महाराष्ट्र गुजरात आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांतील आदिवासी जमातींची कुलदेवता. दरवर्षी महाशिवरात्रीला याहामोगीची जत्रा भरते. या तीनही राज्यांतील आदिवासी लाखोंच्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येतात. याहामोगीचे मंदिर गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील सागबारा तालुक्यात देवमोगरा या गावी आहे. याहामोगी गुजरात राज्यातील सागबारा संस्थानाचे राजे प्रतासिंहजी रामसिंहजी वसावा यांच्या घराण्याची कुलदेवता होय. त्यांचे पूर्वज मूळ सिद्धपूर पाटण येथून आले व त्यांनी सागबारा तालुक्यात रसवाडा येथे वसाहत केली. त्यांच्या घराण्यातील एका राजाच्या स्वप्नात एकदा याहामोगीने येऊन सांगितले की, मी या दगडाच्या खाली आहे. खोदकाम करून मला बाहेर काढा. वर्षातून एकदा माझी पूजा करा, माझी सेवा करा, तुमचे कल्याण होईल. स्वप्नात सांगितलेल्या ठिकाणी खोदल्यानंतर त्याठिकाणी देवीची सोन्याची मूर्ती आढळून आली. ती मूर्ती बाहेर काढून राजाने मातेच्या मूर्तीची विधीपूर्वक स्थापना केली. तेव्हापासून ती त्यांच्या घराण्याची कुलदेवता झाली. अशी आख्यायिका या परिसरात सर्वत्र प्रचलीत आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला सर्वप्रथम मातेची पूजा ते करतात. महाशिवरात्रीच्या अमावस्येला राजा पूजा करतात. ह्या पूजेचा खर्च ते स्वत: करतात. राजांची सध्याची ही चौदावी पिढी आहे. राजा प्रतापसिंहजी रामसिंहजी वसावा हे या घराण्यातले चौदावे राजा आहेत. त्यांच्या हस्तेच याहामोगीची पूजा केली जाते.

इ. स. 1983 साली याहामोगीची ट्रस्ट स्थापन करण्यात आली. संपूर्ण आदिवासी ट्रस्टा असलेले हे देवस्थान महाराष्ट्रातच नव्हे, तर गुजरात, मध्यप्रदेश या तीनही राज्यांत एकमेव असावे. आदिवासी बांधव सर्व गाव मिळून 10-15 बैलगाड्यांच्या जथ्याने याहामोगीला जातात, त्याला होब म्हणतात. या होब जत्रेत प्रवासाला लागणारे सर्वसाहित्य बरोबर घेतात. खाण्यापिण्याचा शिधा, अंथरुण-पांघरुण, देवीच्या पूजेसाठी नैवेद्याची टोपली त्याला हिजारी असे म्हणतात. या टोपलीत महूच्या दारुची बाटली, नारळ, साळ, कुंकू, अगरबत्ती, त्याचप्रमाणे ज्यांनी कोंबड्या-बकऱ्या देण्याचा  देवीला नवस केला असेल, तर त्यांनाही बरोबर घेतले जाते. ही हिजारी घरातून निघाल्यापासून याहामोगीजवळ जाईपर्यंत खाली ठेवत नाहीत. दु:ख दूर व्हावे व सुख मिळावे, यासाठी लोक देवीच्या नावाने नवस घेतात. जत्रेच्या वेळी नवस पूर्ण करण्यासाठी येतात. देवीला चांदीची कंठी, ओढणी, चांदीचे लहानमोठे दागिने अर्पण करतात. काही नवस करणारे लोक देवीला कोंबड्या-बकऱ्याचा बळी देतात. नवस करणारे लोक देवीच्या जत्रेच्या अगोदर सव्वा महिना व्रतस्थ राहतात. जत्रेच्या दिवशी उपवास धरतात. देवीचे दर्शन करून, नवस फेडून उपवास सोडतात.याहोमोगीच्या एका हातात दुधाचे भांडे म्हणजेच चरवी व दुसऱ्या हातात गायी गुरे बांधण्याचा दोर म्हणजेच कासरा आहे. आदिवासी पेहरावातील याहामोगी धान्याच्या कणगीत उभी आहे. देवीच्या दर्शनाहून परत येताना भाविक देवीच्या कणगीतील मूठभर धान्या आपल्याबरोबर आणतात, आणि आपल्या घरातील धान्याच्या कणगीत ठेवतात. त्यामुळे आपल्या घरात सुख, समृद्धी, संपन्नता येते, अशी लोकांची धारणा आहे. याहामोगीचा पुजारीही वंशपरंपरागत असतो. देवीची पूजा आदिवासी रीतिरिवाजाप्रमाणे होते.

