पुष्कळ सपुष्प वनस्पती परागणात साहाय्य करणाऱ्या प्राण्यांना मोबदला देतात. यांपैकी सुमारे २०,००० सपुष्प वनस्पती पराग हाच मोबदला म्हणून बहाल करतात. पराग हा पुगंतुकाचा स्रोत प्राण्यांना देण्यामागील उद्देश चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांनी श्रमविभाजन गृहितकाद्वारे उलगडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यानुसार अशा सपुष्प वनस्पती दोन वेगवेगळ्या शारीरिक गुणधर्मांच्या केसरदलांमार्फत पराग व पुगंतुकाचा अपव्यय टाळतात.
डार्विन यांच्या गृहितकाची योग्यता सिद्ध करण्यासाठी जर्मनीतील एस्. रेन्नर,चीनमधील झेड्. ल्युओ व डी. झँग या संशोधकांनी लाखेरी (मेलॅस्टोमा मलबॅथ्रिकम;Melastoma malabathricum) या झुडपाचा अभ्यास केला. लाखेरीच्या फुलात केसरदले दोन भिन्न गटांमध्ये विभागलेली असतात. आतील केसरदलांचा गट पिवळसर असून खाद्यजन्य असतो, तर त्याभोवतालचा वलयांकित जांभळा गट परागणासाठी असतो (श्रमविभाजन). लाखेरीचे परागण भुंग्यांद्वारे (कार्पेंटर बी) होत असल्याने परागाचा आस्वाद घेताना परागणकारक केसरदलांचा त्याच्या पोटाच्या तळाशी संपर्क येऊन ते तळाला चिकटतात व परपरागणात मदत करतात.
संशोधकांनी केलेल्या सखोल प्रायोगिक अभ्यासातून असे उघडकीस आले, की खाद्यजन्य पराग असलेली केसरदले भुंग्यांना आकर्षित करतात. यात परागणकारक केसरदलांच्या तुलनेत बरेच कमी प्रजननात्मक पराग असतात. त्यामुळे पुंगंतुकाचा अपव्यय होत नाही. इतकेच नव्हे तर या भिन्न गटांतील परागांचे बाहेरील आवरणदेखील भिन्न असते. खाद्यजन्य परागांचे बाहेरील आवरण सूक्ष्मरेखित असते, तर परागणकारक परागांचे आवरण हे सूक्ष्म सुरकुत्या असलेले असते. यामुळे परागांचे वहन भुंग्यांद्वारे सहज शक्य होते. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली परागण झालेल्या किंजल्काचे (Stigma)निरीक्षण केल्यास असे आढळून आले की, त्यावर खाद्यजन्य परागांपेक्षा परागणकारक परागांचे प्रमाण जास्त असते आणि त्यांच्यामुळेच अधिकतम निषेचन(Fertilization) घडते.
अशा प्रकारे लाखेरी झुडपाने आपला पराग हा मोबदला म्हणून देण्यास जुळवून घेतले आहे. या संशोधनातून डार्विन यांच्या श्रमविभाजन गृहितकाची सार्थकता पटवून देण्यास संशोधकांना यश आले.
संदर्भ :
- Luo, Z; Zhang, D., Renner, S., Why Two kinds of stamens in buzz-pollinated flowers? Exdperimental support for Darwin’s division-of-labour hypothesis, Functional Ecology, 22, 794-800,2008.
समीक्षक – बाळ फोंडके