शेवंती हे बहुवर्षायू फुलझाड असून त्याचे शास्त्रीय नाव क्रिसँथेमम इंडिकम (क्रि. मोरिफोलियम) आहे. व्यापारी दृष्ट्या फुलांच्या रंगांतील विविधता, फुलांचा आकार आणि त्यांची उमलण्याची पद्धत या नैसर्गिक देणगीमुळे शेवंतीला ‘फुलांची राणी’ समजले जाते. चीन हे शेवंतीचे मूलस्थान असून जपान, अमेरिका, यूरोप आणि आशियाई देशांमध्येही तिची लागवड केली जाते. भारतामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी या पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात शेवंतीच्या लागवडीत अहमदनगर जिल्हा अग्रेसर असून पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा व नागपूर या जिल्ह्यांतही तिची लागवड लहानमोठ्या प्रमाणात केली जाते.

शेवंतीच्या फुलांचा उपयोग हार, गुच्छ, वेण्या बनविण्यासाठी तसेच फुलदाणीत ठेवण्यासाठी  मोठ्या प्रमाणावर केला जातो. महाराष्ट्रात विशेषत: दसरा, दिवाळी, नाताळ आणि लग्नसराईमध्ये या फुलांना मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांतून प्रचंड प्रमाणावर मागणी असते. बाजारभावदेखील चांगला मिळत असल्याने महाराष्ट्रात सुमारे ४०० ते ५०० हेक्टर क्षेत्र या फुलझाडाच्या लागवडीत आहे. शेवंतीच्या मोठ्या आकाराच्या (व्यास सु. ७ ते १५ सेंमी.) फुलांना मोठमोठ्या हॉटेल्समधून कट फ्लॉवर म्हणून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. लाल, जांभळ्या, पिवळ्या व पांढऱ्या फुलांचे उद्यानातील तसेच इमारतीसमोरील लहानमोठे ताटवे अत्यंत मनोवेधक दिसतात.

 

जाती आणि प्रकार : जगामध्ये शेवंतीच्या एकूण १५ ते २० हजार जाती असून भारतात सु. ५०० जातींची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यामध्ये झिप्री, राजा, पिवळी रेवडी आणि पांढरी रेवडी या स्थानिक जातींची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. वेगवेगळ्या रंगांनुसार शेवंतीच्या काही जाती खालील तक्त्यात दिल्या आहेत.

 

रंग जाती
पांढरा बग्गी, पांढरी रेवडी, स्नो बॉल, ब्युटी, बिरबल सहानी, राजा, कस्तुरबा गांधी, जेट स्नो, शरदशोभा, मिरा, शरदमाला, वर्षा, मेघदूत, कारगील, मोहिनी, शरदशृंगार.
पिवळा झिप्री, कुंदन, इंदिरा गोल्ड, सोनाली तारा, सुपर जायंट, चंद्रमा, पिवळी रेवडी, सोनाली तारा, यलो गोल्ड, सोनार बंगला.
लाल जया, राखी, जुली, रेडगोल्ड, गार्नेट, डायमंड ज्युबली, ॲप्रिकॉट.
जांभळा शरदप्रभा, निलिमा, पिकॉक, महात्मा गांधी, क्लासिक ब्युटी.

शेवंतीच्या ब्यूटी, स्नो बॉल, कस्तुरबा गांधी, जेट स्नो, चंद्रमा, सोनार बांगला, सुपर जाएंट, सोनारी तारा, इंदरा गोल्ड, महात्मा गांधी, क्लासीक ब्यूटी आणि पिकॉक, डायमंड ज्युबली आणि ॲप्रिकॉट या जातींना मोठ्या आकाराची फुले येत असल्यामुळे त्यांना कट फ्लॉवर म्हणून चांगली मागणी आहे. शरद शोभा, शरद श्रृंगार, मोहिनी, वर्षा, शरदमाला, मेघदूत, कारगील आणि मीरा यांसारख्या शेवंतीच्या जाती कुंड्यांतून तसेच ताटवे करून लावण्यासाठी योग्य आहेत.

हवामान : शेवंतीला वाढीच्या सुरुवातीच्या काळात मोठा दिवस, भरपूर सूर्यप्रकाश आणि तापमान २०० ते ३०० से. इतके असावे लागते.

