बंगला हा वास्तुप्रकार भारताच्या निवासस्थानातला महत्त्वाचा वास्तुप्रकार. सध्याच्या काळात बंगला म्हणजे जमिनीवर बांधलेले स्वतंत्र घर या रूढार्थाने घेतला जातो. इंग्रजी ‘Bungalow’ किंवा मराठी ‘बंगला’ या शब्दच मूळ हिंदी ‘बांगला’ या शब्दात आहे. ‘बंगला ‘ म्हणजे बंगाल राज्यातल्या खेड्याशी निगडित झोपडी सदृश्य घर. भारतातील बंगल्याच्या बांधकामाची सुरुवात अठराव्या शतकातच झाली. बंगालमधल्या गवताच्या छताच्या झोपडीप्रमाणे त्रिमितीय रचना असलेले, उंच छताचे, व्हरांडा आणि बऱ्याच खोल्या असणारे घर म्हणजे बंगला होय. भारताच्या ग्रामीण भागातील झोपडीच्या रचनेप्रमाणे या बंगल्याना उंच चौथरे असून चौकोनी किंवा आयताकृती आराखडा अशी रचना होती.
बंगला या घराच्या प्रकारचे भारतातले मूळ शोधावयाचे म्हटल्यास भारतातील ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा आढावा घ्यावा लागतो. एकोणिसाव्या शतकातील बंगला म्हणजे यूरोपीय धाटणीचे भारताच्या हवामानास अनुकूल असलेले राजेशाही निवासस्थान असे म्हणता येईल. भारतातील ब्रिटिशकालीन बंगले हे मुख्यत्वेकरून ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी बांधले गेले आणि अर्थातच त्यावर ब्रिटिश वास्तुकलेची छाप होती. त्यायोगे राज्यकर्ते आणि जनसामान्यांची निवासस्थाने यातला भेदही ठळकपणे दिसावा अशी योजना होती. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला बंगल्यांची संकल्पना भारतात उदयास आली आणि पुढे १८५७ ला ब्रिटिशांनी भारतात सत्ता स्थापन केल्यानंतर ती चांगलीच दृढ आणि लोकप्रिय झाली. पुढे या निवासस्थानाच्या प्रकारात जागेच्या गरजेप्रमाणे, आर्थिक-सामाजिक स्थानाप्रमाणे, स्थानिक हवामानाप्रमाणे तसेच साधनसामुग्रीची उपलब्धता आणि कामगारांच्या कौशल्यानुसार बदल होत गेले.
नंतरच्या काळात, बंगल्याना भारतीय समाजाचीही मान्यता मिळाली आणि एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी शहराच्या नागरीकरणाच्या रेट्यात उच्चवर्गीयांनी आणि पुढे मध्यमवर्गीयांनी देखील हा निवासस्थानाचा प्रकार आपलासा केला. भारतातील स्थानिक घरांच्या स्वरूपापेक्षा बंगल्याची वास्तुरचना, जागेचा आराखडा आणि त्रिमितीय रचना याबाबतीत निराळी होती. त्यामुळेच बंगल्याच्या विकासनामुळे भारतीय शहरांचा पोतच बदलून गेला. बंगला हे समाजातील उच्च स्थानाचे प्रतीक समजण्यात येऊ लागले. पाश्चात्यिकरण आणि यूरोपीय जीवनशैलीची नक्कल करणं हे प्रतिष्ठेचं समजलं जाऊ लागलं आणि बंगला हे या प्रतिष्ठेचे द्योतक होतं.
