मैदानी भागात ब्रिटिश शैलीचा प्रभाव प्रथम नागरी भागात जिथे पारंपरिक शैलीची घरे होती तिथे दिसून आला. भारतीय लोक यूरोपियन जीवनशैलीच अनुकरण करू लागले आणि त्याचा प्रभाव त्यांच्या घराच्या बदलत्या शैलीत दिसू लागला. सुरुवातीला भारतीय घराची आतील रचना तशीच राहून फक्त दर्शनी भागात यूरोपीयन शैली दिसू लागली. परंपरागत सुशोभिकरणाच्या जागी आता यूरोपियन शैलीतले खांबांवरचे शीर, प्रवेशद्वाराच्या आणि खिडकीवरच्या कमानी, कठड्याच्या भिंतीचे लहान खांब, इमारतीच्या दर्शनी भागाचा वरचा त्रिकोणी भाग, काचेची रंगीत तावदाने, ओतीव लोखंडाचे कठडे आणि इतर वैशिष्ट्ये दिसू लागली. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाकडे आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बोहरी समाजातील लोकांनी गुजरात मध्ये बांधलेल्या बंगल्यांच्या दर्शनी भागात ही वैशिष्ट्ये आढळतात. बोहरी समाज हा व्यापारी वर्ग असल्याने तो एकतर ब्रिटिशांनी प्रस्थापित केलेल्या शहरात वस्तीला होता किंवा परदेशात. जेंव्हा त्यांनी आपल्या मूळ गावात घरे बांधली तेंव्हा त्याच्यावर झालेल्या पाश्चात्त्य प्रभावाचे पडसाद त्यांच्या घराच्या दर्शनी भागात उमटू लागले. या बदलाच्या रेट्यात परंपरागत आणि पाश्चात्त्य सुशोभिकरणाचा संगम झालेला या काळातल्या बंगल्यामधून पाहावयास मिळतो.

भारतामध्ये पाश्चात्त्यिकरण रुजलं ते प्रथम आर्थिकदृष्ट्या सधन आणि सामाजिकदृष्ट्या वरच्या गटात. त्यांनी आपली घरं बांधण्यासाठी शहराच्या बाहेरच्या शांत, हवेशीर आणि हिरवळीच्या जागांची निवड केली. ब्रिटिश लष्करी छावण्यांमध्ये मूळ स्वरूपातील घरांना प्राधान्य दिलं गेलं तर शहरी भागात या बंगल्याना विविध स्वरूप मिळालं. यूरोपियन जीवनशैलीचं अनुकरण करण्याच्याआकांक्षेपायी या बंगाल्यांसमोरच्या मोठ्या प्रांगणात बॅडमिंटन कोर्ट आणि टेनिस कोर्ट विकसित केली जाऊ लागली. यूरोपियन  शैलीतले घटक, ग्रीक आणि रोमन शैलीतले तपशील त्यांनी अंगीकृत केले. त्यामुळेच, दिल्लीतल्या बंगल्यामध्ये डोरिक(Doric) किंवा टस्कन(Taskan) शैलीचे स्तंभशीर, तसेच मुंबई आणि बंगळूर मधल्या बंगल्यांमध्ये गॉथिक शैलीचा प्रभाव आढळून येतो. या घरांमधून आकार आणि तपशिलाच्या क्लिष्टतेसोबतच, उतरत्या घपरांसह अंतर्गत आणि बाह्य तपशिलांची संपन्नता ही या घरांची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील.

