लोकसाहित्याचे अंत:प्रवाह हा डॉ. प्रभाकर मांडे यांचा ग्रंथ लोकजीवनाच्या अंत:प्रवाहांची पाहणी करणारा ग्रंथ आहे. लोकसाहित्याची निर्मिती लोकमानसातून होते. हे लोकमानस कसे आहे, कशाप्रकारची निर्मिती करणारे आहे याचा विचार या ग्रंथात केलेला आहे.  लोककथा, लोकगीते इ. चे संकलन या ग्रंथाच्या प्रकाशनापूर्वी मोठ्या प्रमाणावर झालेले असले तरी या साहित्याचा मूळ आधार असलेले लोकमानस मात्र अभ्यासविषय झालेले नव्हते. आंतरविद्याशाखीय पद्धतीने, विशिष्ठ एकांतिक भूमिका न घेता डॉ. मांडे यांनी ग्रंथविषयाचा विचार केला आहे. 

डॉ. मांडे हे १९५० पासूनच लोकसंस्कृतिक परंपरेचा अभ्यास करीत आहेत. लोकगीते आणि लोककथांच्या संकलनापासून लोकविद्येच्या अनेक अंगोपांगांचा अभ्यास त्यांनी प्रयत्नपूर्वक आणि साक्षेपाने केला आहे. मराठी-लोकसंस्कृतीच्या अग्रणी अभ्यासांपैकी ते एक आहेत. लोकसाहित्याचे केवळ संकलन, वर्गीकरण करणे आवश्यक नसून त्याचे समाजशास्त्रीय अध्ययन आवश्यक आहे अशा भूमिकेने लाज ग्रंथाचे लेखन त्यांनी केले आहे. त्यामुळे इतर वर्गीकृत अथवा संकलित लोकसाहित्यापेक्षा अधिक सखोल आणि अधिक व्यापक अशी अध्यनदृष्टी लोकसाहित्याच्या अभ्यासाला त्यांनी या ग्रंथाद्वारे प्राप्त करून दिली आहे. लोकसाहित्य हि समूहाची निर्मिती असते. त्यामुळे लोकसाहित्याचा विचार केवळ साहित्य म्हणून करणे योग्य नाही. केवळ मनोरंजन किंवा भावनिक-बौद्धिक आनंद यापेक्षा लोकसाहित्यामागच्या प्रेरणा वेगळ्या आहेत आणि त्या लोकजीवनाशी निगडित आहेत. हे लक्षात घेऊन हा ग्रंथ सिद्ध झालेला आहे.

मराठी लोकगीते, लोककथा, लोकनृत्ये आणि विधिनाट्ये अशा चार प्रमुख लोककला प्रकारांचे स्वरूप स्पष्ट करणारी प्रकरणे या ग्रंथात प्रारंभी योजलेली आहेत. त्याचबरोबर ‘लोकसाहित्य आणि लोकमानस’, ‘लोकरुढी आणि लोकविश्वास’, ‘मंत्रात्मक यातुविद्या’, ‘कृषी-जीवनाशी संबंधित यातुविद्या’, ‘बाली आणि पापवाहक’ तसेच ‘प्रतीकात्मक मृत्यू’ इ. प्रकारची लोकमानवर प्रभाव टाकणाऱ्या महत्त्वाच्या कल्पना-विश्वास-विधींची चर्चा त्यांनी आणखी आठ प्रकरणांमधून केली आहे. समारोपाच्या प्रकरणासह पंधरा प्रकरणांत विभागणी करून त्यांनी लोकसाहित्याचा लोकमानसाशी आणि लोकमनावर प्रभाव असणाऱ्या विधिविधानाशी असलेला संबंध स्पष्ट केला आहे. या ग्रंथांचा मुख्य विषय लोकसाहित्य आणि लोकमान यांचा संबंध कसा आहे आणि लोकमन तसेच लोकजीवनच लोकसाहित्यातून कसे व्यक्त होते हे स्पष्ट करणे हा आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासक्षेत्रात या ग्रंथाचे महत्त्व आहे ते यासाठी कि लोकसाहित्याचा विचार अभिजात साहित्यदृष्टीने न करता स्वतंत्र अभ्यासदृष्टीने केला पाहिजे, याची आवश्यकता ग्रंथकर्त्याने उत्तमप्रकारे स्पष्ट केली आहे.

अभिजात साहित्याबाबत ज्या रूढ अभ्यासपद्धतींचा अवलंब केला  पद्धती लोकसाहित्याबाबत उपयोगी पडत नाहीत. मौखिकता आणि सामूहिक अभिव्यक्ती हे तर या साहित्याचे विशेष आहेतच, पण मुख्यतः लोकजीवनात लोकसाहित्याचे अंतःप्रवाह मिसळलेले आहेत याचे भान मराठीत लोकसंस्कृतिक अभ्यासाला प्रथम आणून देणारा हा ग्रंथ आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा