स्वरूप आणि गृहीते : प्रस्तावना : सामरिकशास्त्राच्या अभ्यासाचा रोख हा प्रामुख्याने लष्करी शक्तीच्या वापरावर असतो. मात्र सामरिकशास्त्राची व्याप्ती ही लष्करी युद्धापुरती मर्यादित नाही. प्रशियन जनरल व युद्धशास्त्रज्ञ कार्ल फोन क्लाउझेव्हिट्स याने सामरिक नीतीची व्याख्या करताना राजकीय ध्येयांच्याकडे लक्ष केंद्रित केले होते. ब्रिटिश सेनानी व युद्धशास्त्रज्ञ लिडेल हार्ट याने देखील सामरिक नीतीची व्याख्या करताना लष्कराचा वापर राष्ट्रांच्या राजकीय धोरणांच्या पूर्तीसाठी करण्यावर भर दिलेला दिसून येतो. लष्करी बळाची उपयुक्तता राजकीय ध्येयांशी जोडणे सामरिकशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तसे करण्याने दोन गोष्टी साध्य होतात. एकतर सामरिक नीतीची व्याप्ती ही केवळ युद्धकालीन राहात नाही, तर शांततेच्या काळासाठीदेखील ती उपयोगी ठरू शकते आणि दुसरे, असे करण्याने राजकारणाला युद्धकारणाच्या वर बसविता येते. लष्करी बळाचा वापर हा विनाकारण आणि पाशवी नसावा किंवा एखाद्या लष्करी नेत्याच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेवर अवलंबून नसावा. युद्ध जर दिशाहीन होऊ द्यावयाचे नसेल, त्याच्या वापराला जर उपयुक्तता आणायची असेल, तर त्याच्यासंबंधीचे निर्णय हे राजकीय पातळीवर घेणे अपरिहार्य आहे. सामरिक नीतीचे तीन स्तर असतात. पहिला, अत्युच्च रणनीती (Grand Strategy); दुसरा, सैनिकी रणनीती (Operational Strategy) आणि तिसरा, डावपेची कारवाया (Tactics). अत्युच्च रणनीती ही केवळ राजकीय (शासकीय) नेतृत्वाच्या अधिक्षेत्रात येते. सैनिकी रणनीती आणि डावपेची कारवाया या तिन्ही सैन्यदलांच्या कार्यक्षेत्रात येतात.
अर्थात, राजकीय पातळीचे वर्चस्व मान्य करताना राजकीय आणि लष्करी क्षेत्र विभिन्न ठेवण्याची आवश्यकता नाही. या दोन्ही घटकांनी एकत्रित कार्य करण्याची अपेक्षा आहे. सामरिक सिद्धांताचे कार्य लष्करी सामर्थ्याचे राजकीय धोरणांत रूपांतर करणे हे आहे. अमेरिकन मुत्सद्दी हेन्री किसिंजर याने सामरिकशास्त्राच्या व्याप्तीबद्दल लिहिताना राष्ट्रीय धोरणातील वेगवेगळ्या घटकांचा उल्लेख केला आहे. हे घटक राजकीय, आर्थिक, लष्करी, तांत्रिक, तकनिकी, सामाजिक इत्यादी असू शकतात. राष्ट्रीय पातळीवर धोरण आखताना ह्या सर्व गोष्टी डोळ्यांसमोर ठेवाव्या लागतात. सामरिक सिद्धांत हा केवळ लष्करी घटकांवर बांधता येत नाही.
सामरिकशास्त्राची मूलतत्त्वे आणि घडण : सामरिकशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा असला, तरी केवळ लढाया, युद्ध, डावपेच इत्यादींवर लक्ष केंद्रित करून चालत नाही. सामरिकशास्त्राची मूलतत्त्वे जरी चाणक्य, सुंत्सु यांनी घालून दिली असली, तरी व्यापक पातळीवर अभ्यास हा दुसऱ्या महायुद्धानंतरच सुरू झालेला दिसून येतो. आज सामरिकशास्त्राबाबतचे विचार क्लाउझेव्हिट्स किंवा इटालियन जनरल डूहे (Douhct) यांच्या पारंपरिक पद्धतीच्या पुढे गेलेले दिसून येतात. सामरिकशास्त्रातील उत्क्रांती ही ह्या सिद्धांन्तांना बदलत्या कालखंडानुरूप घडवीत आहे (असते). आज या सिद्धान्तांमध्ये काही निश्चित वैशिष्ट्ये जाणवतात.
