मोहरी हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे, कमी खर्चाचे पीक आहे. तेलबिया पिकांच्या एकूण उत्पादनामध्ये मोहरीचा दुसरा क्रमांक लागतो. हे पीक मुख्यत: पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश व बिहार राज्यांत मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाराष्ट्रातसुद्धा या पिकाला बराच वाव आहे. महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र बरेच कमी (सु.११००० हेक्टर) असून प्रामुख्याने गहू, हरभरा यांसारख्या रब्बी पिकात हे आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणून घेतात.
जमीन : मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असून मध्यम खारट जमिनीत इतर पिकांच्या तुलनेत मोहरी पीक चांगले येते.
पूर्वमशागत : तीन वर्षांतून एकदा नांगरट व दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पेरणीपूर्वी जमीन ओलवून वापसा आल्यावर पेरणी केल्यास उगवण चांगली होते. जर मोहरीचे बागायती पीक घ्यावयाचे असेल तर सारायंत्र किंवा कुळवाने सारे पाडले म्हणजे पिकाला पाणी समप्रमाणात मिळते.
सुधारित जाती : मोहरी पिकाच्या विविध गुणधर्म असलेल्या सुधारित जाती,त्यातील तेलाचे प्रमाण(%), कालावधी (दिवस), उत्पादन (क्विं./हे) खालील तक्त्यामध्ये दिले आहे.
अ.नं. | सुधारित जाती | तेलाचे % प्रमाण | कालावधी (दिवस) | उत्पादन (क्विं./हे.) |
१ | सीता | ३८ | ९०-९५ | १०-१२ |
२ | पुसा बोल्ड | ४० | १२०-१३० | १२-१५ |
३ | वरुणा | ३९ | १२५-१३० | १०-१२ |
४ | पुसा जयकिसान | ३८ | ११०-१२० | १०-१५ |
५ | रजत | ३८ | ११०-११५ | १०-१५ |
पेरणी : मोहरीची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत करावी. बागायती मोहरीची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत केली तरी चालते. उशिरा पेरणी केल्यामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. मोहरीचे बियाणे आकाराने लहान असल्यामुळे पेरणी करताना बियाण्यास बियाणाएवढेच वाळू किंवा चांगले कुजलेले शेणखत/गांडूळखत मिसळून पेरणी करावी. भारी जमिनीत दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी. तर मध्यम जमिनीत ३० सेंमी. ठेवावे. बियाणे फार खोलवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. पेरणीपूर्वी २ ग्रॅम बाविस्टीन प्रति किलो बियाणास कोरडे चोळून बीजप्रक्रिया करावी.
बियाणे : पेरणीसाठी योग्य वाणाची निवड करून साधारणत: ४ ते ५ किग्रॅ. बियाणे/हेक्टरी वापरावे.
मिश्र पीक : मोहरीचे पीक आंतरपीक म्हणून घेणे फायदेशीर आहे. गहू व मोहरीच्या पट्टा पद्धतीमुळे निव्वळ गहू व मोहरी स्वतंत्र पिकाच्या तुलनेत अधिक आर्थिक फायदा होतो. जर मिश्र पीक म्हणून घ्यावयाचे असेल, तर गहू, मोहरी ओळीचे प्रमाण ४ : २ किंवा ६ : २ असे ठेवावे.
रासायनिक खते : मोहरीच्या बागायती पिकासाठी रासायनिक खताची मात्रा हेक्टरी ५० किलो नत्र व २५ किलो स्फुरद अशी आहे. नत्राच्या पूर्ण मात्रेपैकी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी मातीत मिसळून द्यावे. राहिलेले २५ किलो नत्र, ३०-३५ दिवसांच्या आत एक खुरपणी करून द्यावे. कोरडवाहू पिकासाठी ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे.
आंतर मशागत : पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी खुरपणी व नंतर दोन कोळपण्या देऊन तणांचा बंदोबस्त करावा.
पाणी व्यवस्थापन : मोहरी पिकास पाण्याची गरज कमी असते. पिकास साधारणपणे योग्य वेळी दोन ते तीन पाण्याच्या पाळ्या दिल्यास उत्पन्नात भरपूर वाढ होते. पाणी योग्य प्रमाणात द्यावे. त्यासाठी पहिले पाणी उशिरा द्यावे. त्यामुळे पिकाची अवास्तव वाढ होत नाही आणि फांद्या जास्त येऊन उत्पन्नात वाढ होते. पीक वाढीच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत; त्यांपैकी फुले येण्याच्या वेळी ३०-३५ दिवसांनी, शेंगा लागण्याच्या वेळी ५०-५५ दिवसांनी व दाणे भरण्याच्या वेळी ७०-७५ दिवसांनी पाणी देणे फायदेशीर ठरते.
कीड : मोहरीवर माशी व मावा या दोन किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो.
१) माशी (Mustard saw fly) : या किडीचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यांत दिसून येतो. त्यासाठी मॅलेथिऑन ५० ई.सी. ६२५ ते १००० मिलि. किंवा डायामिथोएट ३० टक्के प्रवाही ५०० मिलि. ५०० लि. पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
२) मावा (Lipaphis erysimi) : मोहरीवर प्रामुख्याने मावा या किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे उत्पन्नात खूपच घट होते. ह्या किडीचे वेळेवर नियंत्रण करणे महत्त्वाचे ठरते. यासाठी पेरणी वेळेवर करावी. उशीरा पेरणी केल्यास या किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. या किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० टक्के प्रवाही ५०० मिलि.. किंवा फॉस्फोमिडॉन ८५ टक्के प्रवाही ११५ मिलि. ५०० लि. पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे.
रोग : मोहरी पिकावर प्रामुख्याने करपा, पांढरा तांबेरा व भुरी या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
१) पांढरा तांबेरा व करपा : पांढरा तांबेरा हा रोग अलबुगो कँडिडा (Albugo candida) या कवकामुळे आणि करपा सुडोमोनास कॅन्नाबिना (Pseudomonas cannabina) या सूक्ष्मजंतूमुळे होतो. हे रोग शेंगा लागण्याच्या वेळी होतात. त्यासाठी मँकोझेब १२५० ग्रॅ. ५०० लि. पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे.
२) भुरी : हा रोग इरिसिफे पॉलिगोनी (Erysiphe polygoni) या कवकामुळे होतो. पिकाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम करणाऱ्या या रोगाच्या नियंत्रणासाठी ०.२५ टक्के गंधकाची फवारणी करावी.
काढणी व मळणी : झाडावरील ७५ टक्के शेंगा पिवळ्या पडल्यावर शेंगातील दाणे टणक लागताच मोहरी पिकाची काढणी करावी. काढणीस उशीर झाल्यास शेंगा फुटून बिया शेतात गळून पडतात व उत्पादनात घट येते. कापणी सकाळच्या वेळी करावी. कापणीनंतर ५-७ दिवस पीक वाळू द्यावे, नंतर मळणी करावी व उफणणी करून बियाणे स्वच्छ करावे.
उत्पादन : मोहरीची लागवड व व्यवस्थापन अशा प्रकारे केल्यास सरासरी १२-१५ क्विंटल प्रति हेक्टर बागायतीत व ८-१० क्विंटल प्रति हेक्टर कोरडवाहू शेतीत उत्पन्न मिळू शकते.
संदर्भ :
- Roy,Mangala Handbook Of Agriculture,2006.
- Prasad,Rajendra Textbook Of Field Crop Production,2004.
समीक्षक – भीमराव उल्मेक