खंडनिभ. कोणत्याही घटकास तात्पुरता मिळणारा अतिरिक्त नफा म्हणजे त्याचा आभास खंड होय. तो खंडासारखा वाटतो; परंतु आर्थिक स्वरूपाचा नसतो. आभास खंडाला खंडसदृश उत्पन्न, तात्पुरता खंड, प्रतिरूप खंड, सम उत्पन्न इत्यादी नावांनीही ओळखले जाते. आभासी खंडाची संकल्पना प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ व केंब्रिज संप्रदायाचे संस्थापक ॲल्फ्रेड मार्शल (Alfred Marshall) यांनी मांडली.
खंडाची संकल्पना सनातनी अर्थशास्त्रज्ञांनी फक्त भूमी या घटकापुरतीच मर्यादित ठेवली होती; मात्र नवसनातनवाद्यांनी ती सर्वच उत्पादनघटकांना लागू करता येते, हे स्पष्ट केले. मार्शल यांनी आभास खंडाची संकल्पना स्पष्ट करताना म्हटले की, अल्प काळात मानवनिर्मित उत्पादनघटकांचा पुरवठा स्थिर राहतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रचलित मोबदल्यापेक्षा जास्त मिळणाऱ्या मोबदल्यासाठी उपभोगात आणले जाते. अल्पकाळात काही कारणांमुळे या घटकांच्या मागणीत अनपेक्षित वाढ झाल्यास त्यांचा पुरवठा तात्काळ वाढविणे शक्य न झाल्यामुळे त्या घटकांना अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होईल. अल्पकाळात मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नाचे स्वरूप खंडासारखे असते, म्हणून मार्शल त्यास ‘आभासी अथवा प्रतिरूप खंड’ म्हणतात. दीर्घकाळात या घटकांचा पुरवठा वाढविणे शक्य असते. तसे झाले म्हणजे हे अतिरिक्त उत्पन्न नाहीसे होते व उत्पादनघटकांना त्यांचे सर्वसामान्य उत्पन्न मिळू लागते. भूमीचा पुरवठा नेहमीच स्थिर असल्यामुळे तिला अल्पकाळात व दीर्घकाळात खंड मिळत राहतो. मार्शल यांची प्रतिरूप खंडाची कल्पना मानवनिर्मित उत्पादनघटकांशीच निगडित आहे.
जमिनीप्रमाणेच इतर उत्पादन घटक विशिष्ट परिस्थितीत दुर्मीळ झाले की, त्यांना खंडसदृश उत्पन्न प्राप्त होते. कोणताही घटक मागणीच्या मानाने अपुरा पडू लागला की, त्यास तात्पुरते जादा उत्पन्न मिळू लागते. दीर्घकाळाने त्या घटकाचा पुरवठा वाढला की, वाढलेली मागणी पूर्ण होऊ शकते आणि तात्पुरता मिळालेला जादा मोबदला मिळेनासा होतो. अल्पकाळासाठी मिळणारा हा मोबदल्याचा वाढावा म्हणजे, जणूकाही खंडच होय. जमीन व अन्य उत्पादक घटक यांमधील एक फरक म्हणजे निसर्गदत्त जमिनीची दुर्मिळता अल्पकालीनच नव्हे, तर दीर्घकालीनही असते. अन्य घटक मात्र केवळ अल्पकाळापुरतेच दुर्मीळ असतात. दीर्घकाळात त्यांचा पुरवठा सहज वाढविता येतो. दीर्घकाळात अन्य घटकांच्या उत्पन्नातील खंडसदृश भाग शिल्लक राहत नाही; तो नाहीसा होतो. म्हणूनच त्याला ‘खंड’ असे न म्हणता ‘खंडसदृश उत्पन्न’ असे म्हणतात.
