मर्यादित शब्दसाठा, सुलभ व्याकरण आणि संदेशवहनाला (कम्युनिकेशन) सोपी अशा मिश्रभाषा.पिजिन या मिश्रभाषा मूलतः फक्त बोलीभाषा किंवा जनभाषा (लिंग्वा फ्रँका) आहेत. बिझनेस या इंग्रजी शब्दाच्या उच्चारातील बदलातून पिजिन या शब्दाची निर्मिती झाल्याचे एक मत आहे. ज्या सामान्य लोकांना देव-घेव करणे अशक्य आहे, अशा लक्षावधी लोकांची भाषाविषयक गरज पिजिन भाषा भागवितात. एकमेकांपेक्षा वेगळ्या भाषा बोलणाऱ्या भाषिक समाजांचा एकमेकांशी संपर्क आला की त्यातून संकरित किंवा मिश्र भाषा तयार होतात.या संकरित वाणींना इंग्रजीत पिजिन म्हणतात. सामाजिक भाषाविज्ञानातील भाषासंपर्काच्या अभ्यासाक्षेत्राशी निगडित असणाऱ्या संकल्पनांपैकी पिजिन आणि क्रिओल या संकल्पना आहेत.
काही वेळा माणूस अशा परिस्थितीत सापडतो की एकमेकांच्या भाषा समजत नसूनही संदेशन होणे आवश्यक असते. अशा वेळी देहबोलीच्या माध्यमातून विविध प्रकारचे आवाज इ. भाषाबाह्य साधनांबरोबरच निजभाषेचा वेगळ्या प्रकारे वापर करून तो संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. त्या वेळी, दुस-या भाषिक समाजाशी तत्काळ संपर्क साधण्याच्या तीव्र गरजेपोटी पिजिन किंवा संकरित वाणी निर्माण होतात. या प्रक्रियेमध्ये बहुधा तीन किंवा तीनपेक्षा जास्त भाषिक समाजातल्या व्यक्ती असतात.
पिजिन भाषा अस्तित्वात येण्याची कारणे शोधताना इतिहासकाळातल्या घटनांचा मागोवा घेतला असता या भाषांचा संपर्कभाषा म्हणून नोंदणीकृत प्रथम वापर मध्ययुगीन धर्मयुद्धांच्या (क्रूसेड्स) काळात (इ. स. १०९६-१२९१) भूमध्य प्रदेशाच्या पूर्व भागात झाला. त्यानंतर इ. स. १५ व्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीज वसाहतकारांनी पश्चिम आफ्रिकेत प्रवेश केला. तेव्हा तेथील स्थानिक लोकांनी पोर्तुगीज भाषेतील शब्द आत्मसात करून वेगळ्या भाषेची निर्मिती केली. पुढे युरोपिअन राष्ट्रांनी १७व्या शतकात छोट्या-छोट्या बेटांपासून खंडांपर्यंत प्रदेश पादाक्रांत करून आपले साम्राज्य वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्या काळात ते आफ्रिकेतून गुलामांना न्यू वर्ल्डमधील (कॅरेबिअन, दक्षिण अमेरिका व दक्षिण अमेरिकन संघराज्य) चहाच्या आणि तंबाखूच्या मळ्यात काम करण्यासाठी आणत. गुलाम म्हणून आणत असताना व आणल्यानंतर बंडाचा धोका टाळण्यासाठी समान भाषा बोलणाऱ्या गुलामांना वेगळ्या ठिकाणी ठेवले जात असे. या गुलामांची वांशिक आणि भाषिक पार्श्वभूमी वेगळी असल्यामुळे आपापसात बोलणेही शक्य होत नसे. मळ्यांच्या मालकांच्या भाषाही पूर्णपणे वेगळ्या होत्या. गुलामांसाठी हा मानसिक व भाषिक आघात होता. निजभाषेचे जतन करणे किंवा तिचा त्याग करणे, यांपैकी कोणतीच गोष्ट त्यांना शक्य नव्हती. परिणामतः युरोपिअन भाषा व गुलामांच्या वेगवेगळ्या आफ्रिकन निजभाषा यांच्या संकरातून पिजिन भाषा तयार झाल्या.
