क्षेमेंद्र : (सु. ९९०–१०६६ ). बहुश्रुत व  प्रतिभासंपन्न काश्मीरी संस्कृत पंडित. त्याचा जन्म सधन कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांचे नाव प्रकाशेंद्र आणि आजोबांचे सिंधू असून त्याचे आडनाव व्यासदास होते. तो काश्मीरच्या अनंत राजाचा दरबारी कवी होता.  ‘बृहत्कथामंजरी’  ग्रंथात तो शिष्य असल्याचे सांगतो. अभिनवगुप्तांचा   तो मूळचा ðशैव पंथी होता. पुढे सोमाचार्य ह्या भागवतपंथी आचार्यांकडून त्याने ðवैष्णव पंथाची दीक्षा घेतली.  त्याच्या कवित्वशक्तीस त्याच्या घरातील अभिरुचिसंपन्न वातावरण आणि काश्मिरातील निसर्गसौन्दर्य यांची जोड मिळाली. बृहत्कथामंजरी आणि भारतमंजरी ह्या दोन ग्रंथांखेरीज त्याने सुमारे चाळीस ग्रंथ लिहिले आहेत.त्याने कवी म्ह्णून आपल्या कारकिर्दीची सुरुवात रामायण ,महाभारत या दोन महाकाव्यांपासून केली. त्याने रामायणमंजरी, भारतमंजरी आणिगुणाढ्याच्या बृहत्कथेवर आधारित बृहत्कथामंजरी अशा तीन रचना केल्या. क्षेमेन्द्राच्या काव्यरचनेचा पूर्वार्ध या तीन महाकाव्यांनी झाला असे म्हणता येईल.पुढे काश्मिरातील राजकीय उलथापालथ आणि नैतिक घसरण याचा परिणाम म्हणून क्षेमेन्द्राने नैतिक उपदेशात्मक काव्ये लिहिली आणि काही विडंबनात्मक रचना केल्या. राजकीय सत्तेच्या आश्रयाने चालणारा भ्रष्टाचार आणि अनैतिकता यांच्यामुळे व्यथित होऊन त्याने या परिस्थितीवर टीका करणारी ग्रंथरचना केली. नर्ममाला, देशोपदेश, समयमातृका आणि कलाविलास यातून त्याने समाजातील प्रत्येक स्तरातील विरोधाभास अनैतिकता, भ्रष्टाचार या सगळ्यावर टीकेची झोड उठवली. तो केवळ टीका करूनच थांबला नाही तर त्याच्या सेव्यसेवकोपदेश, दर्पदलन, चतुर्वर्गसंग्रह, चारुचर्या या ग्रंथांमधून त्याने आदर्श नैतिक व्यवहाराचा वस्तुपाठ लोकांसमोर ठेवला. त्याच्या या मनोवस्थेमुळे तो साहजिकच बुद्धाच्या विचारांकडे आकर्षित झाला. त्याने अनेक बौद्ध मठमंदिरांना भेटी दिल्या. तिथे कोरलेले बुद्धाच्या आयुष्यातील प्रसंग पाहून तो खूप प्रभावित झाला. पण त्याही धर्माची उतरती कळा पाहून दुःखी झाला. भगवान बुद्धाचे चरित्र या प्रकाराने काळाच्या पडद्याआड जाईल म्ह्णून त्याने सुमारे एकशे सात अवदानांमधे या प्रसंगांची गुंफण केली आणि बोधिसत्वावदानकल्पलता या ग्रंथाची रचना केली. त्याने त्याचे आराध्य देवता विष्णुच्या अवतारांवर आधारित दशावतारचरित ग्रंथांची रचना केली. यातील नवव्या सर्गात बुद्ध आणि कृष्ण या अवतारांची सरमिसळ झाली आहे. हे धड महाकाव्यही नाही आणि धर्मकाव्यही नाही.अलंकारशास्त्राला त्याचे कोणतेही योगदान नाही  ; तथा पित्याने वृत्त आणि छेदशास्त्राच्या संदर्भात  सुवृत्ततिलक ३ विन्यासांत विभागलेला ग्रंथ  लिहिला.  पहिल्या विन्यासात सव्वीस समवण वृत्तीची व्याख्या दिली असून त्या सर्व प्रकारच्या काव्याला उपयुक्त होत.  त्यांचा वापर आणि कोणते कवी कोणते वृत्त उत्तम प्रकारे हाताळतात, ह्याची माहिती आहे. उदा., अभिनंद (अनुष्टुभ), भारवी (वंशस्थ), कालिदास (मंदाक्रांता), भवभूति (शिखरिणी) ३.  औचित्य-विचारचर्चा ग्रंथातील कारिका  त्याच्या वृत्ती व उदाहरणासह अन्य विविध ग्रंथातून उचलेल्या आहेत. त्याच्या मते शिवाय  औचित्य हेच रसाचे सत्त्व होय. ज्याला जे साजून दिसेल, ते उचित होय असे आचार्यांनी म्हटले आहे. ह्या उचिताचा जो भाव त्याला औचित्य असे म्हणतात (कारिका ७). त्यानंतर पद, वाक्य, प्रबन्धार्थ, गुण (उदा., ओज), अलंकार, रसक्रिया, कारक, लिंग, वचन, उपसर्ग, काल, देश इत्यादींच्या संदर्भांत औचित्याची उदाहरणे त्याने दिली आहेत. प्रत्येक विषयाच्या संदर्भात एक उदाहरण औचित्याचे, तर एक अनौचित्याचे अशी पद्धत त्याने अवलंबिली आहे. आनंदवर्धनाच्या ध्वन्यालोकात जे सांगितले आहे, त्याचाच सविस्तर विस्तार क्षेमेंद्राने येथे केला आहे. औचित्यविचारचर्चा ह्या ग्रंथात क्षेमेंद्राने कविकर्णिकाकाव्यालंकार या  स्वतःच्या ग्रंथाचा उल्लेख केला असून तो त्याच्या  कविकंठाभरण ह्या ग्रंथाचा  एक भाग असावा. कविकंठाभरण हा ग्रंथ सहा संधींमध्ये विभागलेला असून त्यात ५५ कारिका आहेत. त्यात शिष्यांचे तीन प्रकार सांगितले असून  कवींचे छायोपजीवी, पदकोपजीवी, पादोपजीवी, सकलोपजीवी आणि भुवनोपजीव्य असे प्रकार सांगितले आहेत. काव्याचे गुण आणि दोष आणि  व्याकरण, तर्क, नाट्य ह्यांसंदर्भात  कवींना मार्गदर्शनही केले आहे. ह्या ग्रंथात त्याने दहा प्रकारचे चमत्कारही निर्देशिले आहेत. उदा., रसास्वाद, विस्मय इत्यादी.

त्याच्या अन्य ग्रंथांत ‘चित्रभारत’ हे अनुपलब्ध नाटक आणि ‘समयमातृका’ हे दोन ग्रंथ असून ‘समयमातृका’ ग्रंथाद्वारे तो गणिकांच्या गिऱ्हाईकाला वश करण्याच्या क्लुप्त्या आणि चलाखी सांगून त्यांपासून सावध राहण्याच्या सूचना देतो. या ग्रंथाची स्फूर्ती अभिनव गुप्तपासून मिळाल्याचेही तो या ग्रंथात नमूद करतो.

संदर्भ :

  • Chakraborty, Uma. 1991. Kṣemendra: The Eleventh Century Kahmiri Poet. Sri Satguru Publications. New Delhi.
  • Kane, P. V. 1951. History of Sanskrit Poetics, Delhi.

प्रतिक्रिया व्यक्त करा