जमीन : या पिकाला मध्यम हलकी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागते.जमिनीचा सामू ६.५ ते ७ च्या दरम्यान असावा.

लागवड : महाराष्ट्रात शेवंतीची लागवड एप्रिल-मे मध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. पाणीपुरवठ्याचे साधन पुरेसे नसल्यास जून ते ऑगस्ट या काळात शेवंतीची दुसरी लागवड केली जाते. या पिकाची फुले डिसेंबरपासून उपलब्ध होतात. लागवड करताना जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करून घ्यावी. जमिनीत हेक्टरी २५ ते ३० टन शेणखत टाकावे आणि ६० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. शेवंतीच्या लागवडीसाठी मागील हंगामातील निरोगी फांद्या निवडून सरीच्या दोन्ही बाजूंनी ३० सेंमी. अंतरावर कडक ऊन कमी झाल्यावर दुपारनंतर लागवड करावी. प्रतिहेक्टरी १,४०,००० रोपे लागवडीसाठी लागतात.

खते : अखिल भारतीय समन्वीयत पुष्प सुधार प्रकल्प, पुणे येथे शेवंतीच्या झिप्री या जातीवर घेण्यात आलेल्या प्रयोगावरून फुलांच्या अधिक उत्पादनासाठी हेक्टरी ३०० किग्रॅ. नत्र, २०० किग्रॅ. स्फुरद आणि २०० किग्रॅ. पालाश द्यावे. परंतु पाणीपुरवठ्याची उपलब्धता लक्षात घेऊन जमिनीच्या गुणधर्मानुसार खताचे प्रमाण ठरविणे जरुरीचे असते. संपूर्ण शेणखत स्फुरद, पालाश आणि नत्राचा अर्धा हप्ता लागवडी वेळी आणि उरलेल्या नत्राचा अर्धा हप्ता लागवडीनंतर एक ते दीड महिन्याने द्यावा.

पाणी : शेवंती पिकास लागवडीपासून पावसाळा सुरू होईपर्यंत ५ ते ६ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. कळया आणि फुले येण्याच्या काळात पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. जरुरीपेक्षा जास्त पाणीदेखील या पिकाला हानिकारक असते.

आंतर मशागत : शेवंतीच्या पिकास वेळोवेळी कोळपणी (निंदणी) करून तणाचा नायनाट करावा, त्यामुळे जमीनदेखील भुसभुशीत राहते व झाडाची जोमदार वाढ होते.

लागवडीची वेळ फुले येण्याचा कालावधी जाती
जानेवारी एप्रिल, मे ज्वाला, ज्योती
फेब्रुवारी जून, जुलै वर्षा, मेघदूत
मार्च सप्टेंबर, ऑक्टोबर शोभा, शरद
जुलै ऑक्टोबर, नोव्हेंबर शरदक्रांती, शरदमाला
ऑगस्ट डिसेंबर, जानेवारी जया, वासंतिका
ऑगस्ट फेब्रुवारी, मार्च इलिनी, कॅसकेट

फुलांची तोडणी आणि उत्पादन : जातीपरत्वे लागवडीनंतर ३ ते ५ महिन्यांत फुलांची तोडणी सुरू होते आणि महिनाभर चालते. पूर्ण उमललेल्या फुलांची तोडणी करावी. उमललेली फुले उशिरा काढल्यास रंग फिका पडतो आणि वजनही कमी भरते. तोडलेली फुले बाजारपेठेत पाठवायची झाल्यास २ किलोच्या करंड्यात भरून पाठवावीत. हेक्टरी ७ ते १३ टन फुलांचे उत्पादन मिळते. फुलांना सरासरी ४ ते ६ रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळतो.

खालील तक्त्यात शेवंतीच्या काही जाती व त्यांचे हेक्टरी उत्पादन दिले आहे.

