गावगाड्याबाहेर हा प्रभाकर मांडे यांचा ग्रंथ महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्त जातीजमातींवरील महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय दस्तऐवज आहे. भारतातील ग्रामसंस्था,जिला ‘गावगाडा’ म्हणतात,तिच्या व्यवस्थेत समाविष्ट न झालेल्या अनेक लहान लहान जनसमूहांचे जीवन,प्रथा-परंपरा,बोली,न्याय,वैद्यक,उपजीविका आणि समूहांतर्गत व्यवस्था यांची अधिकृत, तपशीलवार नोंद घेणारा हा मराठीतला पहिलाच ग्रंथ आहे. ग्रंथलेखक प्रभाकर भानुदास मांडे हे लोकसाहित्य आणि संस्कृतीचे जेष्ठ अभ्यासक आहेत. लोकसंस्कृतीची विविध अंगांचा शास्त्रीय बैठकीवर आधारलेला अभ्यास त्यांनी पंचवीसहून अधिक ग्रंथातून मांडला आहे.
गावगाड्यातील समाज म्हणजे पूर्वीचे शेतकरी आणि कारू-नारू किंवा बलुतेदार यांनी बनलेला समाज आणि या समाजात मिसळू न शकलेला, त्यात प्रवेश न मिळालेला भटक्या-विमुक्त जातींनी बनलेला गावगाड्याबाहेरचा समाज यांमधले अंतर आणि त्या अंतराची करणे जाणून घेणे तसेच भटक्या-विमुक्तांच्या संबंधातली सर्वसाधारण समाजाचे व अभ्यासकांचे गैरसमज दूर करून या समाजाची स्थितीगती नेमकेपणाने समोर आणणे हे या ग्रंथाचे प्रमुख उद्दिष्ठ आहे. ग्रंथाचा मुख्य विषय पारंपरिक ग्रामव्यवस्थेबाहेरच्या जातीजमातींचा तपशीलवार परिचय हा आहे. एकूण चोवीस प्रकरणांमध्ये मांडे यांनी ग्रंथाची विभागणी केली आहे. त्यामध्ये मांग, मांगगारोडी, डक्कलवार, रायरंद, गोपाळ, कोल्हाटी, मेढंगी, वैदू, पारधी, वडार, शिकलगार, कंजारभाट, स्मशानजोगी, तिरमाळी, राजपूत भामटा ‘डागूर’, जोगी-गोसावी आणि मागत्ये अशा सतरा भटक्या-विमुक्त जाती-जमातींचा प्रामुख्याने विचार केला जातो. १९८३ साली हा ग्रंथ प्रथम प्रकाशित झाला. लोकसाहित्य संकलन-वर्गीकरणाचे प्रयन्त महाराष्ट्रात त्याआधी ६०-७० वर्षे सुरु होते. त्रिं. ना.अत्रे यांचा ‘गावगाडा’ नावाचा महत्त्वपूर्ण ग्रंथ १९ साली प्रसिद्ध झाला होता. मात्र गावगाड्याबाहेरच्या समाजाची जीवनशैली, जातपंचायती व कायदे, प्रथा-समजुती, दैवते व बोली यांचा सांगोपांग अभ्यास उपलब्ध नव्हता. एकूण मराठी समाजाच्या भटक्या-विमुक्त घटकांच्या अस्तित्वाची आणि जीवनाची प्रथमच सविस्तर माहिती देणारा मांडे यांचा हा ग्रंथ लोकसंस्कृतीच्या क्षेत्रात तर महत्त्वाचा आहेच पण समाजशास्त्राच्या आणि साहित्याच्या अभ्यासही उपयुक्त ठरणार आहे. या ग्रंथाच्या लेखनाला तीन तपे झाली. या काळात ग्रंथविषय झालेल्या जनसमूहांचे जीवन झपाट्याने बदलेले. स्वातंत्र्यानंतर अंमलात आलेली विविध पातळ्यांवर विविध उद्देशांची शासकीय धोरणे, जशी या परिवर्तनाला कारण झाली तशीच बदलती समाजव्यस्था, बदलती अर्थव्यस्था व जागतिकीकरण यांचेही परिणाम मोठ्या प्रमाणावर या परिवर्तनाला हातभार लावत गेले. आता पुन्हा एकदा नव्याने या जनसमूहांचा अभ्यास नव्या संदर्भात करणे आवश्यक आहे. मात्र या समूहांचा इतिहास-परंपरा यांची विस्तृत नोंद प्रथम करणारा लोकसंस्कृतीच्या क्षेत्रातला मराठी ग्रंथ म्हणून ‘गावगाड्याबाहेर’या ग्रंथाचे महत्त्व मोठे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा