रोहित्राची कार्यक्षमता, त्याचे विद्युत् दाबनियमन आणि भारित अवस्थेत रोहित्राच्या निरनिराळ्या भागात होणारी तपमानवाढ तपासण्यासाठी रोहित्राला खराखुरा भार जोडून केलेल्या परीक्षणामुळे बव्हंशी बिनचूक माहिती मिळते हा मुख्य फायदा आहे.

आ. क्र. १. रोहित्र परीक्षणासाठी प्रत्यक्ष भार मंडल जोडणी.

या परीक्षणासाठी आ. १  प्रमाणे मंडल जोडणी करतात. यात दोन्ही वेटोळ्यांमध्ये प्रवाहमापक, दाबमापक व शक्तिमापक जोडावे लागतात. रोहित्राच्या व्दितीयकाला जोडलेला भार टप्प्याटप्प्याने वाढवीत असताना एकेरी रोहित्राचा(autotransformer) उपयोग प्राथमिक वेटोळ्याला दिला जाणारा विद्युत् दाब निर्धारित दाबाइतका ठेवण्यासाठी केला जातो.

रोहित्राच्या व्दितीयकाला जोडलेला भार टप्प्याटप्प्याने वाढवीत असताना प्रत्येक टप्प्याला निरीक्षणे नोंदवितात आणि आकृतीत दिलेली सूत्रे वापरून कार्यक्षमता आणि विद्युत् दाबनियमनाची आकडेमोड करून आलेख काढला जातो. रोहित्रांची कमाल कार्यक्षमता सामान्यत: ९५ —९८ टक्क्यांपर्यंत असू शकते.

आलेख १ व आलेख २ भारपरिणामाचा सर्वसाधारण नमुना दर्शवितात.

आलेख १ : भारप्रवाहाचा कार्यक्षमतेवर होणारा परिणाम.

अभिकल्पाप्रमाणे  ( design) रोहित्राचे कार्य होते आहे किंवा नाही हे तपासले जाते. रोहित्राची कमाल कार्यक्षमता त्यावर किती भार असताना मिळावी हे रोहित्र विद्युत् प्रणालीमध्ये कोठे वापरले जाणार आहे त्यावर ठरवावे लागते आणि हे अभिकल्पाचे वेळीच ठरविले जाते आणि ते उद्दिष्ट साध्य होईल अशा दृष्टीने रोहित्राचा इतर तपशील ठरविला जातो.  या परीक्षणात भाराचा शक्तिगुणक स्थिर ठेवला जातो. वेगवेगळ्या शक्तिगुणकाचा भार वापरूनही हे परीक्षण करता येते.

प्रत्यक्ष भार जोडणीने रोहित्र परीक्षण करणे फक्त छोटया रोहित्रासाठीच शक्य असते. मोठया क्षमतेच्या रोहित्रासाठी प्रयोगशाळेत एवढे मोठे भार मिळविणे शक्य नसते आणि मिळवले तरी अशी परीक्षणे प्रचंड खर्चिक ठरतात त्यामुळे सहसा केली जात नाहीत.

 

 

आलेख २ : भारप्रवाहाचा दाबनियमनावर होणारा परिणाम.

अप्रत्यक्ष भार रोहित्र परीक्षण : मोठया क्षमतेच्या रोहित्रासाठी प्रत्यक्ष वापरात असताना निर्माण होणारी परिस्थिती अप्रत्यक्षपणे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यावरून त्याचे विद्युत् दाबनियमन, कार्यक्षमता इत्यादींविषयी अनुमाने काढली जातात.

 

 

संदर्भ:

  • विश्वकोशातील विद्युत् अभियांत्रिकी विभागामधील या आधीच्या नोंदी
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान- इयत्ता दहावी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे.
  • Performance and Design of A.C. Machines – M.G.Say
  • Elements of Electrical Engineering – U. A. Bakshi

समीक्षक – उज्ज्वला माटे

प्रतिक्रिया व्यक्त करा