.क्र. जातीचे नाव हेक्टरी उत्पादन (टन) शेरा
झिप्री ७ ते ८ स्थानिक जाती
राजा ७ ते ८ स्थानिक जाती
पांढरी रेवडी ७ ते ८ स्थानिक जाती
पिवळी रेवडी ६ ते ७ स्थानिक जाती
सोनाली तारा १० ते १२ अखिल भारतीय  समन्वीयत   पुष्प सुधार प्रकल्प, पुणे यांनी अधिक उत्पादनासाठी शिफारस केलेल्या जाती.
आ.आय.एच.आर.सिले ४ १२ ते १३
बग्गी १० ते ११
यलो गोल्ड १० ते ११

शेवंतीवरील किडी व रोग आणि त्यांचे नियंत्रण : शेवंतीवर मावा, फुलकिडे, लाल कोळी, व अस्वली अळी या किडींचा आणि मर व पानांवरील ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

मावा : या किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणपणे पावसाळ्यात होतो. ही कीड शेवंतीची कोवळी पाने व कळ्या आणि खोडामधील अन्नरस शोषण करते. यामुळे एकूण उत्पादनात व फुलांच्या गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम होतो. या किडीच्या नियंत्रणासाठी मॅलॅथिऑन १.५ मिलि. प्रती लिटर पाण्यात १० – १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करतात.

फुलकिडे : या किडीचा उपद्रव हा ऑक्टोबरच्या कडक उन्हात व उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर शेवंतीच्या कळ्या व फुलांवर आढळतो. त्यामुळे कळ्या व फुलांचे नुकसान होऊन त्यांची गुणवत्ता व उत्पादन कमी होते.  या किडीचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी फेनीट्रोथीऑन १० टक्के प्रवाही किंवा क्युनॉलफॉस २५ टक्के प्रवाही या कीटकनाशकाची कळ्या लागल्यापासून १० – १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करतात.

लाल कोळी : या किडीचा उपद्रव हा उन्हाळ्यात पानांच्या खालच्या बाजूस आढळतो. पानांच्या खालच्या बाजूस जाळ्या तयार झाल्यामुळे पाने गुंडाळली जाऊन झाडांची वाढ योग्य पद्धतीने होत नाही. या किडीचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी पाण्यात विरघळणारे गंधक ३ ग्रॅ. प्रति लिटर किंवा केलथेन १ मिलि. प्रति लिटर या प्रमाणात फवारले असता पिकांचे योग्य संरक्षण होते.

अस्वली अळी : लहान आकाराच्या, अंगावर केस असणाऱ्या या अळ्या पावसाळ्यात झपाट्याने व मोठ्या प्रमाणात वाढतात. त्या संपूर्ण पाने खाऊन टाकतात. किडीचे अंडीपुंज व अळ्या गोळा करून त्यांचा नाश करतात. तसेच इमिडॅक्लोप्रिड  १०० मिलि. किंवा क्विनॉल फॉस २०० मिलि. प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करतात.

मर : या रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळापासून ते फुले येण्याच्या कालावधीमध्ये केव्हाही आढळतो. प्रादुर्भाव झालेल्या झाडांचे खोड तपकिरी रंगाचे होऊन पाने पिवळी पडून निस्तेज व मऊ होतात व काही दिवसांच्या अंतराने पूर्ण झाड सुकून जाते. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी शेतामध्ये झाडाच्या मुळाशी डायथेन एम-४५ या बुरशीनाशकाचे ०.२ टक्के किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड ०.३ टक्के ओततात.

पानावरील ठिपके : सेप्टोरिया बुरशीमुळे होणार्‍या या रोगाचा प्रादुर्भाव दमट व पावसाळी हवामानात मोठ्या प्रमाणावर आढळतो. या रोगामुळे जमिनीलगत असलेल्या पानांवर काळपट तपकिरी गोल आकाराचे ठिपके पडून ठिपके आकाराने मोठे होत जातात आणि संपूर्ण पाने करपतात. त्यावर नियंत्रणासाठी या रोगास बळी न पडणाऱ्या जातींची लागवड करावी. प्रादुर्भाव आढळल्यास मॅन्कोझेब (०.२%), किंवा कार्बेनडॅझीम (०.१%) क्लोरोथॅलोनिल (०.२%), डायथेन एम-४५ (०.२%) किंवा बाविस्टीन (०.१%) यांपैकी एका बुरशीनाशकाची १० ते १५ दिवसाचे अंतराने फवारणी करावी. रोगट पाने काढून टाकावीत.

संदर्भ :

  • Patil,M.S.;Karde,A.R.Flower Breeding and Genetics,New India publishing Agency,New Delhi.
  • Indian Horticulture magazine,2000.

समीक्षक – भीमराव उल्मेक

प्रतिक्रिया व्यक्त करा