भारतातील शक्तिपूजेचे एक लेंगिक प्रतीक मूलगामी संशोधनातून उलगडणारे हे मराठीतील महत्वाचे पुस्तक आहे. सर्व आधुनिक अभ्याससाधनांच्या मदतीने एका प्राचीन धर्मसंबंधी प्रथेचा आणि दैवताचा विशेष अभ्यास या ग्रंथात केलेला आहे. आदिवासी जमातीपासून ते अत्यंत सुसंस्कृत अशा सांजपर्यंत शक्तिपूजेचे स्वरूप कसे आहे याचे विवेचन या ग्रंथात केले आहे.डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे हे या ग्रंथाचे लेखक आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख दैवतांचा अभ्यास भारतीय करणारे ते प्रतिभावंत संशोधक गणले गेले आहेत. प्राचीन मराठी संस्कृती आणि साहित्य यांचा आंतरविद्याशाखीय अभ्यास हे त्यांच्या संशोधनाचे वैशिष्ट्य आहे; तसेच नगर संस्कृती आणि लोकसंस्कृती यांच्यातील अनुबंध शोधणे हेही त्यांच्या अध्यनक्षेत्राचा विशेष आहे. ‘लज्जागौरी’ हे त्यांचे पुस्तक केवळ मराठीचे नव्हे तर भारतीय आणि भारताबाहेरच्या मातृपूजक संस्कृतीशी संबंधित आहे. जगभर आढळणारे निर्मिती-विषयक कुतूहल आणि निर्मितीविषयक आदरभाव यांचे स्वरूप ‘लज्जागौरी’ या प्रतीकातून उलगडावे आणि निर्मितीमागच्या लोकधारणाचा शोध घ्यावा आणि धार्मिक क्षेत्रात जगभरच लेंगिकता कशा स्वरूपात स्वीकारली गेली याचा उलगडा करावा अशा भूमिकेने ढेरे यांनी ग्रंथ विषय उलगडलेला आहे. ‘लज्जागौरी’ या प्रतिकाचा उलगडा हाच ग्रंथाचा मुख्य विषय आहे. शिरोविहीन नग्न स्त्री म्हणजे ‘लज्जागौरी’. निर्मितीशी संबंधित तिच्या दोन मुख्य अवयवांची पूजा प्राचीन मानव शेकडो वर्षे करीत आला आहे. केवळ भारतातच नवे तर जगभरात ठिकठिकाणी अशा मूर्ती आढळल्या आहेत. भारतीय संधर्भात या मूर्तींची आणि त्यांच्या उपासनेतली प्रतीकात्मकता ढेरे यांनी अत्यंत सूक्ष्मतेने उलगडली आहे.
या ग्रंथाची दहा प्रकरणे आहेत. त्यातून मंत्रीदेवतेची वेगवेगळी रूपे, तिची भारतातील उपासनकेंद्रे, उपासना परंपरा, उपासकांच्या धारणा, कथा-गाथा, उत्सव-यात्रा-जत्रा यांचा परिचय ढेरे यांनी करिन दिला आहे. लज्जागौरी, जोगुळांबा, रेणुका, यल्लमा, मातंगी, कुंकणा, कौटवी, कोलंबिका हि एकाच देवतेची-अदितीची किंवा पृथ्वीची रूपे आहेत हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलेले आहे. वारूळ प्रतिकापासून सांग-सालंकृत मूर्तीपर्यंतचा लज्जागौरीचा रूपविकासही त्यांनी दाखविला आहे. ग्रंथाचे महत्त्वाचे सूत्र आहे ते सर्व जीवमात्रांची महामाता म्हणून निर्मितीची देवता प्राचीन भारतीयांनी कशी कल्पिली आणि तिची उपासना कशी केली याच्या शोधाचे आहे. आसाममधील ‘कामाख्या’ या योनीरूप देवीपासून आंध्र-कर्नाटक-तामिळनाडूमधल्या वारुळावर अधिष्ठीत कुमारीपर्यंत या देवीविषयीच्या विविध संकल्पना आणि पूजापद्धतींचा उलगडा करीत तिचे सर्जक स्वरूप त्यांनी उलगडले आहे आणि बाहयत: नागर संस्कृतीला अशोभन वाटणारी हि देवी आणि तिची उपासना कोणत्या संकल्पनेची कशी वाहक आहे याचे विवेचन केले आहे. केवळ मराठीतच नव्हे तर भारतीय देवताविज्ञान क्षेत्रात हा महत्त्वाचा ग्रंथ ठरतो. वैदिक अदिती ते लज्जागौरी हा प्रवास भरतील परंपरेतील प्रमाणांनीच डॉ. ढेरे यांनी सिद्ध केला आहे. भूदेवीचा सर्जनेंद्रियाची पूजा आणि स्त्रीच्या निर्मितीसंबंध अवयवांची पूजा हि प्राचीन पुजोपासना हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतचा प्रदेश कसा व्यापते याच्या अध्ययनाचे एक उत्कृष्ट आणि एकमेव साधन म्हणून या ग्रंथाचे महत्त्व आहे. पुरात्तत्व, लोकतत्त्व आणि समाज-मानसशास्त्र यांची धर्मेतिहासाशी उत्तम सांगड घालून ढेरे यांच्या या ग्रंथाने सांस्कृतिक मानसशास्त्रासारखी एक नवी अध्ययनशाखा या पुस्तकाद्वारे मराठीत परिचित करून दिली आहे.