काही अभ्यासकांच्या मते या वेगवेगळ्या पिजिन भाषांचीही एक पूर्वज भाषा असावी; कारण त्यांच्यात बरेच साम्य आढळते.पोर्तुगीज पिजिन पंधराव्या-सोळाव्या शतकांत वेगवेगळ्या वसाहतींमध्ये आधी निर्माण झाली असावी व इंग्रजी आणि फ्रेंच भाषक वसाहतवाद्यांनी तिच्यात आपापल्या भाषेतील नवीन शब्दांची भर घातली असावी. या प्रक्रियेला भाषाविज्ञानात पुनर्शब्दवृद्धी (relexification) म्हटले जाते.
पिजिन तयार होण्याची इतरही कारणे सांगितली जातात. त्यांतील एक प्रमुख म्हणजे व्यापारासाठी भिन्न भाषांच्या भाषकांचा एकमेकांशी संपर्क होणे. अशा ठिकाणी दुभाषेही उपलब्ध नसतात. त्यामुळे व्यापारात अर्थसत्ता असणा-यांची भाषा, त्या व्यापाराची गरज असणाऱ्यांना स्वीकारावी लागते. त्यात निजभाषेच्या रचना, शब्दही मिसळले जातात. इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज व डच भाषकांच्या वसाहतींमधून अशा अनेक पिजिन भाषा तयार झाल्या. अशा संकरित वाणींचे भारतातले उदाहरण म्हणजे नागालँड, अरुणाचल प्रदेशातील ‘नागा पिजिन’ होय. आसाममध्ये बाजाराच्या ठिकाणी १९ व्या शतकात नागा लोकांच्या गरजेपोटी ही तयार झाली असावी. ही आसामी या इंडो-युरोपिअन भाषेचा आणि नागा लोक बोलत असलेल्या तिबेटो-बर्मन भाषाकुलातील भाषांचा संकर आहे. आज ही भाषा २९ वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या भाषकांची संपर्कभाषा म्हणून वापरात आहे.
पिजिन भाषा अस्तित्वात येण्याचे आणखी एक कारण म्हणजे काही ठिकाणी युरोपियन लोक आणि एतद्देशीय लोकांचा संपर्क फक्त रोजगारासाठी आला. दक्षिण आफ्रिकेतील ‘फानाकली पिजिन’ ही १९व्या शतकाच्या मध्यात अशाप्रकारे तयार झाली. या पिजिन भाषेचा उपयोग आफ्रिकेतील बहुभाषी खाणकामगारांना झाला.
अमेरिकेची आशिया खंडातील देशांबरोबर झालेली युद्धे ही पिजिन निर्मितीचे एक कारण मानले जाते. दुस-या महायुद्धाच्या अखेरीस अस्तित्वात आलेली ‘बांबू इंग्लिश’ ही याचे उदाहरण आहे. या पिजीनमध्ये इंग्रजीची सोपी केलेली व्याकरणव्यवस्था आणि जपानी, कोरियन व इंग्रजी भाषांची सरमिसळ आहे.जपान्यांनी इंग्रजी भाषिक राष्ट्रांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नांतून बांबू इंग्लिश निर्माण झाली. कोरियन लोक जपान्यांकडून ती शिकले. अमेरिकन सैनिक युद्धानंतर ती शिकले. अमेरिकन सैनिक युद्धानंतर जपानमध्ये शिकले व तिचा वापर त्यांनी पुढे कोरियन युद्धात केला.
