भारतातील जम्मू काश्मीर राज्यात दल सरोवराच्या ईशान्य दिशेला स्थित असलेली ही बाग मुघल शैलीतील भूदृश्य कलेचा नमुना आहे. सहाव्या शतकाच्या काळात प्रवरसेन दुसरा या श्रीनगरच्या राजाने सरोवरापाशी प्रथम या बागेची निर्मिती केली व त्यात एक विश्राम कक्षा बांधला अशी आख्यायिका आहे. कालांतराने या जागी वावर कमी होऊन ती इतिहासजमा झाली. १६१९ साली मुघल बादशाह जहांगीर याने मालिका नूरजहान हिच्यासाठी याच ठिकाणी प्राचीन बागेचा विस्तार करून मुघल शैलीच्या या बागेची निर्मिती केली.
साधारण १९२६ फूट लांबी व ८२३ फूट रुंदी असणारी ही आयताकृती बाग मूळ पर्शियन भूदृश्यकलेतील “चारबाग” या संकल्पनेवर आधारित आहे. बाग दल सरोवराभिमुख, डोंगर उतारावर स्थित आहे. बागेच्या सभोवताली महिरपी असलेल्या भिंती आहेत. वरून खालपर्यंत तीन टप्प्यांमध्ये ही बाग सरोवराकडे उतरत जाते. बागेच्या लांबीला समांतर व आयताच्या मधोमध रचलेला “शाह नहर” हा नाला बागेला दोन समान (symmetrical) भागात विभागतो, तसेच उतारामुळे निर्माण झालेल्या बागेच्या तीन टप्प्यांना जोडण्याचे कामही करतो. वरच्या स्तरावर असलेल्या विहिरीतून पाणी गुरुत्त्वाकर्षणाने खालच्या बागेत या नाल्यातून वाहते. शाह नहर एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर ज्या ठिकाणी उतरतो, तिथे “चादर” वरून म्हणजेच कोरीवकाम केलेल्या तिरक्या संगमरवरी फर्शी वरून पाणी खळाळत वाहते. पाण्याच्या उडणाऱ्या तुषारांमुळे हवा गार तर होतेच, शिवाय कोरीव पटलावरून वाहताना सूर्यकिरण परावर्तित झाल्यामुळे पाण्याचे एक वेगळे मोहक रूप दृष्टीस पडते. मुघल शैलीतील बागांची “चादर” ही एक खासियत आहे.
दल सरोवरालगत जो खालचा पहिला टप्पा आहे त्याच्या मधोमध या शाह नहर वर ” दिवाण – ए – आम” नावाचा कक्ष बांधला आहे. त्याच्या वरच्या दुसऱ्या टप्प्यावर मधोमध एका चौथऱ्यावर स्थित “दिवाण – ए- खास” आहे. त्याच्या सभोवताली अनेक कारंजी असलेला एक जलाशय आहे. बादशाहच्या मर्जीतील खास व्यक्तींना तसेच दरबारातील मातब्बरांनाच इथे प्रवेश करायची मुभा असे. सर्वात वरच्या तिसऱ्या टप्प्यावर राजघराण्यातील स्त्रियांसाठी “जनाना” बाग निर्माण केली आहे. मधोमध काळे संगमरवरी बांधकाम असलेली “बरादरी” आहे. बरादरीच्या भिंतीवर पर्शियन कवी अमीर खुसरौ याने काश्मीरच्या सौंदर्याबद्दल काढलेले प्रसिद्ध उद्गार कोरले आहेत “अगर फिरदौस बर रोय – ए – जमीन अस्त, हमी अस्त ओ हमी अस्त ओ हमी अस्त!” म्हणजेच, पृथ्वीवर जर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे! बरादरीच्या दोन बाजूला दोन पांढरे संगमरवरी मंडप व सभोवती छोटे नहर व कारंजी असलेले जलाशय आहेत. बागेत एकूण ४०० कारंजी तसेच लहान मोठे धबधबे आहेत. बांधकाम करताना धबधब्यांच्या पाठीमागील भिंतींमध्ये ‘चिनी खाने’ म्हणजेच दीप प्रज्वलित करण्यासाठी कोनाडे निर्माण केले गेले. यामुळे बागेच्या सौंदर्याला वेगळे परिमाण लाभत असे.
‘फ्रॅक्टल भूमिती’ च्या सिद्धांताप्रमाणे मूळ आयताकृती बागेचे चार भागांत विभाजन करून पुढे प्रत्येक भागांचे पुन्हा त्याच पद्धतीने चार भागांत विभाजन करणे अशी मुघल बागेची रचना करण्यात येते. म्हणजेच, रचनेचा प्रत्येक भाग हा एकूण रचनेची प्रतिकृती असावी अशा पद्धतीने रचना केलेली असते. शालिमार बागेतही पदपथ व नहर यांचा उपयोग करून प्रत्येक स्तराचे अशाच पद्धतीने विभाजन करण्यात आले आहे. रेखीव पद्धतीने दुतर्फा लावलेले चिनार वृक्ष आणि फुलांचे ताटवे ही भूमिती अधोरेखित करतात.
विशिष्ट भौगोलिक स्थानाच्या निवडीमुळे समोरचे दल सरोवर व मागच्या पर्वत रांगा दोन्ही बागेच्या सौंदर्यात भर घालतात, तसेच बागेचा एक अविभाज्य घटकच होऊन जातात. आपल्या हद्दी पलीकडील निसर्ग अशा पद्धतीने बागेच्या रचनेत सामावून घेणे हे ही मुघल शैलीचा एक वैशिष्ट्य. या संकल्पनेला ‘उधार दृश्य'(Borrowed views) असे म्हटले जाते.
संदर्भ :
- जेलिको, सर जेफ्री व जेलिकोद, सुसन लँडस्केप ऑफ मॅन
- https://en.wikipedia.org/wiki/Shalimar_Bagh,_Srinagar
- https://whc.unesco.org/en/tentativelists/5580/
समीक्षक – श्रीपाद भालेराव