उत्पात, ज्ञानोबा विठ्ठल : (२६ सप्टेंबर १९३५ – १९ जुलै २००६). महाराष्ट्रातील प्रख्यात लावणीगायक, शाहीर आणि रचनाकार. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे झाला. त्यांनी एम.ए. आणि बी.एड. ही पदवी प्राप्त केली होती. ते व्यवसायाने शिक्षक होते. बालपणापासूनच त्यांच्यावर घरातील भजन, कीर्तन आणि संगीत परंपरेचे संस्कार झाले. पंढरपूर हे त्यांचे मूळ गाव असल्यामुळे आणि कुटुंबाची अध्यात्माशी घट्ट नाळ जोडलेली असल्यामुळे त्यांच्या घराण्यात भक्ती, कीर्तन आणि संगीताची समृद्ध परंपरा रूढ होती.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील मोडलिंब येथे शिक्षक म्हणून कार्यास सुरुवात केली. मोडलिंब हे गाव तमाशा आणि संगीतबारीसाठी प्रसिद्ध असल्याने तेथील विविध कलाकेंद्रांमध्ये जाऊन ते आवर्जून लावण्या ऐकत असत. या लावण्यांचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला आणि त्यांच्या अंगी दडलेला कलावंत जागृत झाला. पुढे त्यांनी अनेक लावण्या लिहिल्या, त्यांना चाली दिल्या आणि स्वतःही त्या सादर केल्या. त्यामुळे त्यांची लावणी क्षेत्रातील श्रेष्ठ रचनाकार म्हणून ख्याती झाली. लावणी क्षेत्रात त्यांना प्रेमाने आणि आदराने ‘माऊली’ या नावाने संबोधले जात असे. त्यांच्या आजोबांनी त्यांना पारंपरिक पद्धतीने लावणी गायनाचे शिक्षण दिले. कठोर शिस्त आणि नियमित रियाज यांमुळे त्यांच्या गायनात सुरेलपणा, नजाकत आणि रंगत निर्माण झाली होती. संस्कृत विषयाचे शिक्षक आणि रुक्मिणी मंदिराचे पिढीजात पुजारी असूनही त्यांनी लावणीच्या सादरीकरणात नखरेलपणा आणि भावसंपन्नता प्रभावीपणे साकारली. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व रसिकांना विशेष आकर्षक वाटत असे. लोकसंगीत, लावणी आणि तमाशा यांविषयी त्यांना विशेष आकर्षण होते.
ज्ञानोबा उत्पात हे बहुआयामी कलावंत होते. पंढरपूरातील त्यांच्या उत्पात घराण्यात सुमारे दीडशे वर्षांची लावणी गायनाची परंपरा अस्तित्वात होती. उच्च शिक्षणामुळे त्यांचा अभ्यास व्यापक होता. त्यांनी जुन्या लावण्यांचा मोठा संग्रह जतन केला होता. संगीतबारीतील कार्यक्रमांनंतर ते कलावंतांना भेटून त्यांना मार्गदर्शन करीत असत. अनेक लोकनाट्य कलाकार आणि नर्तिकांना त्यांनी पारंपरिक लावणीची अदाकारी शिकवून घडविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकारांना विविध लावणी महोत्सवांमध्ये पारितोषिके प्राप्त झाली.ज्ञानोबा उत्पात यांनी सुमारे चाळीस वर्षे लावणीकलेची सेवा केली. तमाशातील कलावंतांनी शाहिरांकडून नवीन लावण्या लिहून घेऊन त्या रंगमंचावर सादर करण्याची परंपरा शाहीर पठ्ठे बापूराव यांच्या काळानंतर लोप पावत गेली होती; मात्र ज्ञानोबा उत्पात यांनी ही परंपरा अखेरपर्यंत जपली. त्यांनी रचलेल्या अनेक लावण्या तमाशा फड आणि संगीतबारीमध्ये लोकप्रिय ठरल्या. त्यांच्या लावण्यांमध्ये पारंपरिकतेबरोबरच आधुनिकतेचा समन्वय आढळतो. शाहीर पठ्ठे बापूराव, शाहीर राम जोशी, शाहीर होनाजी बाळा आणि शाहीर सगनभाऊ यांच्या काव्यपरंपरेचा प्रभाव त्यांच्या लावण्यांवर स्पष्टपणे दिसून येतो. त्यांचा हसरा, दिलखुलास आणि पारदर्शक स्वभावही तितकाच लोकप्रिय होता.
ज्ञानोबा उत्पात यांनी कोणाकडेही औपचारिक गायनशिक्षण घेतले नव्हते. याविषयी ते सांगत असत की, त्यांनी सुमारे तीस वर्षे पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव नियमितपणे ऐकला आणि त्यातूनच संगीताचे आकलन विकसित केले. पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, निर्मला देवी, बेगम अख्तर, वसंतराव देशपांडे, गंगूबाई हनगळ आणि शोभा गुर्टू यांच्या गायनातून त्यांनी प्रेरणा घेतली. त्यामुळे त्यांच्या गायनात मुक्तपणा, सहजता आणि भावपूर्णता यांचे अनोखे मिश्रण दिसून येत असे. लावणी सादर करताना आवाजातील चढ-उतार, सुरांचा नखरा आणि भावाविष्कार यांचा ते प्रभावी वापर करीत. त्यांच्या सादरीकरणात ताल-लय यांचे अचूक भान आणि अभिनयाची भावगर्भता दिसून येत असे. त्यांच्या हजरजबाबीपणा, विनोदबुद्धी आणि मिश्कील स्वभावामुळे त्यांची मैफिल अधिक रंगतदार होत असे. त्यांनी रचलेल्या आणि लोकप्रिय झालेल्या लावण्यांमध्ये ‘चला जेजुरीला जाऊ…’, ‘माडीवरती उभी राहिली, वाट पाहिली काल, वाटलं होतं तुम्ही याल…’, ‘नुसतं हसून चालायचं नाही, राया मी तुमच्याशी बोलायची नाही…’ तसेच ‘तुमच्या आवडीचा शालू नेसले, चोळी किणखापी लाल…’, या लावण्यांचा विशेष उल्लेख करावा लागतो. त्यांच्या लावण्यांमध्ये नृत्य, अभिनय आणि संगीत यांचा प्रभावी संगम आढळतो.
वयोमानाच्या उत्तरार्धातही त्यांच्या गायनातील ताकद, भावसंपन्नता आणि नखरेलपणा कायम राहिला. जुन्या हिंदी चित्रपटगीतांचे सादरीकरण, तसेच दादरा आणि ठुमरी गायनातही ते पारंगत होते. लोकसंगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. तसेच पुणे महानगरपालिकेचा पठ्ठे बापूराव पुरस्कार आणि दलित साहित्य अकादमीचा राम जोशी जतन पुरस्कार यांनी त्यांचा गौरव करण्यात आला. कॅलिफोर्निया विद्यापीठाने त्यांच्या जुन्या लावण्यांच्या ध्वनिमुद्रिकांचा संग्रह करून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित केले. ते नेहमी म्हणत असत, “शाहिरांच्या भूमिकेशी मी प्रामाणिक आहे; शाहीर म्हणूनच मरण्यात मला आनंद आहे.” आयुष्यभर लावणीकलेशी निष्ठा राखणाऱ्या या प्रतिभावंत कलावंताने आपल्या कलात्मक आणि वैयक्तिक जीवनातील प्रामाणिकता अखेरपर्यंत जपली.
संदर्भ : क्षेत्रसंशोधन
समीक्षण : जगतानंद भटकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