वासाहतिक देशांत वेगवेगळ्या वंशाचे व प्रदेशातले लोक, उद्योगधंद्यांसाठी, चरितार्थासाठी स्वेच्छेने येऊन राहतात. तेव्हा ते तत्काळ एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यांना एकमेकांशी त्वरित संपर्क साधण्यासाठी भाषेची आत्यंतिक निकड असते. अशा वेळीही पिजिन भाषा अस्तित्वात येतात. पॅसिफिक बेटांमधील पापुआ – न्यू गिनी या बेटावर तयार झालेली ‘तोक पिजिन’ ही या प्रकारचे उदाहरण आहे. तो बुआंग व इंग्रजी भाषा यांचा संकर आहे.
पिजिन भाषेची वैशिष्ट्ये:
- पिजिन भाषेची निर्मिती एका लहान कार्यक्षेत्रापुरतीच झाली असल्याकारणाने त्या भाषेचा शब्दसंचय आणि व्याकरणव्यवस्था अत्यंत मर्यादित स्वरूपाची आहे. ती दुसऱ्या कार्यक्षेत्रांसाठी वापरली जाऊ शकत नाही. म्हणूनच ती निरंतर नाही. ऑस्ट्रेलियन न्यू गिनी जवळच्या दक्षिण सी बेटांवर बोलल्या जाणा-या निओ-मेलानिशियन या पिजिनमध्ये फक्त २००० शब्द आहेत, तर चिनी पिजिन इंग्लिशमध्ये फक्त ७०० शब्द आहेत. त्यांपैकी बहुसंख्य शब्द इंग्लिश भाषेतील आहेत. निओ-मेलानीशियन पिजनमध्ये व्यंजनांची संख्या फक्त ६ आहे. शिवाय मेलानीशियन पिजिन इंग्लिशमध्ये काही स्थानिक भाषेतील रूपे आढळतात, जसे ‘कईवाई’ (खाणे), ‘किआऊ’ (अंडे), ‘बालूस’ (पक्षी) इत्यादी.
बहुतेक पिजिन भाषांच्या वाक्यरचनेमध्ये लिंग, वचन, विभक्तिप्रत्यय या घटकांचा सुसंवाद तर दूरच पण हे घटकच अस्तित्वात नसतात. वाक्यांचे काळही संदर्भावरून ओळखले जातात. इतकेच नव्हे तर काही अभ्यासक यातला एक जरी घटक त्या भाषेत आढळला, तर तिला पिजिन मानायलाच तयार नसतात.
याचा अर्थ पिजिन ही भाषाच नव्हे असे म्हणणे चुकीचे आहे; कारण या संकरित वाणीचे स्वत:चे असे काही निश्चित नियम आणि वापराचे दंडक असतात.
- पिजिन ही कोणत्याही भाषिक समाजाची वा व्यक्तीची निजभाषा, मातृभाषा किंवा प्रथमभाषा नाही. त्यामुळे ती नेहमी दुसऱ्या समूहाबरोबरच वापरली जाते. समूहांतर्गत संदेशनासाठी कधीही तिचा वापर होत नाही. ती समूहातल्या अनेक भाषकांच्या निजभाषांची झालेली सरमिसळ असल्यामुळे समूहातल्या कोणाचाही एकमेकांची भाषा शिकवण्याचा हेतू नसतो.
- पिजिन तयार होण्यासाठी संदेशन ताबडतोब सुरू होण्यासाठीची तातडीची निकड असते. त्यामुळे पिजिन ही अत्यंत साधी, संपादन करायला खूप सोपी भाषा आहे. ‘फानाकलो पिजिन’ ही दक्षिण आफ्रिकेतील वाणी खाणकामगारांना केवळ तीन आठवड्यांत शिकवली जाते. पिजिन भाषेचा शब्दसंग्रह किंवा तिच्यातल्या संरचना ही सरमिसळ असल्यामुळे ती ज्या बोलींची बनलेली असते, तिच्यापैकी एकाही भाषेशी तिचे साधर्म्य दाखवता येत नाही. बहुधा वर्चस्व असणाऱ्या भाषेतला शब्दसंग्रह आणि इतर छोट्या वाणींची ध्वनिव्यवस्था व वाक्यव्यवस्था अशी सरमिसळ झालेली असते; पण ही एका भाषेने केलेली दुसऱ्या भाषेची उसनवारी नसते.
