अंतर्गत सजावटीमध्ये मानव निर्मित किंवा निसर्गतः आढळणाऱ्या सभोवतालच्या जागेचे नियोजन व सजावट यांचा समावेश होतो. याचा अधिक संबंध वास्तूकला व त्याच्याशी संबंधित विज्ञान आणि थेट संबंध पर्यावरणाशी येतो.  सध्याच्या काळात प्रत्येकालाच आपलं घर सुंदर असावा असं वाटत असतं आणि या रचनेसाठी ज्या व्यक्तीची गरज भासते, त्यास ‘अंतर्गत रचनाकार'(Interior Decorator) असे म्हणतात.वास्तू शिल्पकार वास्तूची रचना करतो. गरजेयोग्य वास्तू आखणी करणे आणि त्याचे निवडक भाग पाडणे हे त्याचे काम. त्यामुळे ती वास्तू कुठल्या गरजेसाठी बांधली जाते आहे हे समजून त्याची मांडणी करणे हे वास्तू शिल्पकार ठरवतात.

ह्या वास्तू बांधून झाल्यावर त्याचा उपयोग कसा होणार हे समजून त्यास उपयुक्त अशी रचना, रंग संगती, आतील सुविधा, सामग्री, दिव्यांची रचना, आकार, मोजमाप, विविध वापरले जाणारे बांधकामाचे सामान आणि तत्सम सजावटीचे सामान हे सर्व आखून नियोजित मांडणी करणे हे अंतर्गत रचनाकाराचे काम.त्या वास्तूचा उपयोग घर, दुकान, कार्यालय, उपहारगृह, विश्रांती गृह इत्यादी अनेक प्रकारे होऊ शकतो.अंतर्गत रचनाकाराची आपली रचना कागदावर अचूक पद्धतीने येऊ देण्याची पद्धत आणि ती समोरच्याला पटवुन देण्याची वृत्ती ही अशीच खूप महत्त्वाची आहे.

अंतर्गत सजावट करताना लक्षात घ्यावयाच्या बाबीः

– सजावटीचे नियम
– रंग आणि त्याचे नियम
– बांधकामाचे सामान
– वास्तू शिल्पकरितेचा इतिहास
– अंतर्गतसजावटीचे आराखडे कसे आखावेत
* दिवाणखाना
*शयनगृह
*स्वयंपाकघर
*लहानग्यांची खोली
*प्रसाधन गृह
*कार्यालय
*दुकान
*उपहार गृह
*सिनेमाचे सेट
– मनुष्य देहाचे मोज माप आणि त्या नुसार सुविधा सामग्रीचे आकार
– काही महत्वाच्या सुख सोयी आणि त्यांचे नियम
– बांधकामाचे आपणास उपयुक्त असे बारकावे

अंतर्गत सजावटीचे काही नियम असतात. सजावटी सोबतच सौंदर्यपूर्ण् घटकांचा त्यात अंतर्भाव केला जातो.  सजावटीची जागा, रंग-संगती आणि प्रकाश नियोजन हे सजावटीचे महत्वाचे घटक आहेत. या घटकांचा सजावटीमधे केलेला योग्य आणि प्रमाणात वापर हा दीर्घकालीन असतो. सर्वोत्तम अंतर्गत सजावट म्हणजे ज्यामध्ये वास्तू आणि साकारलेली सजावट यांच्यामध्ये फरक आढळून येत नाही आणि ज्यामध्ये केलेला कलाविष्कार देखील एकूण  वास्तूचाच अभिन्न अंग म्हणून समाविष्ट केला गेला असतो.

या कला आविष्काराचे विविध प्रकार असू शकतात. औपचारिक व अनौपचारिक या प्रकारांद्वारे त्याचे वर्गीकरण करता येते. तसेच विविध चिन्हांचा, प्रतीकांचा व विविध शैलींचा वापर करता येतो. ज्याप्रकारे सजावटीला सौंदर्याची जोड महत्वपूर्ण असते तसेच भौतिक घटकांचा विचार करणे आवश्यक असते. भौतिक घटकांमध्ये घराचे छप्पर, मजले, भिंती, दारे व खिडक्या, फर्निचर, प्रकाश, कापडांचा उपयोग, साहित्य-सामग्री इत्यादी आणि नैसर्गिक घटकांचा समावेश होतो.

मानव निर्मित वस्तू निसर्गात आढळणाऱ्या सौंदर्याशी बरोबरी करू शकत नाही. त्यामुळे अंतर्गत सजावटीमध्ये  नैसर्गिक घटकांचा म्हणजेच वनस्पती, वृक्ष, खडक आणि पाणी इत्यादींचा समावेश नेहमीच उपयुक्त मानला जातो.अंतर्गत रचनाकार अंतर्गत सजावटीच्या प्रक्रियेचे काही टप्पे ठरवून घेतो. त्यात प्रारंभिक टप्प्यात मुलाखत, जागेची पाहणी, इत्यादींचा समावेश होतो. त्यानंतर सजावटीच्या आरेखनाचे प्रात्यक्षिक, अंतिम सजावटीचे संपूर्ण माहितीसोबत आरेखन आणि नंतर बांधकाम किंवा प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते.

समीक्षक – श्रीपाद भालेराव

प्रतिक्रिया व्यक्त करा