अल्पकाळात काही घटक स्थिर व काही घटक बदलत असतात. अचानक उद्भवणारी मागणी पूर्ण करण्यासाठी बदलत्या घटकांचा वापर वाढवून पुरवठा वाढवावा लागतो. अल्पकाळात कुशल श्रमिकांची मागणी वाढल्यास, त्यांच्या पुरवठ्यात वाढ करणे शक्य नसते. अशा वेळी त्यांना ५०० रु.ऐवजी ७०० रु. मोबदला अदा करून त्यांच्याकडून जादा वेळ काम करून घेतले जाते. दीर्घकाळात मात्र श्रमिकांच्या पुरवठ्यात वाढ होऊन त्यांना पूर्वीएवढाच म्हणजेच ५०० रु. मोबदला अदा केला जातो. त्यामुळे २०० रु. अतिरिक्त मोबदला नाहीसा होतो. लांब पल्ल्याचे बसचालक, रेल्वे एक्सप्रेसचे चालक, वैमानिक इत्यादींना त्यांच्या नियमित वेळेपेक्षा जादा सेवा दिल्यामुळे आभासी मोबदला प्राप्त होत असतो.
देशाची विकास धोरणे राबवीत असताना तसेच औद्योगिक विकासाच्या योजना अमलात आणत असताना त्यांसाठी लागणारा श्रमिक व इतर घटकांचा पुरवठा शासन बाहेरून घेत असते. उदा., स्मार्ट सिटी योजना, इंडस्ट्रियल कॉरिडोर, सेझ इत्यादी. त्यामुळे अशा ठिकाणी निवासासाठी अचानकपणे घरांची मागणी वाढते. अल्पकाळात घरांच्या मागणीनुसार नवीन बांधकामे करता येत नाहीत. परिणामी उपलब्ध असलेल्या घरांच्या भाड्यात वाढ होईल. भाड्यात परिस्थितीनुरूप झालेली अतिरिक्त भाडेवाढ म्हणजे, आभास खंड होय. आकृतीच्या साह्याने ही संकल्पना पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येते.
आकृती
उभ्या अय अक्षावर घरभाडे दर आणि अक्ष अक्षावर घरांचा मागणी-पुरवठा दर्शवितो. घरांचा पुरवठावक्र रस आडव्या अक्ष अक्षाला समांतर आहे. पुरवठावक्रास मम मागणीवक्र क बिंदूत छेदतो. तेथे घरभाडे दर आणि घरांचा मागणी-पुरवठा समतोल साधला जातो. अर एवढ्या दराला अध एवढा मागणी-पुरवठा होतो. अल्पकाळात घरांचा पुरवठा स्थिर असल्याने मागणीत वाढ झाल्यास मागणीवक्र उजवीकडे स्थानांतरित होऊन क१ बिंदूत समतोल निर्माण होतो. तेव्हा भाडेदर अरवरून रर१ पर्यंत वाढतो. अर्थात रर१ एवढा आभास खंड निर्माण होतो. दीर्घकाळात घरांच्या पुरवठ्यात वाढ झाली की, अधवरून अध१ पर्यंत मागणी-पुरवठ्यातील समतोल व बिंदूत होतो. या परिस्थितीत भाडेदर र१वरून र पर्यंत कमी अर्थात पूर्वीएवढाच – अर एवढाच – होतो. दीर्घकाळात अतिरिक्त दरवाढ नाहीशी झाल्याने आभास खंडही नाहीसा होतो.
आभास खंडाची संकल्पना अल्पकाळासाठी अभ्यासली जाते; कारण अल्पकाळात काही घटक स्थिर व काही घटक बदलत असल्यामुळे आभास खंड निर्माण होतो. दीर्घकाळात सर्वच घटक बदलत असल्याने आभास खंड उद्भवत नाही.
संदर्भ :
- चव्हाण, एन. एल., प्रगत सूक्ष्मलक्ष्मी अर्थशास्त्र, जळगाव, २०१५.
- देसाई, स. श्री. मु.; जोशी, शं. श.; भालेराव, निर्मल, आर्थिक विश्लेषण भाग – १, पुणे, १९९०.
- बरला, सी. एस., अर्थशास्त्र शब्दकोश, जयपूर, २००४.
- रारावीकर, यशवंत; गोडबोले, वि. ज.; बोर्जेस, जॉन्सन, डायमंड अर्थशास्त्रकोश, पुणे, २००८.
- Joginder, Singh, Dictionary of Economics, New Delhi, 2006.
- Nagpal, C. S., Dictionary of Economics, New Delhi, 2004.
समीक्षक – अनील पडोशी
सर
नमस्कार
संकल्पना अतिशय अभ्यासपूर्ण असून विद्यार्थी व शिक्षकांना फार उपयोगी आहे
धन्यवाद सर
Nice information in clear and lucid language