सामरिक सिद्धान्त हे युद्धाची कार्यक्षमता किंवा त्याची परिणामकता बघत नाहीत. प्राचीन काळात तसेच नेपोलियनपासून हिटलरच्या कालखंडापर्यंत सामरिक सिद्धान्त हे युद्धावर लक्ष केंद्रित करीत होते. क्लाउझेव्हिट्सदेखील लढायांचा वापर युद्धाच्या ध्येयाकरिता कसा करता येईल, यावर दृष्टी ठेवून होता. सामरिक सिद्धान्त त्या अर्थाने रणनीतीपुरते मर्यादित होते. आज ‘युद्ध हे राष्ट्रीय धोरण साध्य करण्याचे एक साधन आहे ’, या तत्त्वाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज भासते. युद्धाची धमकी, प्ररोधन (Deterrence), संकटाचे व्यवस्थापन (Crisis Management) ह्या संकल्पना नंतरच्या काळात पुढे आलेल्या दिसतात.
सामरिक सिद्धान्तांच्या संदर्भातील दुसरा बदल हा त्या क्षेत्रातील अभ्यासकांच्या संदर्भातील आहे. पारंपरिक सामरिकशास्त्रातील विचारवंत हे लष्करी अधिकारी किंवा लष्कराशी संबंध असलेले विचारवंत होते. लिडेल हार्ट, फुल्लर किंवा माओ-त्से-तुंग हे सर्व लढवय्ये होते. आज ह्या क्षेत्रामध्ये नागरी विचारवंतांनी प्रवेश केलेला दिसून येतो. त्यामुळे सामरिकशास्त्राची व्यापकता वाढली आणि त्यात शास्त्र, तंत्रज्ञान, राजनय, आर्थिक घटक दिसून येतात. उदा., हेर्मान कान हे भौतिकशास्त्रज्ञ आहेत, थॉमस शेलिंग हे अर्थतज्ज्ञ आहेत, ॲल्बर्ट व्हॉलस्टेटर हे गणितज्ज्ञ आहेत तर हेन्री किसिंजर हे इतिहासकार आहेत.
सामरिकशास्त्राचे तिसरे वैशिष्ट्य हे त्याच्या नवीन स्वरूपाचे आहे. हा विषय आज अमूर्त (Abstract) स्वरूपात हाताळला जातो, तसेच त्यात तर्काचा वापर करून अनुमान बांधले जाते. आण्विक रणनीतीसंदर्भात त्या गोष्टी विशेषेकरून जाणवतात. तंत्रज्ञानात जे झपाट्याने बदल झाले, जागतिक राजकारणात बदल झाले, त्या बदलांच्या संदर्भात सिद्धान्त मांडताना अनुमान मांडणे अपरिहार्य होते. ती अनुमाने तर्कशुद्ध असू शकतात; पण ती निश्चित असतील याची खात्री देता येत नाही. त्याच बरोबरीने त्या सिद्धान्तांचा तांत्रिक दर्जा हा उत्कृष्ट झाला आहे असे समजण्यास हरकत नाही. शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण करण्याच्या पद्धतीचा वापर इथे केलेला दिसून येतो.
सारांश : आजच्या युगात राष्ट्र-राज्यांना जागतिक स्तरावर चढाओढीत तग धरून राहण्यासाठी इतर राष्ट्र-राज्यांबरोबर संबंधांची आखणी करताना राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच सामरिक नीती आणि तिचा वापर हे सर्व लक्षात घेणे जरूरीचे झाले आहे. त्यामुळे सामरिकशास्त्राची व्यापकता वाढली आहे. राजकीय किंवा आर्थिक दबाव, बळाचा वापर करण्याची धमकी इत्यादी सर्व विषय सामरिकशास्त्राच्या अखत्यारित सामील केले गेले आहेत.
संदर्भ :
- Baylis, John; Booth, Ken; Garnett, John; Williams, Fill, Contemporary Strategy : Theories and Concepts, vols. 1 and 2, London, 1987.
- Garnett, John, Theories of Peace and Security : A Reader in Contemporary Strategy Thought, Bristol, 1970.
- Paret, Peter, Makers of Modern Strategy : from Machiavelli to the Nuclear Age, Oxford, 1986.
- परांजपे, श्रीकांत, सामरिकशास्त्र, पुणे, १९९४.
समीक्षक – शशिकांत पित्रे