भारतातील ब्रिटीश पूर्वकालीन बंगले
सुरुवातीच्या काळात एकमजली आणि नंतरच्या काळात दुमजली बंगले बांधले गेले. या बंगल्याना संरक्षक भिंतींचं कुंपण असे. सुरुवातीच्या काळात बांधले गेलेले एकमजली बंगले हे बहुतांशी वेळा साधे आणि सममित असत. मध्यभागी मोठा दिवाणखाना, त्याभोवती चार कोपऱ्यात खोल्या असे त्याचे स्वरूप असे. या खोल्या स्वयंपाकघर, भोजनगृह, अध्ययन कक्ष, आणि शयनगृह या स्वरूपात असत. शयनगृहाला संडास आणि स्नानगृह जोडलेले असे. घराच्या तिन्ही बाजूला वरून आच्छादित केलेला व्हरांडा असे. या व्हरांड्याचा उपयोग विविध प्रकारे होत असे. या बंगल्याना असणाऱ्या जाड भिंती, उंच छते, वायुवीजनासाठी खिडक्या आणि दारे यांवर असणाऱ्या छोट्या खिडक्या, सपाट किंवा उंच उतरती छपरे आणि व्हरांड्याच्या रूपात अर्ध-आच्छादित मोकळ्या जागेची रचना या साऱ्या गोष्टी म्हणजे भारतीय हवामानास अनुकूल असा प्रतिसाद होता. बंगल्याच्या रचनेत आणि वास्तुकलेत ब्रिटिशांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचं प्रतिबिंब दिसून येतं. बंगल्याच्या घर चालवणाऱ्या मालकिणीच्या सरबराईस नोकरचाकर असत. त्यामुळे स्वयंपाकघर, नोकरांच्या राहण्याच्या खोल्या आणि इतर संबंधित जागा या घराच्या मागच्या बाजूस असत. या जागा मुख्य इमारतीस आच्छादित बोळाने जोडलेल्या असत. घराच्या भिंतीच्या बाहेरील बाजूस संडास आणि स्नानगृहाची सोय असे, जेणेकरून स्वच्छता कामगारांना घराबाहेरूनच तिथे जाता येऊन स्वच्छता करता येऊ शकेल.
श्रीमंत लोकांच्या घराना दोन पातळ्यात विभागलेलं छत आणि उतरत्या छपरातल्या खिडक्या असत. अशा श्रीमंती थाटातल्या बंगल्याना हिरवाईनं आच्छादलेलं, मोठं कुंपण घातलेलं आवार असे. या आवारात फुलझाडं, हिरवळ, उंच झाडं आणि क्वचित पाण्याचं कारंजही असे. या हिरवळीची रचना, कुंपणाची भिंत, प्रवेशद्वार, प्रवेशमार्ग याची रचना केवळ दृष्यपरिणाम साधण्याच्या दृष्टीनेच नाही तर प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून असे. अशा प्रकारे या बंगल्याच्या रचनेमुळे आणि वास्तुशैलीमुळे ब्रिटिश कुटुंबाना सांस्कृतिक सुरक्षितता आणि खाजगीपणा तर मिळत होतेच, शिवाय ब्रिटिश अधिकारी आणि भारतीय लोक यातला वांशिक भेद, श्रेष्ठत्व, सत्ता आणि सामाजिक अंतर दर्शविण्याचा तो एक उपयोजित मार्ग होता.
१८६४ नंतर शिमला ही ब्रिटिशांची ऊन्हाळ्यातली राजधानी बनली. मैदानी भागातल्या ऊन्हाळ्यापासून सुटका करून घेण्यासाठी आणि ६ महिने थंड, आल्हाददायक हवामानाचा आनंद उपभोगण्यासाठी ब्रिटिशांनी थंड हवेच्या ठिकाणी बंगले बांधायला सुरुवात केली. पुढे भारतभर अशी कितीतरी थंड हवेची ठिकाणं विकसित झाली. राजस्थानमधल्या माऊंट अबू आणि गुजरातमधल्या काही ठिकाणी ब्रिटिश आणि स्थानिक अशा संमिश्र शैलीत कितीतरी भव्य बंगले बांधण्यात आले. १८१५ ते १९४७ या काळात समुद्रसपाटीपासून सुमारे ४,००० ते ८,००० फूट उंचीवर अनेक थंड हवेची ठिकाण विकसित झाली आणि तिथे बंगले बांधले गेले. त्यातले काही बंगले आजही पाहायला मिळतात. दगडी बांधकाम आणि लाकडाचा वापर या थंड हवामानास अनुकूल प्रतिसादासोबत लाकूडकाम खिडक्या आणि दारे यांवर जाळ्यांची उत्कृष्ट रचना हा कारागिरीचा उत्तम नमुना होय.
