भाषा विकासातील प्रक्रिया .ती सामान्यपणे शब्दाच्या  बदलणाऱ्या अर्थान्वयन आणि उच्चारणाशी   निगडीत आहे. ‘चेंडू माझ्याकडे टाक’ या वाक्यात ‘टाक’ या शब्दाचा क्रियापद म्हणून वापर झालेला आपण पाहातो आणि त्याचा अर्थ ‘फेकणे’ असा सांगता येईल. पण ‘अभ्यास करून टाक’ किंवा ‘दूध पिऊन टाक’ या वाक्यांमध्ये ‘टाक’ या शब्दाचा ‘टाकणे’ किंवा ‘फेकणे’ या क्रियेशी काहीच संबंध नसून इथे ‘टाक’ हा ‘अभ्यास करणे’ किंवा ‘दूध पिणे’ या क्रिया पूर्णपणे संपवण्याबद्दल निर्देश करतो. तसेच तो वक्त्याची या क्रियेप्रती असलेल्या वृत्ती/दृष्टिकोनाबद्दलही निर्देश करतो: ‘एकदाचा अभ्यास करुन टाक/दूध पिऊन टाक!’ भाषेच्या विकासाच्या प्रवाहात बऱ्याचदा स्वतंत्र अर्थ असलेल्या नाम आणि क्रियापदांचे मूळ अर्थ पुसले जाऊन त्यांना व्याकरणिक अर्थ प्राप्त होतात. भाषाविकासातील या प्रक्रियेला ‘व्याकरणीभवन’ असे म्हणतात.

ही संज्ञा सर्वप्रथम आंत्वान मेये (१८६६-१९३६)या फ्रेंच भाषावैज्ञानिकाने वापरली. विसाव्या शतकात तालमी जिवोन, पॉल हॉपर, एलिझाबेथ ट्रोगॉट, तानिया कुतेवा, इ. अभ्यासकांनी या संकल्पनेचा अधिक विस्तृत अभ्यास केला. जगभरातील भाषांवर आजवर झालेल्या क्रमिक (diachronic) भाषावैज्ञानिक संशोधनाच्या आधारावर या संदर्भात काही सामान्य निरीक्षणे मांडता येतात. भाषेतील शब्दयोगी अव्यय, काळ, क्रियाव्याप्ती, वचन, विभक्ती, अशा प्रकारच्या व्याकरणिक संज्ञांची उत्पत्ती ही मुळात नाम किंवा क्रियापद म्हणून कार्यरत असलेल्या शब्दांपासून होते हे सिद्ध झाले आहे. उदा. इंग्रजीतल्या I am going to the market.’ या वाक्यात ‘going’ या शब्दाचा क्रियापद म्हणून वापर झाला आहे. पण‘I am going to hit you’’या वाक्यात ‘going’ हे क्रियापद नसून इथे हा शब्द भविष्य काळाचा निर्देश करतो. हिंदीत ‘राम दिल्ली में रहता है मधील ‘रहता’ आणि ‘वह मुझे परेशान करता रहता है’ मधील ‘रहता’ यांचाही असाच संबंध आहे. दुसऱ्या वाक्यात ‘रहता’ अपूर्ण/चालू  क्रियेचा निर्देश करतो. इथे ‘राहणे/वास्तव्य करणे’ या मूळ अर्थाचा संबंध नाही. याच प्रमाणे भाषेतील अनेक कारक विभक्ती प्रत्ययांची उत्पत्ती ही मुळात शरीराच्या भागांसाठी असलेल्या नावांपासून/ नामांपासून झाली आहे असे लक्षात येते. हिंदी भाषेतील ‘राम को इनाम मिला’ मधले ‘को’ हा प्रत्यय संस्कृत ‘काक्ष’ (काख, बाजू) या शब्दापासून, तर मराठीत ‘देवळापाशी मला भेट’ मधला ‘पाशी’ हा प्रत्यय संस्कृत ‘पार्श्व’ पासून उद्भवला. ‘मी रामकडे गेले’ मधले ‘कडे’ हे अव्ययसंस्कृत ‘कटि’ पासून उद्भवले किंवा ते कन्नड/तेलुगुतल्या ‘बाजू’ या अर्थाने असलेल्या शब्दाची उसनवारी आहे असे मत आहे.

व्याकरणीभवन या प्रक्रियेतून भाषेत व्याकरणाची निर्मिती होते असे म्हणता येते . ही प्रक्रिया सर्वसाधारणपणे एकरेषीय असते: (आशयसूचक अर्थापासून व्याकरणिक अर्थाकडे): आशयसूचक शब्द > कार्यसूचक शब्द > मुक्त रूपिम > बद्ध रूपिम > अन्याश्रयी. ही प्रक्रिया चार टप्प्यांतून पूर्ण होत असते. सर्वप्रथम मूळ शब्दाचा आशयसूचक अर्थ हळूहळू पुसला जातो. वरील ‘टाकणे’ च्या उदाहरणावरून लक्षात येते की मराठीत या शब्दाची व्याकरणीभवनाची प्रक्रिया अद्याप पूर्णत्वाला गेलेली नाही. सध्याच्या मराठीत या रूपाचे ‘फेकणे’ आणि ‘क्रिया पूर्णपणे संपवणे’ हे दोन्ही अर्थ प्रचलित/वापरात आहेत. प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात मूळ अर्थाचे आकुंचन होते तर दुसऱ्या टप्प्यात त्या भाषिक रूपाला प्राप्त झालेल्या नवीन, व्याकरणिक अर्थाचा भाषावापरात विस्तार होतो. तिसऱ्या टप्प्यात मूळ शब्दाचे व्याकरणिक विशेष लोप पावतात आणि चौथ्या टप्प्यात मूळ रूपाच्या ध्वनीच्या स्तरावर झीज होते. या प्रक्रियेचे वर्णन पुढील प्रमाणे करता येईल: ‘अ’ या भाषिक रूपाला ‘ब’हा नवीन अर्थप्रयोग प्राप्त होतो. काळाच्या ओघात ‘ब’ चा हळूहळू विस्तार होतो आणि ‘अ’ च्या मूळ अर्थाचे आकुंचन होते. प्रक्रियेच्या शेवटी ‘अ’ चा पूर्णपणे लोप होतो आणि भाषेत केवळ ‘ब’ हा अर्थ टिकून राहतो. ही संपूर्ण प्रक्रिया संक्षिप्त पद्धतीने अशी दाखवता येईल:  अअअ > अअब > अबब > बबब.

संदर्भ :

  • Hopper, paul; Trogott, Elizabeth, Grammaticalization, Cambridge ,2003.

प्रतिक्रिया व्यक्त करा