाभला. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मृद्गंध पुरस्कार, संगीत कलारजनी पुरस्कार आदी सन्मान प्राप्त झाले. महाराष्ट्राच्या लोकसंगीत आणि तालवाद्य परंपरेला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात त्यांचे योगदान चिरस्मरणीय मानले जाते.
ढोलकीसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे हे प्रतिभावंत कलाकार २२ जानेवारी २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन पावले.
संदर्भ : https://www.mahamtb.com/Encyc/2026/2/7/a-condolence-meeting-has-been-organized-for-the-late-guru-pandit-rajaram-jamsandekar-pt-rajaram-jamsandekar-.html (२८- ०६ – २०२६)
समीक्षक : जगतानंद भटकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