शब्दसाठा मर्यादित असल्यामुळे एका शब्दाला अनेक अर्थ आणि बरीच व्याकरणिक कार्ये असतात. अनेकदा एकच शब्द नामाचे आणि विशेषणाचेही काम करतो. निओ-मेलानिशियन या पिजिनमध्ये दाढीला चेहऱ्यावरचे गवत आणि केसांना डोक्यावरचे गवत असे म्हटले जाते (grass belong head). येथे belong हे क्रियापद of या अव्ययाचे काम करते.
- एखादी पिजिन अमुक एका भाषेपासून तयार झाली आहे याचा अर्थ ती त्या भाषेचे भ्रष्ट रूप आहे असा होत नाही. तो समाजाने तीव्र भाषिक गरज भागवण्यासाठी शोधलेला मार्ग असतो. त्यामुळेच ती स्वीकारार्ह असते.
ब्रिटिशांशी संपर्क आल्यानंतर भारतात इंग्रजी भाषेच्याही काही पिजिन निर्माण झाल्या आहेत.भारतात आलेले इंग्रज सुरुवातीच्या काळात व्यापारासाठी त्या त्या प्रांतांतल्या बोलीशी संकर झालेल्या पिजिन वापरत होते. ‘बट्लर इंग्लिश’, ‘छी छी इंग्लिश’, ‘बाबू इंग्लिश’ या त्या काळातल्या पिजिन होत. या पिजिनचे अवशेष अँग्लो इंडियन बोलीत सापडतात.
मुंबईत बोलल्या जाणा-या ‘हिंदी-उर्दू’ बोलीलाही पिजिन म्हणावे की क्रिओल म्हणावे की हिंदीची पोटबोली म्हणावे, हा संशोधनाचा विषय आहे. महादेव आपटे यांनी या बोलीचे केलेले विश्लेषण मुंबईच्या भाषिक परिस्थितीवर अचूक भाष्य करते. ही हिंदी-उर्दू बोली अल्पशिक्षित निम्न आर्थिक स्तरांतील हमाल, टॅक्सी ड्रायव्हर , फेरीवाले, वेटर, घरगडी या वर्गातले लोक बोलतात. त्यांच्या या बोलीवर मराठीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. ध्वनिव्यवस्थेत झालेला बदल म्हणजे हिंदी-उर्दू आणि E या स्वनिमांची जागा अनुक्रमे अई आणि अऊ या द्विस्वरांनी घेतली आहे. मराठीत ‘आपण’ हे प्रथमपुरुषी संबंधी सर्वनाम मुंबईच्या हिंदी-उर्दूमध्ये वापरले जाऊ लागले आहे.
मराठीत जोर देण्यासाठी वापरला जाणारा ‘च’ हा प्रत्ययही मुंबईच्या हिंदी-उर्दूमध्ये आला आहे.
उदा. हिंदी-उर्दू – वो ही जाएगा
मुंबई हिंदी-उर्दू – वोच जायगा
वाक्यरचनेतील बदल
हिंदी-उर्दू – हमने उसे देखा
मुंबई हिंदी-उर्दू – हम उसकू देखा
मराठी – आम्ही त्याला पाहिलं
मुंबईच्या हिंदी-उर्दू बोलीचा उगम दोन भाषांच्या संपर्कातून झाला आहे. वेगवेगळ्या भाषिक पार्श्वभूमीच्या लोकांची संदेशनाची गरज ही बोली भागवते. व्यापार किंवा तत्सम कामांसाठी ती वापरली जाते. तिच्यातला शब्दसाठा मर्यादित आहे. त्यामुळे तिला पिजिन म्हणावे असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.
संदर्भ :
- धोंगडे, रमेश, सामाजिक भाषाविज्ञान, पुणे, २०००.
- Hall, R. A., Pidgin and Creole Languages, London, 1966.
- Sebba, Mark,Contact Languages: Pidgins and Creoles,1997.