महाशिवरात्रीला सागबारा संस्थानचे राजा व श्री. सर्वजनिक देवमोगरा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हे सर्व प्रथम देवीला आंघोळ घालून पूजा करतात. त्यानंतर इतर भाविक पूजा करतात. देवीला ज्या पवित्र नदीत आंघोळ घातली जाते, त्या नदीचे नाव गडका नदी आहे. महाशिवरात्रीच्या अमावस्येला देवीच्या मूर्तीला वाजत-गाजत राजा पांठाकडे नेले जाते. तेथे देवीला आंघोळ घातली जाते. देवीच्या मंदिरापासून 1 किमी. अंतरावर हे ठिकाण आहे. याठिकाणी राजा पांठा व गांडा ठाकूर यांच्या घोड्यावर स्वार झालेल्या लाकडी मूर्त्यादेखील आहेत. या ठिकाणाला मोगरमुखी असेही म्हटले जाते. राजा हे देखील आंघोळ घालीत असताना सशस्त्र गार्ड हे बंदुकीतून फायर करून सलामी देतात. पूर्वी संस्थानाचे राजांचे गार्ड सलामी देत. आता गुजरात शासनाचे पाच गडी फायरिंग करून याप्रसंगी सलामी देतात.याहामोगीची जत्रा महाशिवरात्रीला भरते,‍ आणि याच दिवशी येणारे वर्ष हे कसे असणार आहे, म्हणजे पाऊसपाणी, धनधान्य्‍ मुबलक प्रमाणात येणार, की त्यात कमतरता राहणार, हे पाहण्याची प्रथा आदिवासींमध्ये आहे, याहामोगी मंदिराच्या परिसरात राजा पांठा नावाने प्रसिद्ध असलेले पवित्र स्थळ आहे. तो परिसर नदीच्या किनाऱ्याचा आहे. तेथेच विधिवत पूजा करून देवीला आंघोळ घालतात. त्यानंतर उंचावर असलेलया एका पवित्र दगडावरून पुजारी बांबूचा भाला मारतो. त्यानंतर तेथून  पाणी बाहेर येते. ह्या पाण्याच्या प्रमाणावर येणाऱ्या वर्षाचे भवितव्य ठरते. भाला मारल्यावर निघालेले पाणी जास्त असेल, तर आगामी वर्षात काहीतरी कमतरता राहील, व कमी पाणी निघाले तर येणाऱ्या वर्षात पीकपाणी चांगले राहील, ते वर्ष सर्वांना सुखाचे आणि समृद्धीचे जाईल, अशी धारणा आहे. ज्या वर्षी पाणी कमी निघते, त्यावेळी अत्यंत आनंदाने आणि जल्लोषाने आदिवासी बांधव देवीला नवस करतात आणि पुढील वर्षी आठवणीने सहकुटुंब नवस फेडायला येतात. तसेच मदिराच्या बाहेर जवळच एक अतिप्राचीन वृक्ष असून, या वृक्षाला ज्या दिशेला पालवी फुटते, त्या बाजूच्या भागात मुबलक अन्न्धान्य पिकते, सुख-समृद्धी-संपन्न्ता नांदते, अशीही धारणा आहे.

संदर्भ :

  • गावित, माहेश्वरी, आदिवासी लोकपरंपरा, चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद.
  • राठवा ,चामुलाल, देहवाली साहित्य्‍, साहित्य्‍ अकादमी प्रकाशन,दिल्ली.

प्रतिक्रिया व्यक्त करा