यातूनच पुढे ब्रिटिश कलोनियल (British Colonial) आणि लोकवास्तुकला (Vernacular Architecture) यांचा संगम असलेली शैली उदयास आली. या प्रकारात मोठ्या प्रमाणात  (Palladian) शैलीतल्या टुमदार बंगल्याचा समावेश होतो. सममित आराखडा, मोठा प्रवेशद्वार असलेला जिना, स्तंभयुक्त द्वारमंडप आणि दर्शनी भाग, दरवाजा आणि खिडक्यांवर त्रिकोणी भागाची रचना आणि लहान खांब असलेल्या कठड्याच्या भिंती, ही पलाडी शैलीतल्या टुमदार बंगल्याची काही वैशिष्ट्ये. दोन किंवा चारही बाजूंनी सारखा दर्शनी भाग असे. यामध्ये ग्रीक, रोमन ते बरोक अश्या विविध शैलींचा वापर आढळास येतो. लाकडाच्या कोरीवकामामध्ये काही ठिकाणी अगदी अनलंकृत तर काही ठिकाणी बहुविध शैलीतून उचललेल्या तपशिलांमुळे हे काम व्हिक्टोरियन सारखे वाटत असे. सुशोभित स्तंभशीर, भिंतीतून पुढे आलेल्या खिडक्या, यूरोपियन पद्धतीची प्रतीकं, उतरती छपरे आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची छते हि या काळातल्या वास्तुकलेची वैशिष्ट्ये होत. आधीच्या काळाप्रमाणेच, श्रीमंत कुटुंबातल्या नोकरवर्गाची उदा. आया, वाहन चालक, झाडूकाम करणारा, माळी वगैरे मंडळींची राहण्याची सोय बंगल्याच्या आवारात घराच्या बाहेरच्या बाजूस केलेली असे.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यंतरानंतर, शिकलासवरलेला, पाश्चात्त्यिकरण झालेला मध्यमवर्ग उदयास येऊ लागला. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाकडे बंगला या वास्तुप्रकाराचा स्वीकार करण्यात हा वर्ग अग्रेसर होता. या काळात भारतीयांमध्ये जीवनशैली आणि समाजमूल्यांमध्ये झालेला बदल जाणवण्याइतका स्पष्ट होता. मध्यमवर्गीयांनी बंगले बांधायला सुरुवात केल्यामुळे जागेचा आणि बंगल्याचाही आकार नेटका झाला. या झालेल्या बदलांचा प्रभाव सार्वजनिक बांधकाम विभागाने (P.W.D)भारतभर विकसित केलेल्या इमारतीच्या रचनेतही दिसून येतो. १८५४ मध्ये ब्रिटिश सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केली. रेल्वे, रस्ते आणि इतर दळणवळणाची साधने देशभर विकसित झाली. सरकारी नोकऱ्यांत वाढ होऊ लागली. त्यामुळे सरकारी नोकरवर्गासाठी घरबांधणीची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढू लागली. सार्वजनिक बांधकाम विभाग ही अभियंत्याची संस्था. त्यामुळेच त्याचा इमारतीच्या रचनेत साधेपणा आणि उपयुक्ततेवर भर. त्यांनी त्यासाठी इमारतीच्या वास्तुरचनेचे प्रमाण आराखडे आणि हस्तपुस्तिका तयार केल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे, पोलीस स्थानके आणि बंगल्याच्या विकसित केलेल्या रचना या तिथल्या प्रदेशातील लोकवास्तुकलेशी जवळीक साधणाऱ्या होत्या आणि त्याचा प्रभाव त्या त्या स्थानिक विभागात मध्यमवर्गीयांनी बांधलेल्या बंगल्यांच्या रचनेवर निश्चितच झाला. छायाचित्रण आणि इतर प्रसिद्धी माध्यमांमुळे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बदलांची माहिती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीत्या जनसामान्यांपर्यंत पोहोचत होती आणि त्याचा प्रभाव वास्तुकलेवर होत गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिद्ध केलेल्या नमुना रचनांच्या हस्तपुस्तिका स्थानिक भाषांमध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे त्याचा त्या काळात विकसित झालेल्या बंगल्यांच्या सौंदर्यावर परिणाम झाला.

