रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा हा ग्रंथ मुख्यतः लोकदैवतांचे स्वरूप स्पष्ट करणारा ग्रंथ आहे. दैवतविज्ञानाची एक स्वतंत्र शाखा संस्कृतीच्या अभ्यासक्षेत्रात गेल्या पंचवीस-तीस वर्षांमध्ये विकसित झाली आहे. प्रस्तुत ग्रंथ त्याच शाखेतील आहे आणि महाराष्ट्रातील लोकदैवतांचे स्वरूप स्पष्ट करीत असतानाच भारताचा, विशेषतः दक्षिण भारताचा सांस्कृतिक संदर्भ उलगडणारा आहे. ढेरे हे मराठीतील प्राचीन साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक होते आणि लोकसंस्कृतीच्या अभ्यासाची बहुस्तरीय, बहुविद्याशाखीय साधने उजेडात आणणारे होते. त्या साधनांच्या आधारे लोकसंस्कृतीशी संबंधित अनेक सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक प्रश्नांचे उलगडे त्यांनी केले आणि समाजाच्या स्थिती-गतीवर होणारे संस्कृतीचे परिणामही स्पष्ट केले. ‘लोकदैवतांचे विश्व’ ह्या ग्रंथाची भूमिका लोकदैवतांच्या उदात्तीकरणाची नाही. अथवा या दैवतांना ग्रंथकाराने गौणही ठरविलेले नाही. लोकदैवतांचे स्वरूप कसे असते आणि ते तसे असण्याची कारणे कोणती हे लोक आणि अभिजन अशा दोन्ही परंपंरा दृष्टीसमोर ठेवून स्पष्ट करणे ही या ग्रंथकाराची भूमिका आहे. त्यामुळे ग्रंथाचा मुख्य विषय भारतातील काही प्रमुख दैवतांचे आजचे रूप आणि त्यांची उपासना यांच्यामधेच आढळणाऱ्या श्रद्धा-समजुती, प्रथा-परंपरा यांच्या आधारे या दैवतांचे मूळ स्वरूप शोधणे आणि लोकमनात त्या दैवतांविषयी कोणत्या धारणा होत्या, आहेत आणि त्या तशा का आहेत याचा उलगडा करणे, हा आहे.
ग्रंथात एकूण चौदा प्रकरणे आहेत आणि चार परिशिष्टे अखेरीला जोडलेली आहेत.गणपती, विठ्ठल, कृष्ण आणि महालक्ष्मी हि चारही दैवते जरी लोकदैवते नसली तरी त्यांच्या स्वरूपात, महात्म्यात आणि उपासनेतही लोकसंसांस्कृतिक धारणा कशा सामावलेल्या आहेत, याचा अधिक परिचय परिशिष्टांमधून ग्रंथकर्त्याने करून दिला आहे. मूळ चौदा प्रकरणांमधून गणपती, अलक्ष्मी किंवा जेष्ठा, मुरुग, मणिभद्र, यक्ष, नरसिंळ, कृष्ण, राधा, आदित्य राणूबाई आणि भूतमाता अशा काही दैवतांचा अभ्यास ग्रंथकर्त्याने केला आहे. याप्रकारे नागरजीवनात आणि देवतामंडळातही लोकसंस्कृतीचा प्रभाव कसा टिकून आहे हे स्पष्ट करणारा पहिलाच ग्रंथ म्हणून या ग्रंथाचे लोकसंस्कृतीच्या अभ्यासक्षेत्रात महत्त्व आहे. ढेरे हे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख दैवतांचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांचा ग्रंथ प्रामुख्याने डाँ महत्त्वाच्या गोष्टी समोर आणतो. एक म्हणजे लोकसंस्कृतीचे अध्ययन केवळ लोकसाहित्य आणि लोकांचे आचार (प्रथा-परंपरा) एवढ्याच साधनांनी करता येत नाही तर मराठीपूर्व साहित्यासह प्राकृत आणि संस्कृत अशी पूर्व परंपरा अभ्यासावी लागते. त्यांच्या विवेचनातून हे स्पष्ट झालेले दिसते. तसेच मराठी लोकसंस्कृती हि भारतीय लोकसंस्कृतीचा एक प्रादेशिक आविष्कार आहे हेही विसरता कामा नये. या दोन महत्त्वपूर्ण बाबी ध्यानात घेऊनच संस्कृतीचा विचार करावा लागतो. ढेरे यांच्या विचारांची हि मौलिक दिशा आहे. ढेरे यांनी लोकदैवतांच्या अभ्यासाचे महत्त्व तसेच त्याचे व्यापक स्वरूप या ग्रंथातून उलगडलेले आहे आणि लोकसंस्कृतीच्या अभ्याससाधनांचाही विस्तार घडविला आहे.