भारतातील ब्रिटिशकालीन बंगले
भारतातील सार्वजनिक इमारतींच्या वास्तुकलेमध्ये बदल होत जाऊन ब्रिटीशकालीन बंगल्यांची एक प्रकारची वास्तूकला शैली निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात निओक्लासिकल (Neoclassical) आणि नंतर गॉथिक रिव्हायव्हल (Gothic Revival) या शैली सत्ता आणि वांशिक श्रेष्ठत्त्वाचं प्रतीक म्हणून वापरण्यात आल्या. पुढे भारतातल्या स्थानिक हिंदू आणि मुस्लीम शैलींचा इमारतीच्या दर्शनी भिंतीवर वापर करण्यात येऊ लागला. हीच शैली पुढे इंडो- सार्सानीक (Indo-Saracenic) शैली म्हणून एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी उदयास आली.
या काळातल्या भारतातील वास्तुकलाशैलींच्या पुनरुत्थानास बेंगॉल स्कूल ऑफ आर्ट आणि टागोरांच्या स्थापनेचा प्रभाव दिसून येतो. याशिवाय ल्युटेन्सच्या नवी दिल्लीतल्या शैलीतून जाणवणाऱ्या ब्रिटिश भूमिकेचाही प्रभाव दिसून येतो. त्यानंतरच्या काळात म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिका आणि यूरोप मधून आलेल्या आर्ट डेको आणि आधुनिक शैलीचाही प्रभाव भारतातल्या सार्वजनिक इमारतींमध्ये दिसू लागला. भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या काळात ल कॉर्ब्यूझ्ये च्या आंतरराष्ट्रीय आधुनिक शैलीचं वर्चस्व दिसून येतं. जस जस बंगला या वास्तुप्रकाराला लोकप्रियता मिळत गेली आणि सार्वजनिक इमारतींच्या वास्तुकलाशैलींमध्ये जसजसे बदल घडत गेले, तसतसे बदल बंगल्याच्या रचनेत आणि स्वरूपात प्रतिबिंबित होत गेले.
बंगल्याचा सामाजिक मागोवा
विसाव्या शतकात बंगला हा वास्तुप्रकार भारताच्या सामाजिक जीवनात प्रस्थापित झाला. लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर मध्यमवर्गीयांनी या वास्तुप्रकाराचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं. सामाजिक दृष्टिकोनातून पाहता, आता सामाजिक जीवनापेक्षा व्यक्तिगत जीवनाला जास्त महत्त्व मिळालं. ब्रिटिशांमुळे भारतात आलेल्या पाश्चात्तीकरणाचा तो एक मोठा परिणाम होता. ज्या भारतात सामूहिक जीवन हे प्रमाण होतं, इथे आता व्यक्तिगत जीवन महत्त्वाचे ठरू लागले. आधीच्या घरांची रचना आणि बंगल्याची रचना यांमध्ये दारे आणि खिडक्यांच्या रचनेतही खूप बदल घडून आला. नियंत्रित आकाराच्या खिडक्यांपेक्षा बाहेरचा देखावा बघण्याच्या दृष्टीने मोठ्या आणि काचेची तावदाने असलेल्या खिडक्या दिसू लागल्या. भारतामधल्या बंगल्यांच्या स्वरूपातल्या प्रादेशिक बदलांतून एकप्रकारे सांस्कृतिक बहुवादच (cultural pluralism) दिसून येतो. बंगल्याची संकल्पना जरी उसनी असली तरी त्याच्या स्वरूपावर झालेले भारतीय संस्कार, क्रमाक्रमाने झालेले बदल आणि त्याचा अंगीकार यामुळे बंगल्यांची भारतीय वास्तुशैली अधिकच समृद्ध झाली.
संदर्भ:
- देसाई, माधवी यांच्या Adaption and Growth of The Bungalow in India, presented in International Workshop on the Architectural Heritage of Asia and Oceania at the Rizvi College of Architecture, Bombay या आणि Architecture + Design 13, No. 2 (March-April, 1996) यामध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन निबंधावर आधारित लेखाच्या काही भागाचा भाषांतरित भाग.
- inflibnet.ac.in/bitstream/10603/28542/12/12_chapter%204.pdf
- Sengupta, Tania, Living in the periphery : Provinciality and Domestic Space in Colonial Bengal, The journal of Architecture, vol 18, no 6, Routledge, Taylor and Francis, 2013.
समीक्षक – श्रीपाद भालेराव