साधनसामुग्री आणि तंत्रज्ञानातील बदल

बांधकाम तंत्रज्ञानातील बदल आणि नवीन बांधकाम साहित्य यांमुळे बंगल्यांच्या अंतर्गत रचनेवर परिणाम झाला. रेल्वे बांधणीमुळे भारतात लोखंडी ‘I section ‘ बांधकाम क्षेत्रात परिचयाचा झाला. सपाट कमानींचाही (Jack Arch) सर्रास वापर सुरू झाला. पुढे ‘I section ‘ वर दगडी फरसबंदी करून वरचा मजला बांधण्याचा प्रघात सुरू झाला. यामुळे खोल्यांचा विस्तार परंपरागत घरांपेक्षा बराच वाढला आणि ऐसपैस खोल्या बांधणे प्रचलित झाले. यानंतरच्या काळात लोखंडी सळईयुक्त सिमेंट काँक्रीटच्या बांधकामामुळे बांधकामाची ताकद वाढून वास्तुरचनेमध्ये लवचिकता आली. त्यामुळे वास्तुरचनांच्या बऱ्याच शक्यता निर्माण झाल्या.

या शतकात बंगल्याचा आकार, रचना आणि शैली यात प्रत्येक दशकात बदल होत गेले. त्यामुळे बांधकामसाहित्यातच नाही तर दर्शनी बांधकामसामुग्रीतही बदल होत गेले. टेरॅझो, कवडीकाम (mosaic), चमकदार फरश्या आणि संगमरवर या साहित्याचा वापर होऊ लागला. त्याचसोबत साधी तसेच तारांनीयुक्त, रंगीत, काचणीयुक्त, नक्षीकाम असलेली काच सुशोभिकरणासाठी तसंच उपयुक्ततेसाठी वापरण्यात येऊ लागली. दरवाजे आणि खिडक्यांच्या प्रकारातील बदलासोबतच फर्निचर आदींमध्ये मधेही बदल झाले आणि एडवर्डिअन शैली उदयास आली. तदनंतर आर्ट डेको हा वास्तुशैलीप्रकार उदयास आला. पूर्वनिर्मित कठडे, जाळीकाम, छताला प्लास्टरमधला नक्षीकामाचा पट्टा, दर्शनी भागावर प्रतीकचिन्हे, लाकूडकामातली नवीन शैली अश्या कितीतरी गोष्टींनी या काळातली बंगल्यांची शैली समृद्ध केली. काही कालावधीतच भारतीय कामगार कलोनियल शैलीत सुशोभिकरण आणि सालंकृतीकरण करण्यात तरबेज झाले. याकाळात, विशेषतः भारतीय सुतारांनी नवीन साधनसामुग्री आणि तंत्रज्ञान वापरून तपशिलांच्या सौंदर्यात कमालीचं कौशल्य जपलं. त्यांचं विविध वस्तू बनवण्याचं कौशल्य आणि ते साकारण्यातली दृढता वाखाणण्यासारखी होती. नवीन घराच्या वास्तुशैलीप्रमाणे त्यातल्या अंतर्गत वापराच्या लाकडी वस्तू जसं की पलंग, कपाटे, बैठक, कोपऱ्यातल्या टिपल्या, खुर्च्या आणि टेबले इ. यांची रचना आणि शैली ही घराला साजेशी होती.

संदर्भ:

  • देसाई, माधवी Adaption and Growth of The Bungalow in India, presented in International Workshop on the Architectural Heritage of Asia and Oceania at the Rizvi College of Architecture, Bombay या आणि Architecture + Design 13, No. 2 (March-April, 1996) यामध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोध निबंधावर आधारित लेखाच्या काही भागाचा भाषांतरित भाग
  • inflibnet.ac.in/bitstream/10603/28542/12/12_chapter%204.pdf
  • Sengupta, Tania Living in the periphery : Provinciality and Domestic Space in Colonial Bengal, The journal of Architecture, vol 18, no 6, Routledge, Taylor and Francis, 2013.

समीक्षक – श्रीपाद भालेराव

प्रतिक्रिया व्यक्त करा